भारताचा शोध - मसाले, वास्को आणि व्हान लिंशोटेन

Total Views |
 gama
 
वास्को द गामाने समुद्रित राजाला जो नजराणा दिला होता, तो राजाच्या मते अगदीच सामान्य होता. मसाल्याच्या व्यापारासंबंधी गामा आणि समुद्रित यांच्यातल्या वाटाघाटीसुद्धा असफल ठरल्या. त्यामुळे राजाने गामाला चक्क हाकलून दिले. पण, त्या सफरीत आणि पुन्हा पुढच्या सफरीत गामाने म्हणजेच पोर्तुगीजांनी आपले पांढरे पाय भारतात पक्के रोवले. केरळपासून वर सरकत गुजरातपर्यंत पोर्तुगीजांनी मुलुखगिरी केली आणि अत्याचार अन् बाटवाबाटवीचा कहर करून सोडला.
 
ख्रिस्तोेफर कोलंबस हा मूळचा जेनोवा शहराचा रहिवासी. जीनिव्हा आणि जेनोवा ही दोन वेगळी शहरे आहेत. जीनिव्हा हे स्वित्झर्लंड देशातले शहर आहे. तिथे सतत कुठली ना कुठली आंतरराष्ट्रीय परिषद सुरू असते. उलट, जेनोवा हे इटली या देशाचे प्राचीन आणि प्रख्यात बंदर आहे. इटली देशातले असेच आणखी एक प्रख्यात बंदर म्हणजे व्हेनिस. पूर्वी इटली हा एकात्म देश नसताना जेनावा आणि व्हेनिस ही दोन वेगळी नगरराज्ये होती आणि दोन्ही व्यापारासाठी जगभर प्रसिद्ध होती.
तर या जेनोवाचा दर्यावर्दी कोलंबस हा स्पेनचा राजा फर्डिनंड आणि राणी इझाबेला यांचे आर्थिक पाठबळ घेऊन बाहेर पडला. कशासाठी? तर भारत शोधण्यासाठी. म्हणजे भारत कुठे हरवला नव्हता. जागच्या जागी घट्ट होता. पण, या युरोपीय लोकांना भारताकडे जाणारा नवा मार्ग हवा होता. कोलंबसला अमेरिका सापडली, हे आपल्याला माहीतच आहे. युरोपात कोलंबसच्या या शोधाने आनंद झाला, पण तो पुरेसा नव्हता.
 
मग पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को-द-गामा हा पोर्तुगालचा राजा मॅन्युफल याचा आर्थिक पाठिंबा मिळवून निघाला. यापूर्वी कुणाही दर्यावर्दीने न केलेले धाडस त्याने केले. आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून तो अटलांटिक महासागरातून हिंदी महासागरात शिरला. आफ्रिका खंडाच्या पूर्व किनार्याने उत्तरेकडे जात त्याने आजचे मोझांबिक, दारे सलाम, झांजिबार इत्यादी भाग मागे टाकत, आजच्या केनिया देशातल्या मोंबासाजवळचे मालिंदी हे बंदर गाठले. तिथल्या राजाने त्याला हिंदी महासागर ओलांडून भारताच्या दक्षिणेकडचा मलबारचा किनारा गाठण्यासाठी एक माहितगार तांडेल दिला. या तांडेलाच्या मदतीने वास्को-द-गामा अखेर कालिकत या बंदरात पोहोचला. तिथला हिंदू राजा झामोरिन याने त्याचे चांगले स्वागत केले. गामानेसुद्धा राजाला मौल्यवान नजराणे दिले. तेव्हापासून भारत आणि पोर्तुगाल यांच्यात उत्तम व्यापारी संबंध सुरू झाले आणि ते वाढत गेले इत्यादी.
 
आता नवीन संशोधनानुसार वरील परिच्छेदाचा उत्तरार्ध खोटा आहे. मालिंदीच्या राजाने गामाला जो वाटाड्या दिला, त्याचे नाव इब्न माजिद असून तो अरब मुसलमान किंवा अरब ख्रिश्चन असावा, असे आतापर्यंत समजले जात होते. नवीन संशोधनाचा निष्कर्ष असा की, तो वाटाड्या कच्छी गुजराती हिंदू असून, त्याचे नाव कानजी मालम असे होते. गुजरातमधील कच्छची किनारपट्टी आणि आफ्रिकेची पूर्व किनारपट्टी यांचे गेली कित्येक शतके व्यापारी संबंध आहेत.
 
पुढचा मुद्दा असा की, आजच्या केरळ राज्यातील कोळिकोड (कोझिकोड किंवा कालिकत हे दोन्ही भ्रष्ट उच्चार) येथील हिंदू राजा समुद्रिन (झामोरीन हा भ्रष्ट उच्चार) याने हिंदू परंपरेनुसार अतिथी म्हणून गामाचे योग्य ते स्वागत केले. गामाला विचारण्यात आले की, ’तुम्ही इथे कोणत्या हेतूने आला आहात?’ यावर गामाचे उत्तर होते, ’ख्रिश्चन लोक आणि मसाले यांच्या शोधात.’ वास्को-द-गामा हा फक्त व्यापार करण्यासाठी आलेला एक महान शांतीदूत होता, अशा प्रकारची जी त्याची प्रतिमा आपल्याकडचे कॅथलिक इतिहासकार आणि त्यांचे लबाड किंवा भोळसट हिंदू चेले-चपाटे- चमचे यांच्याद्वारे उभी केली जाते, ती कशी खोटी आहे, हे त्याच्याच वरील उत्तरावरून सिद्ध होते.
 
गामाचे हे उत्तर नीट समजण्यासाठी आपल्याला तत्कालीन युरोपची स्थिती समजून घ्यावी लागेल. युरोप हा उत्तर गोलार्धातील भूप्रदेश असल्यामुळे तेथील हवा शीत ते अतिशीत प्रकारची आहे. लोकांच्या दैनंदिन राहणीवर याचा होणारा परिणाम म्हणजे, आहारात धान्य आणि भाज्यांपेक्षा मांस आणि मासे जास्त असतात. तसेच, रोज आंघोळ करणे आणि कपडे धुणे शक्य नसते. जेवण झाल्यावर खुळखुळून चुळा भरणे, तसेच मलविसर्जन करून आल्यावर पार्श्वभाग पाण्याने नीट धुणे हेदेखील अनेकदा शक्य नसते. आता आधुनिक विज्ञानामुळे हे सगळे शक्य आहे, पण शतकानुशतके कागद वापरण्याची सवय लागल्यामुळे मंडळी आजही टॉयलेट पेपर वापरतात. साहेबाचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानणारी आमची मंडळीसुद्धा टॉयलेट पेपर वापरतात आणि बाहेर येऊन एअर फ्रेशनर मारतात. असो.
 
तर हवेच्या अशा स्थितीमुळे युरोपीय लोकांना मसाल्याचे पदार्थ हवेच असायचे. धने, जिरे, काळी मिरी, लवंग, वेलची, दालचिनी, हळद, सुखी लाल मिरची, जायफळ, मोहरी, हिंग हे रीतसर मसाल्याचे पदार्थ, वेगवेगळे मांसाहारी पदार्थ अधिक चविष्ट करण्यासाठी वापरले जायचे. तसेच, रेफ्रिजरेटरचा शोध लागलेला नव्हता, तेव्हा अतिशीत हिवाळ्यात मांस आणि मासे खारवून टिकवण्यासाठीसुद्धा मसाल्याचे पदार्थ हवे असायचे. शिवाय, घरातले वातावरण सुगंधी ठेवण्यासाठी चंदन, कस्तुरी, धूप, विविध वृक्षांचे सुगंधी डिंक हेदेखील हवे असायचे. अतिशीत हवेमुळे आठवडाभर आंघोळच न केल्यास घरातले वातावरण कसे वाशेळे होत असेल, याच्या कल्पनेनेही आपणा पौर्वात्य लोकांच्या नाकातले केस जळतील.
 
असो. तर हे सगळे मसाल्याचे पदार्थ येणार कुठून? तर, मुख्यतः दक्षिण भारतातून, सिंहल द्बीपातून आणि मग त्याच्याही पूर्वेला असणार्या जावा-सुमात्रा इत्यादी द्बीपांमधून म्हणजेच आजच्या श्रीलंका, मलेशिया आणि इंडोनेशिया इत्यादी देशांमधून. इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत हा सगळा व्यापार भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरच्या हिंदू व्यापार्यांच्या हातात होता. पण, इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबस्तानने इस्लाम या नव्या संप्रदायाचा स्वीकार केला आणि परिस्थिती बदलत चालली. आत्तापर्यंत अरबांचा भारताशी आणि पूर्वेकडच्याजावा-सुमात्राशी व्यापार होताच.
 
अरब उत्तम दर्यावर्दी होतेच. आपण नौकानयन, बीजगणित, खगोलशास्त्र, फलज्योतिषशास्त्र इत्यादी हिंदूंकडूनच शिकलो, असे अरब विद्वान खुलेपणाने सांगत होते. पण, आता अरब मुसलमान बनले. त्यांनी पद्धतशीरपणे सगळा नौैकानयन व्यवसाय आपल्या ताब्यात घेतला. हे एकदम झाले नाही. इसवी सनाच्या आठव्या शतकापासून १४व्या शतकापर्यंत हळूहळू होत गेले. नेमक्या त्याच काळात अरब मुसलमानांचे गुलाम असणार्या तुर्क-अफगाण मुसलमानांनी क्रमाक्रमाने भारतातल्या हिंदू राजवटींचा पराभव केला. त्यामुळे भारतातून युरोपला जाणारा हा अत्यंत किफायतशीर मसाल्याचा व्यापार पूर्णपणे अरब मुसलमानांच्या हातात गेला.
 
भारताकडून युरोपकडे जाणारा माल एकतर तांबड्या समुद्रातून अलेक्झांड्रिया बंदरामार्गे जाणार किंवा इराणच्या आखातातून कॉन्सन्टिनोपलमार्गे जाणार. पैकी अलेक्झांड्रिया बंदर अरबांनी सातव्या शतकातच जिंकले आणि १४५३ साली तुर्क मुसलमानांनी ख्रिश्चन बायझंटाईन सम्राट कॉन्स्टन्टाईन तिसरा याचा पराभव करून कॉन्सन्टिनोपलही जिंकले. लगोलग त्याचे ‘इस्तंबूल’ असे इस्लामी बारसे झाले. म्हणजेच, ख्रिश्चन युरोपच्या व्यापाराच्या दोन्ही नाकपुड्याच दाबल्या गेल्या. म्हणजे व्यापार बंद झाला असे नव्हे, पण मुसलमानांच्या ओंजळीने पाणी प्यावे लागणार, हे ख्रिश्चन युरोपला सहन होईना. भारताकडे जाण्याचा नवा मार्ग शोधून काढण्याचा युरोपचा आटापिटा यासाठी होता.
 
दुसरे म्हणजे आफ्रिका, आशिया किंवा भारतात कुठेतरी प्रेस्टर जॉन नावाचा ख्रिश्चन राजा राज्य करतो आहे. त्याची आपल्याला मदत होऊ शकते, अशी एक समजूत सगळ्याच युरोपीय व्यापार्यांमध्ये त्याकाळी पसरलेली होती. ‘आम्ही ख्रिश्चन लोक आणि मसाले यांच्या शोधात इथे आलो आहोत,’ असे जे गामाने समुद्रित राजाला सांगितले, त्याची पार्श्वभूमी एवढी मोठी आहे. आता पुढच्या घटना पाहू. गामाने समुद्रित राजाला जो नजराणा दिला होता, तो राजाच्या मते अगदीच सामान्य होता. मसाल्याच्या व्यापारासंबंधी गामा आणि समुद्रित यांच्यातल्या वाटाघाटीसुद्धा असफल ठरल्या. त्यामुळे राजाने गामाला चक्क हाकलून दिले. पण, त्या सफरीत आणि पुन्हा पुढच्या सफरीत गामाने म्हणजेच पोर्तुगीजांनी आपले पांढरे पाय भारतात पक्के रोवले. केरळपासून वर सरकत गुजरातपर्यंत पोर्तुगीजांनी मुलुखगिरी केली आणि अत्याचार अन् बाटवाबाटवीचा कहर करून सोडला.
 
दक्षिणेकडे त्यांनी सिंहलद्वीपाला (श्रीलंका) वळसा घालून आजचा मलेशिया आणि इंडोनेशिया गाठलाच. पूर्व हिंदी महासागर, पश्चिम हिंदी महासागर ते पूर्व आफ्रिका ते युरोप या संपूर्ण समुद्री भागाचे त्यांनी उत्तम नकाशे बनवले. हे नकाशे त्यांचे अत्यंत मौल्यवान ‘ट्रेड सीक्रेेट’ होते. या मार्गांनी मसाल्याचा व्यापार करून पोर्तुगीजांनी किती नफा मिळवला असेल? तत्कालीन अन्य युरोपीय व्यापार्यांच्या अंदाजानुसार पोर्तुगीज व्यापारी पदार्थावर एक हजार टक्के मार्जिन घेत असत. या प्रचंड फायद्यामुळे इंग्रज, फ्रेंच, इटालियन, डच सगळ्यांचेच घारे डोळे एकदम पांढरे झाले. काहीतरी करून हे नकाशे मिळवायला हवे आणि आपणही भारताशी व्यापार करायला हवा.
 
आणि इथेच व्यापारी हेरगिरी सुरू झाली. लिओनार्दो-द-कामासीर हा व्हेनेशियन (व्हेनिसचा) व्यापारी पोर्तुगीज राजधानी लिस्बनला पोहोचला. अनेक पोर्तुगीज दर्यावर्दींशी दारू पीत गप्पा मारून त्याने खूप मौल्यवान माहिती गोळा केली. पण, खरी बाजी मारली व्हान लिंशोटेन या डच प्रवाशाने. हा पठ्ठ्या गोव्याचा पोर्तुगीज आर्चबिशप जोआओ व्हिन्सेंटी डा फोन्सेका याचा कार्यवाह म्हणून थेट पणजीतच दाखल झाला आणि खुद्द आर्चबिशपच्याच कागदपत्रांमधून त्याने सागरी मार्गांच्या नकाशांसह भरपूर माहिती उतरवून त्याचे चक्क पुस्तक छापले. मूळ डच भाषेतल्या या पुस्तकाचे इंग्रजी नाव ‘जॉन ह्यूजेन व्हान लिंशोटेन-हिज डिसकोर्स ऑफ व्हॉयेजेस इन टु द ईस्ट अॅण्ड वेस्ट इंडीज’. हे पुस्तक १५९८ साली हॉलंडमध्ये प्रकाशित झाले. मात्र, लबाड इंग्रजांनी सर्वप्रथम सन १६०० मध्ये ‘ईस्ट इंडिया कंपनी’ स्थापन करून भारताकडे प्रस्थान ठेवले. पुढे क्रमाक्रमाने डच, फ्रेंच स्पर्धेत उतरले.
 
मसाल्याच्या व्यापारासंबंधी आजपर्यंत पुष्कळ पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. पण, १६व्या शतकातल्या कामासीर आणि व्हान लिंशोटेन यांच्या व्यापारी हेरगिरीबद्दल ‘स्पाईस’ या आपल्या ताज्या पुस्तकात रॉजर क्रॉवली या अमेरिकन संशोधकाने प्रथमच विस्तृतपणे लिहिले आहे.
 
 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.