ब्रेकिंग न्यूज! उद्धव ठाकरेंवर कारवाई करा; केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश
03-Jun-2024
Total Views | 708
मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर कारवाईची टांगती तलवार आहे. निवडणूकीच्या दिवशी पत्रकार परिषद घेतल्याने उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. ठाकरेंवर कारवाई करा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.
दि. २० मे रोजी राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यादिवशी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदान संथगतीने सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तीव्र आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. ठाकरेंनी खोटी व दिशाभूल करणारी विधाने करीत आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.
या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत नेमके काय झाले, याची माहिती सादर करावी, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.