मुंबई : "मी २५ देशांत जाऊन आले पण त्या देशांतील त्यांच्या सगळ्या संस्कृती मृत बनल्या आहेत. त्यांना त्यांच्या संस्कृतीविषयी अजिबात जिव्हाळा उरलेला नाही. याउलट आपल्याकडे इतकी आक्रमणं झालेली असतानाही आपण आपल्या संस्कृतीला घट्ट चिकटून आहोत आणि ती संस्कृती आपण जिवंत ठेवली आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी त्याग केला असून तो जिवंत ठेवण्यासाठी मी हा यज्ञ पुढे नेत आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर शेफाली वैद्य यांनी केले आहे. शनिवार, २९ जून रोजी ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशन सप्तरंग आयोजित 'सरस्वती पुरस्कार' सोहळ्यात त्या बोलत होत्या.
या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील ७ कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले. यात लेखिका, स्तंभलेखिका आणि ब्लॉगर शेफाली वैद्य, उद्योजिका अदिती कारे-पाणंदीकर, बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या हिमांगी नाडकर्णी, राजकारण आणि समाजसेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या निर्मला सामंत-प्रभावळकर, इतिहास अभ्यासक पद्मश्री राव, पाककला तज्ञ स्मिता देव, प्रसिद्ध अभिनेत्री शृजा प्रभुदेसाई इत्यादी प्रतिष्ठित महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.
हे वाचलंत का? - मुंबई पदवीधर निकालातील मतपत्रिका छाननी प्रक्रियेत मोठी अपडेट!
ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशनतर्फे दरवर्षीच विविध स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतू, यावर्षी पहिल्यांदाच महिलांसाठी अशा प्रकारचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजित गुंजिकर यांच्या उपस्थितीत समधुर गाण्यांच्या सोबतीने हा दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडला. पुरस्कार सोहळ्यानंतर या सर्व पुरस्कार प्राप्त महिलांचा परिसंवादही आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना सरस्वती पुरस्कार प्राप्त झालेल्या प्रसिद्ध पाककला तज्ञ स्मिता देव म्हणाल्या की, "आपल्या कलेविषयी आपल्याला आत्मविश्वास असायला हवा. ज्ञान असल्याशिवाय कुठलीही कला विकसित होत नाही." तसेच पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध उद्योजिका अदिती कारे-पाणंदीकर या इंडिको रेमेडिज या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर हिमांगी नाडकर्णी या एन.के.जी.एस.बी. बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. त्यांच्या कारकिर्दीत या बँकेला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार मिळाला आहे.
या कार्यक्रमात निर्मला सामंत-प्रभावळकर यांनादेखील सरस्वती पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी पाहिली महिला महापौर बनण्याच्या मान मिळवला असून त्या राजकरण क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच पुरस्कार प्राप्त झालेली श्रुजा प्रभू देसाई ही प्रसिद्ध अभिनेत्री असून अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
इतिहास अभ्यासक पद्मश्री राव यासुद्धा सरस्वती पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सर्वदूर पोहोचवण्याचं काम त्या करत आहेत. त्यांनी आपल्या सुमधुर आवाजात कविराज भूषण सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.