मोनोझुकुरी ही एक जपानी संकल्पना, जी २०व्या शतकाच्या अखेरीस जपानच्या उत्पादन उद्योगाचे वर्णन करण्यासाठी प्रचलित आहे. ‘मोनोझुकुरी’च्या संकल्पनेत उत्पादनात येणारा प्रत्येक घटक समाविष्ट आहे. ‘मोनोझुकुरी’ दीर्घकाळापासून जपानच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेचे प्रमुख स्रोत आहे. ‘रोबोटिक्स’ हेदेखील जपानच्या ‘मोनोझुकुरी’ संस्कृतीमधून उगम पावलेले सर्वोत्कृष्ट उत्पादन. जपान अत्यंत स्पर्धात्मक संशोधन, विकास आणि उपयोजित तंत्रज्ञानासह रोबोटिक्सच्या क्षेत्रात जगात आघाडीवर आहे.
रोबोटिक्समध्ये तिथे आणखी संशोधन आणि प्रगती सुरु असून, जपान प्रत्येक क्षेत्रात कुशल रोबोट्सआधारे व्यवस्थापन करू शकेल. असाच एक महाकाय रोबोट जपान पश्चिम रेल्वेने नुकताच जगासमोर आणला. इंग्रजी चित्रपटात दिसणार्या महाकाय प्रतिकृतीप्रमाणेच हा रोबोटही भव्य आणि भयावह. जपान रेल्वेने देखभालीची कामे हाताळण्यासाठी या नवीन ‘ह्युमनॉइड’ कर्मचार्याला नियुक्त केले आहे.
हा नवीन रोबोट आयटी आणि इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ‘निप्पॉन सिग्नल’ आणि रोबोटिक्स तंत्रज्ञान विकसक ‘जिंकी इत्ताई कंपनी’ यांनी तयार केला आहे. ‘निप्पॉन सिग्नल’ या कंपनीची स्थापना १९२८ साली रेल्वे सिग्नल प्रणालीसाठी, देशांतर्गत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी करण्यात आली. त्यानंतरच्या आठ दशकांहून अधिक काळात ही कंपनी हायस्पीड शिंकानसेन सेवा आणि शहरांतर्गत रेल्वे जाळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन आहे. आज जपानमध्ये दैनंदिन सुरक्षित आणि आरामदायी रेल्वे सेवा ‘निप्पॉन सिग्नल’च्या यशस्वी, सुरक्षित तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत.
असाच एक प्रगत तंत्रज्ञानावर आधारित अवाढव्य ‘ह्युमिनॉईड रोबो’ या कंपनीने जपान पश्चिम रेल्वेच्या सेवेत हजर केला आहे. या महिन्यापासूनच हा अवाढव्य रोबो पश्चिम रेल्वेवर देखभालीसाठी वापरला जाईल. १२ मीटर (४० फूट) उंचीसह हा रोबो पेंटब्रश चालवू शकतो. चेन-सॉ चालवू शकते आणि आपल्या भव्य हातांच्या आधारे हा रोबो ४० किलो (८८ पौंड) पर्यंत वजनाच्या वस्तू एका जागेवरून दुसर्या ठिकाणी हलवू शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, रोबोची सध्याची प्राथमिक कर्तव्ये म्हणजे रेल्वेच्या विशिष्ट उंचीवरील तारांना आधार देणार्या धातूच्या फ्रेम्स रंगवणे आणि रेल्वेमार्गावर पडणार्या झाडाच्या फांद्या तोडणे ही असतील. ही सर्व व्यवस्थापन कामे जपान रेल्वेने रोबोवर का सोपवली, यामागेही जपानची एक मोठी ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी’ आहे.
‘एनएचके’च्या अहवालानुसार, जपान हा देश सद्यस्थितीत कौशल्यपूर्ण मजुरांच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहे. अनेक कंपन्या कुशल मनुष्यबळाअभावी दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच पुरेसे कामगार शोधण्यात अक्षमतेमुळे १८२ कंपन्यांनी दिवाळखोरी घोषित केली. विशेषतः या समस्येचा प्रभाव बांधकाम आणि लॉजिस्टिक क्षेत्रांवर दिसून येतो. अनेक व्यवसाय कामगारांना आमिष दाखवून जास्त पगार देऊ करत आहेत. अशावेळी जपान रेल्वेसारख्या कंपन्या आता या कर्मचारी कमतरतेची आव्हाने कमी करण्याचा मार्ग म्हणून ह्युमनॉइड रोबोट्सकडे वळत आहे. धोकादायक आणि शारीरिकदृष्ट्या जोखमीची कामे आणि विजेचा धक्का लागून मृत्यू अशा अपघातांची संख्यादेखील या ह्युमनॉइड रोबोमुळे कमी होतील.
याचा जपान रेल्वे केस स्टडी करून जगातील इतर व्यस्त रेल्वे सेवांवर अशा सुविधा उभारण्यासाठी एक नवे मॉडेल विकसित करण्याच्या तयारीत आहे. उदाहरणार्थ, चिनी कंपनी एस्ट्रीबोटने एस वन रोबोटचे अनावरण केले आहे, जो २२ पौंड प्रतिहाताचा पेलोड व्यवस्थापित करताना ३२.८ फूट प्रतिसेकंद या प्रभावी वेगाने फिरू शकतो. त्याचप्रमाणे, लॉजिस्टिक क्षेत्रातील दिग्गज जीएक्सओ (ॠदज) गोदामांमध्ये अप्प्ट्रोनिकच्या अपोलो ह्युमनॉइड रोबोटची चाचणी करत आहे. हे अपोलो ५’८ इतके उंच आहे. तर ५५ पौंड इतके वजन उचलू शकते. तंत्रज्ञानक्षेत्रात दिग्गज टेस्ला कंपनीदेखील रोबोटिक्स क्षेत्रात प्रगती करत आहे.
सीईओ इलॉन मस्क यांनी नुकताच पुढील वर्षी कारखान्यांमध्ये एक हजार ऑप्टिमस ह्युमनॉइड रोबोट तैनात करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर येणार्या काळात जोखमीचे काम करण्यासाठी आणि ज्याठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाची कमतरता आहे अशा ठिकाणी रोबोटिक्स ती कमतरता भरून काढतील, यात शंका नाही. म्हणूनच, भविष्यातील मागणीचा विचार करता हेच रोबोट पुरविण्यासाठी जपानसारखे देश जागतिक बाजारपेठ निर्माण करूइच्छित आहेत. आणि स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानसह रोबोट्स बनविण्यावर भर देत आहेत.