छपाईचा व्यवसाय सोडून पर्यावरणाला वाहिलेले ग्रंथालय उभारून, त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला. जाणून घेऊया नाशिकच्या अजित शरद बर्जे यांच्याविषयी...
नाशिकमध्ये जन्मलेले अजित शरद बर्जे, यांचे वडील डॉक्टर, तर आई गृहिणी. वडील रुग्णांकडून फक्त पाच रुपये शुल्क म्हणून घेत होते, त्यामुळे परिसरात ते चांगलेच परिचित होते. जे.डी.सी. बिटको शाळेतून अजित 1984 साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले. शाळेत विज्ञान आणि भूगोल विषयाची त्यांना विशेष आवड. दहावीनंतर त्यांनी प्रिंंंंटिंग इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. यादरम्यान त्यांचे भरपूर फिरणे झाले. स्कूटरवर अनेक नैसर्गिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. पुण्यात अप्रेंटिसशिप पूर्ण करत असताना, त्यांना चांगला अनुभव मिळाला. पुढे जळगाव येथील एका छपाई कंपनीत ते रुजू झाले. मुंबईतील लोअर परळ येथील प्रेसमध्येही त्यांनी, सहा वर्ष नोकरी केली. कंपनीला विस्तार करायचा असल्याने त्याकरिता नाशिकची निवड झाली. अजित नाशिकचेच असल्याने, नाशकात एमआयडीसीमध्ये कंपनी सुरू झाली. याठिकाणी दहा वर्षे काम केल्यानंतर 2007 साली काहीतरी नवे करण्याच्या उद्देशाने, अजित यांनी छपाई व्यवसाय सोडला. एकदा वनविभागाला नांदूर मध्यमेश्वरसंदर्भात, एक पत्रक तयार करायचे होते. त्यासंदर्भात तत्कालीन मानद वन्यजीव संरक्षक विश्वरूप राहा यांच्याशी चर्चेदरम्यान ओळख झाली. हळूहळू अजित पर्यावरण आणि निसर्गाशी जोडले गेले.
शेतीची आवड असल्याने, एक वर्ष नेरळला सगुणा बाग या कृषी पर्यटन केंद्रात त्यांनी विविध प्रयोग आणि शेतीसंदर्भात शिक्षण घेतले. यावेळी चंद्रशेखर भडसावळे यांच्यामुळे शेतीसंदर्भात, बर्याच उपक्रमांत त्यांनी सहभाग घेतला. पुढे पर्यावरणासंदर्भात काही सुरू करता येतंय का, असा विचार आला. पत्नी मनीषा आणि अजित बर्जे या दोघांनीही, पर्यावरणाला वाहिलेले ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी देशातील विविध ठिकाणच्या ग्रंथालयांना त्यांनी भेटी दिल्या. पुण्यात दिलीप कुलकर्णी यांची भेट झाली. पर्यावरण म्हणजे फक्त झाडे लावणे, प्लास्टिक बंदी आणि पाणी वाचवणे नव्हे, तर रोजच्या जगण्यातून पर्यावरण संवर्धन कसे करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे, असे कुलकर्णी यांचे मत होते. जीवनशैलीमध्ये बदल झाला, तर पर्यावरण संवर्धन होऊ शकते, असेही ते सांगत असत. जिथे गर्दी आहे, तिथे जाऊ नका, जिथे गरज आहे तिथे जा, असे अभय बंग यांनी अजित यांना भेटीदरम्यान म्हटले होते. अशा पद्धतीने वैचारिक परिवर्तन होत गेले, आणि 2009 साली शुभारंभ झाला ’कार्वी रिसोर्स लायब्ररी’चा. कार्वी ही सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आढणारी दुर्मीळ वनस्पती आहे. दर सात वर्षांनी त्याला फुलं येतात. फुलल्यानंतर संपूर्ण डोंगर जांभळ्या रंगाने खुलून दिसतो. कार्वीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अजित यांनी आपल्या ग्रंथालयालादेखील ‘कार्वी रिसोर्स लायब्ररी’ असे नाव दिले.
ग्रंथालयाची नवी इमारत बांधतानाही मातीच्या विटा न वापरता, औष्णिक विद्युत केंद्रातील राखेपासून बनविलेल्या विटा अर्थात ‘फ्लाय अॅश ब्रिक्स’चा वापर करण्यात आला. कपाटे जुन्या टाकाऊ लाकडापासून बनविलेली आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. प्लास्टर, पीओपी असं काहीही केलेलं नाही. हवा खेळती राहावी, म्हणून खिडक्यादेखील मोठमोठ्या आहेत. शंख-शिंपले, पक्षी, प्राणी, वनस्पती, गड-किल्ले, संशोधनपर संदर्भ पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. पर्यावरणासंदर्भात आवश्यक अनेक पुस्तके, याठिकाणी वाचकांसाठी उपलब्ध आहेत. नाशिकच्या जयरामभाई हॉस्पिटलजवळ असलेल्या या ग्रंथालयात, ग्रामीण भागातील मुलेही सर्वाधिक येतात. पुस्तके घरपोच पोहोचविण्याची सुविधा सुरू केल्याने, ग्रंथालयाला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. 2013 साली ब्रिटिश लायब्ररी यांच्यासोबत करार केला. याद्वारे लाखभर ई-बुक्स ,वाचकांना वाचनासाठी उपलब्ध झाल्या.
पुढे याठिकाणी मुलांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकादेखील उपलब्ध करून देण्यात आली. अजित यांना विश्वरूप रहा, चंद्रशेखर भडसावळे, दिलीप कुलकर्णी यांच्यासह पत्नी मनिषा बर्जे यांनी साथ दिली. नोकरी सोडल्यानंतर घरात पैसे कसे येणार, याचा विचार न करता पत्नीने अजित यांना मोलाची साथ दिली. निसर्ग आणि पर्यावरणावर काम करताना, पर्यावरण अध्ययन केंद्र सुरू करण्याचा अजित यांचा मानस आहे. वीणा गवाणकर, मोहन आपटे, श्रीधर महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांनी या ग्रंथालयाला भेट दिली आहे. पुढे अजित यांनी पर्यावरणासंदर्भात, अनेक विषयांवर मासिकांमध्ये लेख लिहिण्यास सुरूवात केली. गुगलवर हरवायला होतं, काय शोधायचं ते मिळतं नाही आणि ते योग्य आहे का याचीही साशंकता नसते. त्यामुळे पुस्तकं वाचण्यास प्राधान्य द्या. काही मदत लागली तर, मीदेखील योग्य मार्गदर्शन करेन, असे अजित सांगतात. छपाई व्यवसाय सोडून, पर्यावरणाला वाहिलेले ग्रंथालय उभारून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार्या अजित बर्जे यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा...