प्रसिद्ध मराठी साहित्यिका आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा राजश्री बोहरा यांना ‘रेडीयंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड’ या संस्थेतर्फे दिला जाणाऱ्या ‘आयकॉन ऑफ द नेशन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रविवारी(१४ जुलै) आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नॅशनल एक्सलन्स कॉन्फरन्स’ मध्ये हा सन्मान सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन लेखक डॉ. क्रांतिकुमार महाजन यांनी केले होते. या कार्यक्रमात देशभरातीत अनेक मान्यवर उपस्थित होते.
साहित्यिका राजश्री बोहरा या अनेक वर्षांपासून मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. मुंबई आणि ठाणे विभागात मिळून त्यांनी आजवर १४ साहित्यसंमेलने आयोजित केली आहेत. तसेच आत्तापर्यंत त्यांनी १२ वेळा विविध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, आणि राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा त्यांनी घेतल्या आहेत. राजश्री बोहरा या नॅच्युरोपथीच्या डॉक्टर असून रत्नशास्त्र, अंकशास्त्र, अरोमा थेरेपी, वास्तुशास्त्र अशा विविध विषयांमध्ये त्या पारंगत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षिका म्हणून गेली १८ वर्षे त्या कार्यरत आहेत. उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. अनेक दिवाळी अंकातून, मासिकातून, प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून व वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केले आहे. आत्मफुले आणि राजकाव्य हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आजपर्यंत त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य असे मिळून एकूण ६० पुरस्कार मिळाले आहेत.