मुंबईतील वाहतूककोंडी मोडून वेगवान रस्ते वाहतुकीसाठी विविध रस्ते प्रकल्पांची कामे शहर आणि उपनगरांत सुरू आहेत. भविष्याचा विचार करून निर्माण होणार्या या रस्तेमार्गांमुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. आज मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रो आणि उन्नत मार्गांचे जाळे विस्तारत असताना, भूमिगत रस्ते मार्ग उभारणीचा पर्याय वाहतुकीला सर्वस्वी चालना देणाराच. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, शनिवार, दि.१३ जुलै रोजी पायाभरणी होत असलेल्या मुंबईतील अशाच दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा घेतलेला हा आढावा...
मुंबई शहराचा विचार केल्यास, १९९०च्या उत्तरार्धात, वाढती वाहतूककोंडी लक्षात घेता उड्डाणपुलांची निकड भासू लागली. त्यानंतर उड्डाणपुलांच्या कामाला गती प्राप्त झाली आणि आज मुंबईत ठिकठिकाणी उभारलेले प्रशस्त उड्डाणपूल दृष्टिपथास पडतात. कमालीच्या उंचीवरून धावणार्या गाड्या आणि अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असणार्या या उड्डाणपुलांनी शहरांच्या भव्यतेत आणि सुंदरतेत सर्वार्थाने भर घातली. मात्र, शहरात वेगाने वाढणारी वाहनांची संख्या आणि रस्ते विस्ताराच्या मर्यादा लक्षात घेता, हे उड्डाणपूलही वाहतूककोंडीच्या समस्येवर अपुरे पडू लागले. अशातच उन्नत मेट्रो आणि मोनो कॉरिडोरने मुंबईच्या सर्व भागांना व्यापल्याने शहर नियोजनकारांनी भूमिगत मार्गिकांच्या उभारणीचा एक व्यवहार्य पर्याय अवलंबला आहे.
मुंबईत भूमिगत ‘मेट्रो ३’ मार्गिका धावण्यासाठी सज्ज आहे, तर बीकेसी येथे भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूमिगत बोगद्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. इतकेच नाही, तर मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पातही सागरी किनार्यांखाली बोगद्यांची उभारणी करत, मुंबई महानगरपालिकेने अभियांत्रिकी आविष्कारच घडविला. आणखी एक बोगदा-आधारित प्रकल्प ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून मुंबई शहरात नियोजित आहे, तो म्हणजे ‘ऑरेंज गेट टनेल’ प्रकल्प. हा प्रकल्प पश्चिम किनारपट्टीवरील कोस्टल रोडला ऑरेंज गेटजवळील ईस्टर्न फ्रीवेला जोडण्यासाठी शहराच्या सर्वात दाटीवाटीच्या भागांतून जमिनीखालून जाणार आहे. हाच प्रकल्प मुंबईला थेट अटल सेतूशीही जोडणार असल्यामुळे एकूणच कनेक्टिव्हीटीच्या दृष्टीने महत्त्वपूूर्ण ठरेल, यात शंका नाही.
यानंतर, आता बहुचर्चित मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार्या दोन रस्ते-बोगद्यांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. त्यापैकी एक प्रमुख मार्ग आहे तो गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील बोगदे आणि दुसरा प्रकल्प ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प. त्यापैकी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देखरेखीत बांधण्यात येणार आहे, तर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत विकसित होईल. हे दोन्ही प्रकल्प वन्यजीवांचा अधिवास असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक अधिवासाला अजिबात धक्का न लागता, सुकर वाहतुकीचा एक नवीन पर्याय मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचे संतुलन साधणार्या या बोगदे प्रकल्पांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून हे बोगदे विकसित केले जातील.
पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता
सध्या मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव ते पूर्व उनपनगरातील मुलुंड या रस्तेमार्गावर प्रवासासाठी एक ते दीड तासांचा अवधी लागतो. मात्र, प्रस्तावित जोडरस्ता पूर्ण झाल्यानंतर गोरेगाव ते मुलुंड हे अंतर पूर्ण करण्यासाठी अवघ्या २० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प हा १२ किमी लांबीचा रस्ता पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. घोडबंदर रोड, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड नंतर, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा मुंबईतील चौथा पूर्व-पश्चिम जोडणी देणारा कॉरिडोर. हा प्रकल्प एकूण चार टप्प्यांत विभागलेला आहे. एका टप्प्यात रेल्वे उड्डाणपूल, रस्ते रुंदीकरण, उन्नत मार्गिका आणि बोगद्यांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात गोरेगाव पूर्व येथे १.६ किमीचा बॉक्स बोगदा आणि ४.७ किमी (गोरेगाव पूर्व) दुहेरी बोगद्याचा समावेश आहे. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली दोन बोगदे बांधण्याची योजना आहे. ४.७ किलोमीटरचा हा बोगदा गोरेगावमधील फिल्मसिटीपासून सुरू होईल आणि मुलुंडमधील खिंडीपाडा येथे संपेल. बोगद्याची खोली २० ते १६० मीटर दरम्यान असेल. या दुहेरी बोगद्यांचे बांधकाम ऑक्टोबर २०२८ पर्यंत पूर्ण होईल, असे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे बोगदे नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे उभारण्यात येतील. दोन टनेल बोअरिंग मशीन (ढइच) द्वारे ज्याचा १३ मीटर अंतर्गत व्यासासह ४.७ किमी लांबीचा दुहेरी बोगदा आणि फिल्मसिटी परिसरात १.६ किमी लांबीचा बॉक्स बोगदा आणि अप्रोच रस्त्यांचे बांधकाम करण्यात येईल.
ठाणे-बोरिवली जुळे बोगदे प्रकल्प
ठाणे ते बोरिवली अंतर पार करण्यासाठी आजघडीला एक ते दीड तासांचा अवधी लागतो. ठाण्याहून बोरिवलीला रस्तेमार्गे जाण्यासाठी वाहतूककोंडीच्या समस्येचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ठाणे ते बोरिवली असा प्रवास केवळ २० ते २२ मिनिटांत होईल. या मार्गिकेच्या ११.८ किमी एकूण लांबीपैकी ४.४३ किमी लांबी ही ठाणे जिल्ह्यातून व ७.४ किमी लांबी ही बोरिवली (मुंबई उपनगरे जिल्हा) भागातून प्रस्तावित आहे. ठाणे शहरातील टिकुजिनीवाडी ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली असा हा मार्ग असेल. हे दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. या प्रकल्पासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एकूण १०.२५ किमीच्या दुहेरी बोगद्यात प्रत्येकी तीन मार्गिका असतील. त्यातील दोन मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध असतील, तर एक मार्गिका आपत्कालीन असेल. भुयारीकरणासाठी चार टीबीएम यंत्रे लागणार आहेत. या यंत्रांची निर्मिती पाहिल्यांदाच भारतात होणार आहे. ही यंत्रे तयार करण्यासाठी मात्र वेळ लागणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात उत्कृष्ट प्रादेशिक कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या मार्गामुळे ठाणे ते बोरिवली दरम्यानचा सध्याचा ६० मिनिटांचा प्रवास १५ ते २० मिनिटांपर्यंत कमी होईल, तर या प्रकल्पामुळे १०.५ लाख मेट्रिक टन इंधनाची बचत होईल. तसेच कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जनात ३६ टक्के कपात होण्यासदेखील हा प्रकल्प योगदान देईल.