थेंबे थेंबे तळे साचे...

    10-Jul-2024   
Total Views |
systematic investment plan


‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ या संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकट्या जून महिन्यात भारतीयांनी म्युच्युअल फंडच्या ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (SIP) मध्ये 21,262 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली. त्यानिमित्ताने मागील एका दशकात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांच्या वाढत्या कलाचे केलेले आकलन...

जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, सरकारची धोरणात्मक सातत्यता, रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्यामुळे उत्पादनात झालेली वाढ, अर्थव्यवस्थेचे झालेले डिजिटलीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तरुण भारतीयांमध्ये निर्माण झालेली महत्त्वाकांक्षा, या कारणामुळे मागील दशकाभरात शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांची संख्याही लक्षणीय वाढली. आज भारतात 15 कोटींहून अधिक डीमॅट खाते उघडण्यात आली आहेत. प्रत्येक महिन्याला या आकड्यांत लाखो नवीन खात्यांची भर पडताना दिसते. 2024च्या मार्च महिन्यात 31 लाखांहून अधिक नवीन डीमॅट खाती उघडण्यात आली. यावरून आपल्याला लक्षात येईल की, शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडे भारतीयांचा ओघ वाढत चालला आहे.

डीमॅटद्वारे स्वत: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबरोबरचं भारतीय गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याकडेसुद्धा कल वाढलेला दिसतो. अपुरा वेळ, शेअर बाजाराचे संपूर्ण ज्ञान नसणे आणि बाजारात केलेल्या गुंतवणुकीवर जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणूकदार स्वत: शेअर बाजारात गुंतवणूक न करता, म्युच्युअल फंडला प्राधान्य देतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेला पैसा तज्ज्ञ फंड व्यवस्थापकांच्या सल्ल्याने हाताळला जातो. त्यामुळे शेअर बाजारात होणार्‍या चढ-उताराची जोखीम कमी होते. गुंतवणुकीच्या बाबतीत कायम सावध भूमिका घेण्याचा स्वभाव असणार्‍या भारतीयांमध्ये म्युच्युअल फंड लोकप्रिय होत आहे. म्युच्युअल फंड लोकप्रिय होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, लोकांमध्ये गुंतवणुकीविषयी निर्माण झालेली जागरूकता. महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांच्यासारखे लोकप्रिय खेळाडू म्युच्युअल फंडचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ आहेत. त्यामुळे सर्वसामान्य भारतीयांमध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीविषयी जागरूकता निर्माण झाली असून, त्याचाच सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतो.

‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी जून 2024 मध्ये एकूण 40,608 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली. यामध्ये ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स’ (डखझ)चा वाटा हा 21,262 कोटी रुपयांचा. मागच्या 12 महिन्यांपासून ‘एसआयपी’ गुंतवणूक वाढत आहे. मे महिन्यात ‘एसआयपी’ गुंतवणुकीचा आकडा 20,904 कोटी रुपये होता. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी विविध प्रकारचे म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंडच्या ‘मल्टीकॅप्स’ योजनेतील फंडात जूनमध्ये 4,709 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, तर ‘लार्ज कॅप्स’मधील गुंतवणूक 46 टक्क्यांनी वाढून 970 कोटी रुपयांच्या तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे, तर ‘स्मॉल कॅप’मधील गुंतवणूक 16 टक्क्यांनी वाढून 2,260 कोटी रुपये आणि ‘मिड कॅप’मधील गुंतवणूक तीन टक्क्यांनी वाढून 2,528 कोटी रुपये झाली आहे.

या गुंतवणुकीच्या आकड्यांबरोबरच ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ने नवीन खात्यांची माहिती आपल्या अहवालात दिली आहे. आकडेवारीनुसार, जूनमध्ये एकूण 55 लाख नवीन ‘एसआयपी’ खाती उघडण्यात आली. त्याच वेळी, 32.35 लाख एसआयपी खाती परिपक्व झाली किंवा बंद झाली. यासह एकूण ‘एसआयपी’ खात्यांची संख्या 8.98 कोटी झाली आहे. ‘एसआयपी’सह म्युच्युअल फंडच्या एकूण खात्यांची संख्या दि. 31 मे 2024 पर्यंत 18.60 कोटी इतकी होती. अहवालातील आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड उद्योगाची जूनपर्यंत ’ईीशीीं णपवशी चरपरसशाशपीं (अणच)’ 61.33 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. हा आकडा पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. यावरून आपल्याला भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाची व्याप्ती लक्षात येईल. मागच्या दहा वर्षांत म्युच्युअल फंड उद्योग सहापटीने वाढला आहे. भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाने दि. 31 मे रोजी दहा लाख कोटींचा टप्पा पार केला होता.

त्यानंतर दि. 31 मे 2019 रोजी म्युच्युअल फंड उद्योग 25.94 लाख कोटी होता, तर आता हा आकडा 61 लाख कोटींहून अधिक झाला आहे. म्हणजेच मागच्या पाच वर्षांत म्युच्युअल फंड उद्योग दुपटीहून अधिक वाढला आहे. भारतीयांनी म्युच्युअल फंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे भारतीय शेअर बाजरातील परदेशी गुंतवणूकदारांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. ‘एएमएफआय’च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2021 ते जून 2024 पर्यंत, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये 5.99 लाख कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. याच कालावधीत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून काढलेल्या 33,361 कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण कितीतरी पटीने अधिक आहे. यावरून हे स्पष्ट होेते की, भारतीय शेअर बाजाराची सूत्र आता, काही मोजक्या धनदांडग्या आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या हाती न राहता, सर्वसामान्यांच्या हाती जात आहेत. भविष्याविषयी असलेला आशावाद आणि वाढती महत्त्वाकांक्षा यामुळे भारतीय एकेकाळी ‘जुगार’ समजल्या जाणार्‍या शेअर बाजारात अभ्यासपूर्ण गुंतवणूक करून भारताला विकसित करण्यासाठी हातभार लावत आहेत आणि झालेल्या विकासाचे लाभार्थीसुद्धा होत आहेत.

आजघडीला अवघ्या दहा रुपयांपासून ‘एसआयपी’ सुरू करण्याची सुविधा म्युच्युअल फंड देतात. त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी प्रतिमहा गुंतवणूक करण्याचा लोकप्रिय पर्याय म्हणून म्युच्युअल फंडकडे पाहिलं जातं आहे. एकूणच काय तर म्युच्युअल फंडच्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीला ’थेंबे थेंबे तळे साचे’ ही मराठी म्हण अतिशय समर्पकच.


श्रेयश खरात

वाणिज्य शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC), अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यासक. इतिहास, अर्थकारण, राजकारण आणि क्रिकेट इत्यादी विषयांची आवड.