उच्चविद्याविभूषित ‘ज्योती’

    14-Jul-2024   
Total Views |
 joyati
 
आपल्या मुलीने खूप शिकावे हे आईवडिलांचे स्वप्न मुलीने सार्थक करून दाखविले. समोर आलेल्या अडचणींवर मात करत आपल्या स्वप्नांना पूर्ण करणार्या डॉ. ज्योती पोहाणे यांच्याविषयी...
 
डॉ. ज्योती पोहाणे यांचे बालपण कल्याण येथे गेले. ज्योती यांनी खूप शिक्षण घ्यावे, अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती. ज्योती या मूळच्या जळगावच्या असल्याने, या ग्रामीण भागात मुलींचा विवाह लवकरच करण्याची परंपरा आहे. त्यांचे वडील एकनाथ यांचे शिक्षण सातवीपर्यंत, तर आई रजनी यांचे शिक्षण नववीपर्यंत झालेले आहे. असे असूनही ज्योती यांच्या आईवडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते.
 
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांना समजले होते. म्हणूनच त्यांनी ज्योती यांना, शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलेे. ज्योती यांना एक बहीण आणि एक धाकटा भाऊ आहे. तिन्ही भावंडांमध्ये ज्योती यांनी सर्वात जास्त शिक्षण घेतले आहे. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर ज्योती यांनी शिक्षण चालू ठेवावे की, कुटुंबाला हातभार लावावा, असा एक ‘टर्निंग पाईंट’ त्यांच्या आयुष्यात आला. पण त्यांच्या आईवडिलांनी ज्योती यांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.
 
लग्नानंतरही ज्योती यांना सासरे विठोबा आणि पती हेमंत यांची, मोलाची साथ लाभली. त्यामुळे त्यांची शिक्षणाची ज्योत, ज्योती यांना तेवत ठेवता आली. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यामुळेच आईवडिलांनी दिलेला शिक्षणाचा वसा अविरत चालू ठेवणे सहज शक्य झाले असे ज्योती सांगतात.
 
कल्याणमधील ’ओक हायस्कूल’मधून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वाणिज्य शाखेतून ’सीएचएम महाविद्याल’यातून पदवी संपादन केली. पदवीनंतर त्यांनी सीएचे शिक्षण घेण्याचे ठरविले. दरम्यान, पुणे विद्यापीठातून त्यांनी एमकॉमचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ‘दिक्षित अॅण्ड असोसिएट्स’ या फर्ममध्ये आर्टिकलशिप करत, त्या सीए करत होत्या. सीएची इंटर्न परीक्षा ज्योती यांनी पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे उत्तीर्ण केली. पण, नंतर शिक्षणक्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सीएची शेवटची परीक्षा दिली नाही. काही कारणामुळे भविष्यातही ती परीक्षा देणे शक्य झाले नाही.
 
त्यामुळे त्यांनी सीएच्या शिक्षणाला पूर्णविराम दिला, आणि शिक्षणक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
 त्याबरोबरच, ज्योती यांनी जीडीएसची (गव्हर्न्मेंट डिप्लोमा इन ऑर्गनायझेशन अॅण्ड ऑडीक) ही परीक्षाही दिली होती. या परीक्षेनंतर सहकार विभागाकडून त्यांना पॅनलवर घेण्यात आले. पण याच काळात ज्योती यांचे लग्न झाले. लग्नानंतर कौटुंबिक जबाबदारीदेखील वाढल्याने, तिथे ज्योती यांना फार दिवस काम करता आले नाही. ज्योती यांचे वडील ’एमटीएनएल’मध्ये कामाला होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती.
 
पण तरीही बीकॉमच्या दुसर्या वर्षाला असल्यापासूनच , ज्योती या स्वकमाई करून शिक्षण घेत होत्या. सुरुवातीला त्या पतपेढीत काम करत होत्या. त्यामुळे सकाळी ६ वाजता त्यांचा दिवस सुरू व्हायचा, तो रात्री १० वाजता संपत असे. कधीकधी सकाळी ४ वाजता देखील त्यांचा दिवस सुरू होत असे, आणि एमकॉमचा क्लास असे सगळे करून त्या घरी येत असत. २००२ साली लग्न झाले, आणि मूळच्या कल्याणकर असलेल्या ज्योती या उल्हासनगरच्या रहिवासी झाल्या. त्यांचे पती हेमंत यांची त्यांना, मोलाची साथ लाभली. हेमंत सध्या खासगी कंपनीत आर्थिक सल्लागार म्हणून काम करत आहेत.
 
 
लग्नानंतर पहिले अपत्य झाल्यानंतर त्यांनी, आपल्या नेहमीच्या करियरमधून दहा वर्षांचा ब्रेक घेतला. त्यानंतर त्यांनी एमबीए, पीएचडी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मुलगा सहा महिन्याचा असताना, नोकरी सोडून द्यायची का? असा विचार त्यांच्या मनात आला. पण त्यांना याकाळात मिळालेली कुटुंबीयांची साथ, या बळावरच त्यांनी या समस्येवर मात केली. त्यांच्या मुलाची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यांना नोकरी सोडण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली होती. पण यावेळी त्यांच्या बहिणीने त्यांना साथ दिली.
 
मनिषा सूर्यवंशी यांनी मुलाची जबाबदारी घेतल्यामुळे, मी नोकरी करू शकले, असे ज्योती सांगतात. त्यामुळे माझ्या यशामध्ये माझ्या माहेरची माणसे, सासरची माणसे, तसेच व्यावसायिक क्षेत्रातील गुरू आणि मार्गदर्शक आणि सहकारी या सर्वाचा खूप मोठा वाटा आहे, असे ज्योती आवर्जून सांगतात. २०१९ साली प्रगती महाविद्यालयात प्राचार्यपदाची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर आजतागायत त्या प्राचार्यपदावर कार्यरत आहे. प्राचार्यपद घेताना मनात थोडी शंका होती. परंतु, त्यावेळी ‘ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळ’ संस्थेच्या उपाध्यक्षा पुष्पलता नकुल पाटील, तसेच संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ शिवराम पाटील यांनी त्यांचे मनोबल वाढविले. या संस्थेच्या इतर पदाधिकार्यांच्या पाठिंब्यामुळेच प्राचार्यपदाची धुरा मी सांभाळू शकले, असे ज्योती सांगतात.
 
ज्योती यांना ’खान्देश विकास पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, महाविद्यालयाला ‘नॅक बॅगलोर’ म्हणून ‘बी प्लस प्लस’चे गुणांकनही मिळाले आहे. कोरोना काळात ‘नॅक’च्या तिसर्या फेरीत, हे गुणांकन मिळाले आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणक्षेत्रात नवीन उलाढाली होत आहे. त्यातून मुलांची तसेच शिक्षकांची प्रगती कशी होईल, यासाठी पुढील धोरणे आखण्याचा त्यांचा मानस आहे. डोंबिवलीमध्ये एमसीए हा कोर्स कुठेही नाही. या कोर्सला करिअरमध्ये चांगल्या संधी आहेत. हा कोर्स लवकरच सुरू करण्याचा त्यांचा विचार आह़े. डॉ.ज्योती पोहाणे यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!