विधानसभेत मराठा आरक्षण प्रश्नी गदारोळ! विरोधकांच्या अनुपस्थितीचा मुद्दा गाजला
10-Jul-2024
Total Views | 53
मुंबई : मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. परंतू, विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. दरम्यान, आज विधानसभेत त्याचे पडसाद उमटले असून सभागृहात एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे ५ मिनिटांसाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी दांडी मारली. त्यामुळे भाजप आमदार अमित साटम यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. मराठा आणि ओबीसींचं विरोधकांना काहीही पडलेलं नसून त्यांना फक्त राजकारण करायचं आहे, असे त्यांनी म्हटले.
त्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीदेखील या मुद्यावर आक्रमक भूमिका मांडली. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार वेलमध्ये उतरले. त्यामुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने विधानसभा अध्यक्षांनी सभागृह ५ मिनिटांसाठी तहकूब केले.