मुंबई : मान्सून दाखल झाल्यानंतर ही पिण्याच्या पाण्याची अडचण मुंबईत कायम आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील साठा कमी झाल्याने मुंबईत पाणीकपात करण्यात आली होती. पण जूनमध्ये पाऊस पडून ही अपेक्षित पाणीसाठा धरणात नाही. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.
मुंबईत यावर्षी २ दिवस आधी मान्सून दाखल झाला. मात्र पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. तुरळक पाऊस पडत असल्याने अपेक्षित पाणीसाठा धरणात झालेला नाही. मुंबई महापालिकेने ७ जलाशयांच्या अहवालात सांगितल्याप्रमाणे, सध्या ७ धरणांमध्ये केवळ ८५ हजार ६०५ एमएलडी इतका पाणीसाठा असून रोज ३८०० एमएलडी पाणी मुंबईसाठी लागते. त्यामुळे जून महिना उलटून ही पाणीसाठा ६ टक्के झालेला नसल्याची माहिती देण्यात आलेली आहे. ज्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीला आणखी काही दिवस सामोरे जावे लागणार आहे.