काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “माझ्या नशिबात असेल तर मी मुख्यमंत्री होईन.” थोडक्यात, नाना पटोलेंनाही वाटते की, ते ‘नशिबाने मुख्यमंत्री’ होऊ शकतात. यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, अफाट बुद्धिमत्तेने किंवा कर्तृत्वाने मुख्यमंत्री होण्याची कुवत ज्यांच्याकडे नाही, ते नशिबावरच विसंबणार म्हणा! तसेच काम, जबाबदार्या, कर्तृृत्व यांचा आणि नानांचा तसा काही अर्थोअर्थी संबंध तरी आहे का? असो. लोकांना जरी असे वाटत असले तरीसुद्धा नाना भारी म्हणजे भारीच आशावादी. नानांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र आज पेटलेला आहे आणि त्याला शांत करण्याचे काम तेच करणार. तसेच महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठीही त्यांची लढाई आहे, असेही ते म्हणाले. मात्र, स्वत:च्या कर्तृत्वावर इतका विश्वास असलेल्या नानांच्या कार्यक्षमतेवर नेमका त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचाच विश्वास नाही, असे दिसते. महाराष्ट्राच्या जनतेचे तर सोडूनच द्या म्हणा. कारण, काँग्रेस पक्ष म्हंटले की, आजही काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते गांधी घराण्यापलीकडे जात नाहीत, तर अशा या काँगे्रस पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांचा विश्वास नाना पटोलेंवर किती आहे? हे नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसून आले. काँग्रेसच्या आमदारांनी या निवडणुकीमध्ये ‘क्रॉस व्होटिंग’ केले. त्यामुळे महाविकास आघाडी त्यातही काँग्रेसला नाचक्की पत्करावी लागली. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांच्या संघटनात्मक आणि पक्षनिष्ठ कार्याची ही पावतीच होती का? राज्याचे अध्यक्ष म्हणून नाना आणि या आमदारांचा संपर्क, संवाद वगैरे होता की नाही? नाना म्हणतात, महाराष्ट्र पेटला आहे, तो त्यांना शांत करायचा आहे. मात्र, आता त्यांचा काँग्रेस पक्षच महाराष्ट्रात धुमसत आहे, त्यालाही ते शांत करू शकत नाहीत. जाऊ दे, आपल्याला काय हो, पण इतके मात्र नक्की की, ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून त्यांना कार्यकर्त्यांनी वीणा भेट दिली आहे. ‘भावी’ म्हटले की ‘भावी पंतप्रधान’ आठवतात. ‘भावी पंतप्रधान’ म्हणून त्या व्यक्तीला आजन्म भावी पंतप्रधान राहावे लागणार आहे, असे दिसते. त्यामुळे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून नानासुद्धा ‘भावी’च राहतील हे नक्की! तसेही असेल ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ हा केवळ भाबडा आशावाद. जिथे धर्म तिथे विजय! या पार्श्वभूमीवर नाना कुठे आहेत?
भोळ्यांची भंगलेली स्वप्नं
शरद पवार, राहुल गांधी हे आषाढी एकादशीच्या वारीमध्ये येतील, असे काही जणांना वाटले होते. यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरणच दिले की, ते काही वारीमध्ये चालणार नाहीत, तर राहुल गांधी कुठेतरी बाहेर असल्यामुळे तेही वारीला उपस्थित राहणार नाहीत. मुळात, हे दोघे नेते वारीमध्ये येतील असे वाटणार्या भोळ्या, निरागस लोकांना त्रिवार वंदन! काही लोकांनी म्हणे शरद पवारांना विनंती केली होती की, त्यांच्या दिंडीत शरद पवारांनी यावे. तसेच काही लोकांनी असेही म्हंटले की, शरद पवारांनी राहुल गांधी यांनाही दिंडीमध्ये येण्यासाठी आमंत्रित केले आहे. हे दोघे आणि महायुतीचे आणखी एक नेते उद्धव ठाकरे हेसुद्धा वारीत असणारच, असा या लोकांचा होरा. पण, तसे काहीही घडले नाही. ते तसे घडणार होते का? तर, महाराष्ट्राचे जुने जाणते नेते म्हणून शरद पवारांना ओळखले जाते. थोडक्यात, शरद पवार हे महाराष्ट्राच्या संस्कृती-संस्कारांची जाण असलेले नेते आहेत, असेच चित्र निर्माण केले होते. पण, वारकर्यांशी त्यांचे किती ऋणानुबंध आहेत, यावर फारसे बोलण्यासारखे नाही. या पार्श्वभूमीवर पंढरपूरची वारी, वारकरी, माळकरी यांच्यासाठी आज महायुती सरकारने जे काही केले, ते पाहिले की वाटते, महाराष्ट्राची वारकरी संस्कृती जपणारे हे सरकार आहे. कारण, दरवर्षीपेक्षा यावर्षी आषाढी एकादशी पंढरपूरच्या वारीत वारकर्यांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ आताच का व्हावी? तर, महाराष्ट्राच्या धर्मशील जनतेला विश्वास आहे की, महाराष्ट्राचे आताचे वातावरण धर्मसंस्कृती जपणारे आहे. भगवी पताका हातात घेतली किंवा देवाधर्माचे नाव घेतले, तर आपल्याला त्रास द्यायची कुणाची हिंमत नाही. तर, मूळ मुद्दा असा आहे की, पंढरपूरच्या वारीत शरद पवार किंवा राहुल गांधी थेट वारकरी म्हणून हजर राहू शकत नाहीत. लोकांचे म्हणणे आहे, तुम्ही काय आषाढी एकादशी, वारी, वारकरी म्हणत आहात? आज मोहरमही आहे. हे दोन्ही नेते संभ्रमात असतील ना? वारीला गेले तर पारंपरिक मतदार काय म्हणतील? हक्काचा मतदार असा कसा गमवायचा? इतक्या वर्षांच्या त्यांच्या राजकारणातून इतके तर जनतेने समजून घ्यायलाच हवे ना?
९५९४९६९६३८