पवारांच्या भेटीत काय घडलं? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
15-Jul-2024
Total Views | 57
मुंबई : मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर या भेटीमागचं कारण उघड केलं आहे. राज्यातील समाजासमाजात तेढ निर्माण झाल्याने स्फोटक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नात शरद पवारांनी लक्ष घालावं, अशी विनंती केल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, "आम्ही जवळपास दीड तास चर्चा केली. मी कुठलाही मंत्री, आमदार किंवा कुठलीही पक्षीय भुमिका घेऊन आलेलो नाही, असं मी त्यांना सांगितलं. तुम्ही महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे राज्यात शांतता निर्माण व्हायला हवी ही एक जेष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देत असताना असाच मराठवाडा पेटला होता. त्यावेळी तुम्ही तो शांत केला, याची त्यांना आठवण करुन दिली. पण आज अशी परिस्थिती असताना तुम्ही आला नाहीत," असे त्यांनी सांगितले.
"यावर शरद पवारांचं म्हणणं होतं की, जरांगेंना भेटल्यावर मुख्यमंत्र्यांनी काय चर्चा केली, कोणती आश्वासने दिली, हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेल्यावर तुम्ही त्यांना काय सांगितलं हेसुद्घा आम्हाला माहिती नाही," असं पवारांचं म्हणणं असल्याचं भुजबळांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, "तुम्ही राज्यातले सर्वात जेष्ठ नेते असल्याने गावागावांमध्ये सर्व समाजघटकांची काय परिस्थिती आहे, याचा तुम्हाला सर्वात जास्त अभ्यास आहे. त्यामुळे तुम्ही यात पुढाकार घ्यायला हवा," अशी विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, एक दोन दिवसांत मी मुख्यमंत्री शिंदेंशी बोलतो आणि २-४ लोकं एकत्र बसून हा प्रश्न कसा सोडवता येईल, यावर चर्चा करायला मी तयार आहे, असे आश्वासन शरद पवारांनी भुजबळांना दिले आहे.
"ओबीसी आणि मराठ्यांचा प्रश्न सुटावा आणि तंग झालेलं वातावरण शांत व्हावं, हा माझा हेतू आहे. यासाठी मी कुणालाही भेटायला तयार आहे. उद्या मी राहुल गांधी आणि पंतप्रधानांनासुद्धा भेटायला तयार आहे. परंतू, राज्यातील वातावरण शांत असावं, गोरगरिबांची घरं पेटता कामा नये, हा माझा यामागे हेतू आहे. यामध्ये कुठलंही राजकारण नाही. यावेळी धनगरांच्या प्रश्नावरही चर्चा झाली असून ते सर्वांसोबत चर्चा करायला तयार झाले आहेत," असेही भुजबळांनी सांगितले.