मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात केवळ गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सारस पक्ष्यांचे (sarus bird) अस्तित्व आहे. याठिकाणी वन विभाग आणि सेवा संस्थेने गेल्या आठवड्यात केलेल्या सारस गणनेमधून एकूण ३२ सारस पक्ष्याच्या (sarus bird) अस्तित्वाची नोंद केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यातील सारस पक्ष्यांच्या (sarus bird) संख्येत सातत्यपूर्ण घट होत आहे. ही बाब राज्यातील सारस पक्ष्यांच्या (sarus bird) अस्तित्वाच्या अनुषंगाने चिंतेची बाब आहे.
महाराष्ट्रात वाघ-बिबट्यांप्रमाणे सारस पक्ष्यांचीही दरवर्षी गणना होते. 'सस्टेनिंग एनव्हायरमेंट अँड वाईल्डलाईफ असेंबलाज' (सेवा) या संस्थेकडून ही गणना केली जाते. ही संस्था २००४ पासून दरवर्षी या पक्ष्यांची गणना करत आहे. महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात संस्थेचे स्वंयसेवक हे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही गणना करतात. यंदा ही गणना २३ जून रोजी या जिल्ह्यांमध्ये पार पडली. या गणनेअंती महाराष्ट्रात केवळ ३२ सारस पक्ष्यांचे वास्तव्य असून मध्यपद्रेशातील बालाघाट जिल्ह्यात ४५ सारस पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. राज्यात गोंदियामध्ये २८, तर भंडारा जिल्ह्यात ४ सारस पक्षी असल्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी या गणनेअंतर्गत राज्यात ३५ सारस पक्षी आढळून आले होते. यंदा या संख्येत घट झाली आहे. गेल्या वर्षांमध्ये देखील सारस पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट आढळून आली आहे. २०२० साली राज्यात ५० सारस होते, यंदा ही संख्या ३२ वर येऊन ठेपली आहे. सारस हा दुर्मीळ आणि राजबिंडा पक्षी आज फक्त दोन आकडी संख्येत केवळ पूर्व विदर्भातील दोन जिल्ह्यापुरता सिमीत राहिला आहे. त्यामुळे त्याची आहे ती संख्या वाढविण्यासाठी त्यांचे अधिवास अबाधित राखण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न होणे आवश्यक आहे.
अधिवासाचे संवर्धन गरजेचे
तत्कालीन सारस गणनेनुसार महाराष्ट्र राज्यात ३२ सारस पक्षी आढळले. ही चिंतेची बाब आहे. सारस पक्ष्यांच्या घरट्याना आवश्यक असलेला अधिवास क्षेत्र हे कमी व नित्कृष्ठ होत आहे, ही अत्यंत महत्वाची आणि गंभीर बाब आहे. सारस संरक्षणासाठी शेतकरी आणि स्वयंसेवी संस्था सह प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. - सावन बहेकार, अध्यक्ष, सेवा
वर्ष
संख्या (भंडारा-गोंदिया मिळून)
२०२०
५०
२०२१
४१
२०२२
३७
२०२३
३५
२०२४
३२
कशी पार पडली गणना ?
रविवार, दि. २३ जून रोजी गोंदिया जिल्ह्यात एकूण ७०-८० ठिकाणी सेवा संस्थेचे सदस्य, स्थानिक शेतकरी, सारस मित्र स्वयंसेवी आणि वनविभाग गोंदिया यांच्या कर्मचार्यांनी सारस गणना यशस्वी रित्या पूर्ण केली. गोंदिया जिल्ह्यसाठी ३९ चमू (टिम) तयार करुन सारस पक्ष्यांच्या विश्रांतीच्या (Roosting) जागेवर सकाळी ०४.४५ ते ०९.०० वाजेपर्यंत थेट जाऊन गणना करण्यात आली. प्रत्येक चमुमध्ये (टिम) मध्ये ५-६ स्वयंसेवी सदस्य व वनविभागाचे कर्मचारी/अधिकारी एकूण ११५-१२५ सहभागी यांचा समावेश होता. दरम्यान ६ ते ८ दिवस काही ठराविक ठिकाणी चमूने पुन्हा (टिम) भेट देत गणना व निरीक्षण केले. त्यातून सारस पक्ष्यांचा संख्येचा व वारंवार मोजणीत आलेले सारस यांचा अचूक अंदाज घेण्यात आला.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.