ठाणे- शंभर वर्षाहुन जुने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय कात टाकणार आहे. प्रस्तावित नविन रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची काही जागा रेल्वे आणि ठाणे महापालिकेला विकास कामासाठी देण्याचा निर्णय झाला असला तरी, तब्बल ५६० कोटी खर्चून मनोरुग्णालयाचा कायापालट होणार आहे. बंगलोर येथील मनोरुग्णालयाच्या धर्तीवर भारतातील सर्वात मनोरुग्णालय ठाण्यात बांधले जाणार असुन सुसज्ज २६ इमारती असल्याने मनोरुग्णांसाठी सोईचे ठरणार आहे.
मुंबईच्या सरहद्दीवर असलेल्या ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अखत्यारीत ठाणे, मुंबईसह पालघर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार आदी आठ जिल्हे आहेत. सन १९०१ साली शेठ नरोत्तमदास माधवदास मनोरुग्णालय (मेंटल हॉस्पिटल) सुमारे ७२ एकर जागेत तत्कालीन सरकारने उभारले होते. ठाणे शहरातील प्रमुख वास्तूंपैकी एक असणाऱ्या ऐतिहासिक मनोरुग्णालया मध्ये १८५० खाटांची क्षमता आहे. मात्र बदलत्या काळात रुग्णालय कात टाकणार असुन सुमारे ३२७८ खाटांचे भव्य रुग्णालय बांधले जाणार आहे. भारतातील सर्वाधिक मोठ्या क्षमतेच्या मनोरुग्णालय पैकी एक ठाणे मनोरुग्णालय असणार आहे.
बंगळूर येथील NIMHANS (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस) धर्तीवर मनोरुग्णालयाची बांधणी केली जाणार असून, रुग्णांसाठी पुनर्वसन केंद्रात स्वच्छंदी वातावरण असेल. आत्ताच्या क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्णांवर उपचार होतील अशा पद्धतीने रुग्णालयाची बांधणी केली जाणार आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना रहाण्यासाठी इमारती, रुग्णांसाठी पुनर्वसन केंद्र बांधले जाणार आहे. या सोबतच मेंदू आजारी रुग्णांसाठी न्यूरो सायक्याट्रिक सर्जरी आणि अँड ट्रीटमेंट अद्ययावत कक्षाची उभारणार आहे. लहान मुलांसाठी बाह्य विभाग, इसीटी, व्यवसाय उपचार विभाग रुग्णांच्या नातेवाईकांना रहाता येईल याची देखील तरतूद केली असल्याची माहिती मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी दिली.
चौकट - एक लाख १२ हजार चौरस मीटर बांधकाम
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती पाडून, एक लाख १२ हजार चौरस मीटरचे बांधकाम होणार आहे. राज्य शासनाने नवीन बांधण्यात येणाऱ्या मनोरुग्णालयाला नुकतीच परवानगी दिली आहे. नवीन रुग्णालयाची बांधणी अद्यावत असून, त्याचा फायदा रुग्णांना होईल असा विश्वास आरोग्य प्रशासनाला आहे. त्यामुळे लवकरच रुग्णालयाचे बांधकाम सुरू होणार आहे.
- डॉ. नेताजी मुळीक (अधीक्षक, ठाणे मनोरुग्णालय)