मालदीवचा दिव्याखाली अंधार

    30-Jun-2024   
Total Views |
black-magic-on-president-muizzu-maldives


चीनच्या इशार्‍यावर भारताला फुसक्या डरकाळ्या फोडणार्‍या, मालदीवच्या मोईज्जू सरकारमध्ये सध्या सगळ्याच आगळ्यावेगळ्या गोष्टी सुरू आहे. आता राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू यांच्यावर, त्यांच्याच सरकारमधील एका महिला मंत्र्याने काळी जादू करण्याचा प्रयत्न केला. फातिमा शमनाज अली सलीम असे या महिला मंत्र्याचे नाव असून, त्या मालदीवच्या पर्यावरणमंत्री आहेत.

पोलिसांनी फातिमा यांच्या घरी छापे टाकल्यानंतर, घरातून अनेक आपत्तीजनक गोष्टी सापडल्या. या गोष्टींचा वापर त्या मोईज्जू यांच्यावर काळी जादू करत होत्या. काळी जादू करून शमनाज राष्ट्रपती मोईज्जूंचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत होत्या, ज्यामुळे त्यांना आणखी चांगले मंत्रालय मिळेल. दरम्यान, या प्रकरणी त्यांना आणि आणखी काही साथीदारांना अटक करण्यात आली आहे. याध्ये शमनाज यांच्या भावाचादेखील समावेश आहे.

मालदीवमध्ये २०१५ मध्ये एक सूचना जारी करण्यात आली होती. समाजात काळ्या जादूचा वापर वाढत चालला आहे. लोकांनी यापासून दूर राहिले पाहिजे, अन्यथा परिणाम अतिशय वाईट होतील. मुळात मालदीवमध्ये काळी जादू करणे, हा काही गुन्हा नाही. मात्र, इस्लामिक कायद्यानुसार काळ्या जादूमध्ये दोषी आढळल्यास, शिक्षेची तरतूददेखील आहे. या कायद्यानुसार तिथे सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.

मालदीवच्या सत्ताधारी पक्षाकडून संसदीय निवडणूक लढविणार्‍या एका युवकावर, काळी जादू केल्याप्रकरणी ६० वर्षीय नागरिकाला अटक करण्यात आली होती. राष्ट्रपती कुठे जाणार आहे, कधी काय करणार आहे, अशा अनेक गोष्टी शमनाज यांना माहिती होत्या. पर्यावरणमंत्री होण्यापूर्वी शमनाज हेनविरू साउथच्या माले सिटी कौन्सिलच्या नगरसेवक होत्या. मोईज्जू सरकारमध्ये मंत्रीपद स्वीकारण्यासाठी त्यांनी, यावर्षी एप्रिलमध्ये कौन्सिलचा राजीनामा दिला होता. यापूर्वी त्या राष्ट्रपती कार्यालयात महत्त्वाच्या पदावर होत्या. त्या अ‍ॅडम रमीझची पत्नी होत्या. नुकताच, त्यांचा घटस्फोट झाला आहे.

रमीझ हा एक वरिष्ठ अधिकारी असून, तो मोईज्जू यांच्या जवळचा मानला जात होता. त्याचप्रमाणे मोईज्जू यांच्या पत्नीने शमनाज यांना फसविण्याचा प्रयत्न केला असल्याचे, बोलले जात आहे. कारण, कथित स्वरूपात शमनाज यांनी मोईज्जू यांच्या पत्नीचा एक व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओत त्या पबमध्ये थिरकताना दिसत आहे. मात्र, या प्रकरणी मालदीव सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.या प्रकरणात आता तपास आणि चौकशी सुरू राहील, मात्र भारताला फुसका दम भरणार्‍या मालदीवचा, तर दिव्याखालीच अंधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मालदीवमध्ये काळ्या जादूला ’फांदिता’ किंवा ’सिहुरू’ नावाने ओळखले जाते. इस्लामिक कायद्यांमध्ये हे हराम मानले जाते, आणि काळी जादू करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाते. मात्र, मालदीवमध्ये काळ्या जादूसारख्या गोष्टींची मुळे खोलवर असल्याचे बोलले जात आहे. यंदा जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी सामाजिक माध्यमावर येथील व्हिडीओ आणि छायाचित्रे पोस्ट केली होती. यानंतर मात्र मालदीवचा चांगलाच जळफळाट झाला होता. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत, मालदीवच्या मंत्री मरियम यांनी आपत्तिजनक शब्द वापरले होते. त्याचप्रमाणे, अन्य काही मंत्र्यांनीही भारतातील हॉटेलविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

त्यानंतर, पंतप्रधान मोदींनी कोणतेही उत्तर न देताना फक्त लक्षद्वीपचा दौरा करत, मालदीवची बोलती बंद केली. कारण, मोदींच्या दौर्‍यानंतर मालदीवऐवजी लक्षद्वीपकडे पर्यटकांचा ओढा वाढला. मालदीवसाठी नियोजित अनेक ट्रीप भारतीयांनी रद्द केल्या. परिणामी, संबंधित मंत्र्याला ट्विट डिलीट करावे लागले. श्रीलंकेने चीनला ठेंगा दिल्यानंतर, चीनने आपला मोर्चा मालदीवकडे वळवला. त्यानंतर ’चीन बोले आणि मालदीवचे राष्ट्रपती मोईज्जू चाले’, अशी स्थिती निर्माण झाली. परंतु, असे असले तरीही भारताने आपला शेजारधर्म सोडला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला मोईज्जू यांनी हजेरी लावली होती. मात्र, मालदीवने आपल्या घरातील अंधार दूर करावा, आणि मग भारताशी तुलना करण्याचा प्रयत्न करावा.

७०५८५८९७६७

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.