लखनऊ : लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच लखनऊमध्ये झालेल्या भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. कार्यकर्त्यांनी बॅकफूटवर येण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री योगींनी विरोधकांच्या जातीयवादावर लक्ष ठेवून २०२७ ची तयारी सुरू करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आता बदलली आहे. यापूर्वी मोहरमच्या काळात ताजियाच्या नावाने घरे पाडली जात होती. आता मनमानी चालत नाही.
राज्याच्या नेत्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, “जिथे आपण अतिआत्मविश्वास बाळगतो आणि आपण जिंकणार आहोत असे वाटत असते, तेव्हा अनेकदा निराशा हाती लागते. त्यामुळे विरोधक उड्या मारत आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत बॅकफूटवर येण्याची गरज नाही. आम्ही ५०० वर्षांची प्रतीक्षा संपवली आणि अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले.
ते म्हणाले, “तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही यूपीला माफियांपासून मुक्त केले आहे. यूपीमध्ये आज सुरक्षेचे वातावरण आहे. पूर्वी मोहरमच्या काळात ताजियाच्या नावाने घरे पाडली जायची, तारा काढल्या जायच्या पण आता मनमानी नाही. जाती-धर्माच्या नावावर आम्ही कधीही भेदभाव केला नाही. "अंदाजे ५६ लाख गरीबांना कोणताही भेदभाव न करता घरे देण्यात आली आहेत." अशी माहिती त्यांनी दिली.
२०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. २०२७ मध्येही विजयाची परंपरा कायम ठेवावा लागेल, असे ते म्हणाले. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, संघटन सरचिटणीस बी.एल.संतोष, प्रदेश भाजप अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांच्यासह राज्यातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अन्य नेत्यांनीही भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले.