श्रीनगर : जम्मू विभागातील डोडा जिल्ह्यानंतर आता काश्मीरच्या उत्तरेकडील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये भारतीय सैन्य दलाने दहशतवादविरोधी कारवाईला सुरूवात केली आहे. गुरुवार, दि. १८ जुलै २०२४ केरन सीमा भागात भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ (LOC) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. लष्कराचे सहा आरआर आणि पोलिसांचे एसओजीचे जवान घटनास्थळी तैनात आहेत. येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
दुसरीकडे, डोडामध्येही चकमक सुरू आहे. प्रतिकूल हवामानात अधूनमधून गोळीबार होत आहे. डोडामध्ये सोमवारपासून दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू आहे. चार दिवसांत डोडामधील ही तिसरी चकमक असली तरी सुरक्षा दलांना अद्याप यश आलेले नाही. घनदाट जंगले, उंच पर्वत आणि खराब हवामान हे सुरक्षा दलांसमोर आव्हान असले तरी सैनिक खंबीरपणे उभे आहेत. दहशतवाद्यांचा लवकरच खात्मा केला जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
डोडा येथील कास्तीगढ भागात पहाटे २ वाजताच्या सुमारास झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत. या भागात शोधमोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली लष्कराच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर भारतीय लष्कराने कारवाईला सुरूवात केली.