नुकताच लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आणि एनडीएने २९४ जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा बहुमत प्राप्त केलं. तर महाराष्ट्रात यावेळी महायूतीला १७ जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीने ३० जागांवर विजय मिळवत सरशी केली. मात्र, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या लढाईत शिंदेंची शिवसेनाच सरस ठरल्याचं चित्र आहे. शिवसेनेतील फुटीनंतर झालेली ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती आणि राज्यातील अनेक जागांवर शिवसेना विरुद्ध उबाठा असा थेट सामना होता. परंतू, निकालात उद्धव ठाकरेंच्या पक्षाने जरी जास्त जागांवर विजय मिळवला असला तरी शिंदेंची शिवसेना उबाठा गटाच्या एक पाऊल पुढे असल्याचं पाहायला मिळालं. तर राज्यात शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत असणाऱ्या जागा कोणत्या आणि कोणत्या जागेवर कुणाला विजय मिळाला याबद्दल जाणून घेऊया.
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत केलेल्या बंडाला जवळपास दोन वर्ष झालेत. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. आमदार गेले, खासदार गेले. एवढचं काय तर राज्यातील पक्ष संघटनेतील पदाधिकारीसुद्धा एकनाथ शिंदेंकडे गेलेत. त्यानंतर निवडणुक आयोग, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असं एक-एक करत सर्व पातळीवर कायदेशीर लढाई झाली आणि पक्षाचं नाव आणि चिन्हही एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं. एकूणच काय तर उद्धव ठाकरेंना २०१९ मध्ये पवारांसोबत केलेला महाविकास आघाडीचा प्लॅन पुरता महागात पडला. मागच्या दोन वर्षात त्यांच्या हातातून पद आणि पक्ष दोन्ही गेलं. पण, उद्धव ठाकरे मात्र, सच्चे शिवसैनिक आपल्यासोबतच असल्याचा दावा करत आले आहेत. त्यामुळे त्यांचा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांना निवडणुकांमध्ये विजय मिळवणं गरजेचं होतं.
शिवसेनेतील फुटीनंतर यावर्षी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात उबाठा गटाला सर्वाधिक २१ जागा देण्यात आल्या. महत्त्वाचं म्हणजे, या २१ पैकी १३ जागांवर ठाकरेंच्या नेतृत्वातील उबाठा गटाची लढत ही शिवसेनेच्या उमेदवारांसोबत होती. त्यामुळे या १३ जागा शिवसैनिक आणि जनता कोणाच्या बाजूने आहे, हे ठरवणार होत्या. म्हणूनच या १३ जागा शिवसेनेसाठी आणि उबाठा गटासाठी प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेनेच सरशी केल्याचं दिसलं. शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढाई असलेल्या १३ जागांपैकी तब्बल ७ जागांवर शिंदेंच्या शिवसेनेनं विजय मिळवला तर ६ जागा उबाठा गटाकडे गेल्यात.
महाराष्ट्रात ठाणे, कल्याण, मुंबई उत्तर-पश्चिम, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मावळ, हातकणंगले, बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक शिर्डी, यवतमाळ आणि हिंगोली या १३ जागांवर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना विरुद्ध उबाठा गट अशी थेट लढत होती. दुपारपर्यंत जाहीर झालेल्या निकालात शिंदेंच्या शिवसेनेला ६ जागांवर तर उबाठा गटाला ७ जागांवर विजय मिळाल्याचं जाहीर झालं. मात्र, काही वेळातच पासे पलटले आणि यातली आणखी एक जागा शिंदेंकडे आली. ती जागा आहे मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाची. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांना मतमोजणीत लीड मिळाली होती. ते विजयी झाल्याचं जाहीरही करण्यात आलं होतं. पण शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आणि त्यानंतर वायकरांनी ४८ मतांनी आघाडी घेत उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला. त्यामुळे अंतिम निकालानंतर आलेल्या आकडेवारीत शिंदे आणि ठाकरेंच्या लढाईत शिंदेंचा ७ तर ठाकरेंचा ६ जागांवर विजय झाल्याचं स्पष्ट झालं.
दुसरीकडे, शिंदेंनी जिंकलेल्या जागांपैकी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. या मतदारसंघातून तब्बल चार टर्म खासदार असलेले उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मागे टाकत शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी विजय मिळवलाय. एवढंच नाही तर AIMIM चे इम्तियाज जलील हेसुद्धा चंद्रकांत खैरेंपेक्षा जास्त मतं घेत दुसऱ्या क्रमांकावर होते. संदीपान भुमरेंनी तब्बल १ लाख ८० हजार मतांधिक्याने चंद्रकांत खैरेंचा दारूण पराभव केलाय. त्यामुळे उबाठा गटासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जातंय.
शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या लढाईत ठाकरे गटाने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, नाशिक, शिर्डी, यवतमाळ आणि हिंगोली या सहा जागांवर विजय मिळवलाय. तर शिंदेंच्या शिवसेनेने ठाणे, कल्याण, मुंबई उत्तर-पश्चिम, मावळ, हातकणंगले, बुलढाणा आणि संभाजीनगर या ७ जागांवर विजय मिळवत सरशी केलीये. एकूणच काय तर एकनाथ शिंदेंची बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंवर असलेली श्रद्धा आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका याला शिवसैनिकांचा पाठिंबा असल्याचं चित्र आहे. शेवटी शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या लढाईत ठाकरे मागे पडले तर शिंदेंनी सरशी केल्याचं स्पष्ट झालंय.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....