शेख हसीना यांचा दोनदिवसीय भारत दौरा सर्वार्थाने चर्चेत राहिला. दोन्ही देशांमधील चांगल्या संबंधांवर, परराष्ट्र धोरणाविषयीही बरीच चर्चा रंगली. पण, या दौर्यामध्ये आणि एकूणच द्विपक्षीय चर्चांमध्ये बांगलादेशमधून भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासंबंधीही कठोर पावले उचलणे अपेक्षित होते. कारण, दिवसेंदिवस भारतातील बांगलादेशी घुसखोरांची संख्या ही वाढताना दिसते. त्यानिमित्ताने भारतातील बांगलादेशी घुसखोरीचे वास्तव आणि त्यावरील उपाययोजना यांचा ऊहापोह करणारा हा लेख...
सर्वसमावेशक व्यापार करारावर सहमती
भारत आणि बांगलादेशने विविध नवीन क्षेत्रांमध्ये विस्तार करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक करारांवर नुकतीच स्वाक्षरी केली. बांगलादेशच्या पंतप्रधान दि. 21-2 जून रोजी दोनदिवसीय भारत दौर्यावर होत्या. गेल्या 15 दिवसांत हा त्यांचा दुसरा भारत दौरा होता. “आज आम्ही नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी भविष्यवादी दृष्टिकोन तयार केला आहे. हरित, डिजिटल, समुद्री क्षेत्राशी संबंधित आणि अंतराळ यासारख्या क्षेत्रातील करारांचा फायदा दोन्ही देशांच्या तरुणांना होईल,” असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत हा बांगलादेशचा प्रमुख शेजारी, प्रादेशिक भागीदार आणि विश्वासू मित्र असल्याचा पुनरुच्चार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केला. “बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारत सरकार आणि येथील नागरिकांचे योगदान मला कृतज्ञतेने आठवते. आम्ही सुरक्षा, व्यापार, जोडण्या, नद्यांचे पाणीवाटप, ऊर्जा, प्रादेशिक आणि बहुपक्षीय सहकार्य आदी क्षेत्रांतील सहकार्यावर चर्चा केली,” असे हसीना यांनी यावेळी सांगितले.
भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणांतर्गत बांगलादेश हे महत्त्वाचे राष्ट्र. उभय देशांमध्ये सुरक्षा, व्यापार, वाणिज्य, ऊर्जा, दळणवळण, विज्ञान व तंत्रज्ञान, संरक्षण व सागरी व्यवहार यासारख्या क्षेत्रांमध्ये भागीदारी आहे. बांगलादेश हा दक्षिण आशियातील भारताचा सर्वांत मोठा भागीदार आहे. 2022-23 मध्ये दोन्ही देशांमध्ये 15.9 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता.
चीनला दक्षिण आशियात रोखण्यासाठीही भारताच्या दृष्टीने बांगलादेश महत्त्वाचा आहे. भारताने योग्य ती काळजी घेतली, तर श्रीलंकेप्रमाणे चीनला बांगलादेशात आपले पाय रोवता येणार नाहीत. म्हणूनच पायाभूत सुविधा प्रकल्प, ऊर्जा यांच्या विकासासाठी भारताने बांगलादेशला आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे. तसेच बांगलादेशबरोबर झालेले 10 करारांचे महत्त्वदेखील अनन्यसाधारण आहे.
बांगलादेशींची भारतामध्ये अविरत घुसखोरी
बांगलादेशबरोबर झालेले करार अर्थातच भारताकरिता फायद्याचे आहेत. परंतु, दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये एका महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे पश्चिम बंगालमधून भारतामध्ये होणारी अविरत बांगलादेशी घुसखोरी. दर एक ते दोन महिन्याला, पाच-सहा बांगलादेशींना महाराष्ट्रातल्या विविध भागांमधून पोलिसांकडून अटक केली जाते. तसेच देशात अटक होणार्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या हजारांमध्ये आहे.
घुसखोरीची काही उदाहरणे
बनावट भारतीय ओळखपत्र घेऊन आरामदायी जीवन जगणार्या एका बांगलादेशी घुसखोराला गुजरातमधून दि. 21 जूनला अटक करण्यात आली. मिनार हेमायत, शुभो सुनील दास नावाच्या बनावट हिंदू ओळखीसह तो भारतात राहत होता आणि त्याच नावाची सर्व बनावट कागदपत्रेही त्याच्याकडे आढळून आली. या कागदपत्रांच्या आधारे तो कतारची राजधानी दोहा येथे दोन वर्षांपासून कामही करत होता.
दुसर्या एका प्रकरणात, भारतात बेकायदेशीररित्या घुसखोरी करणार्या 20 बांगलादेशींना दि. 24 मे रोजी मुंबईतील न्यायालयाने आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच कोल्हापूर पोलिसांनी नुकतीच दोन बांगलादेशी घुसखोर महिलांना अटक केली आहे. या दोघींकडे बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड आणि पॅनकार्डही सापडले. यापूर्वीही उंचगाव-गांधीनगर, पुणे, सिंधुदुर्ग, नवी मुंबई येथेही अशाच बांगलादेशी घुसखोरांना अटक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
नुसते घुसखोर नव्हे, तर ‘अल कायदा’चे दहशतवादी
‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना (बहार मिया आणि विरल मिया) दि. 13 मे रोजी आसाममधील गुवाहाटी येथे अटक करण्यात आली. भारतीय पारपत्र (पासपोर्ट) मिळवून मुंबईत राहणार्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात दहशतवादविरोधी पथकाला यश आले. या आरोपींनी बेकायदेशीररित्या भारतीय नागरिकत्व मिळवून लोकसभा निवडणुकीत मतदानही केले होते. आरोपींपैकी एक जण या पारपत्राच्या आधारे परदेशात नोकरीला गेला आहे. सामान्य माणसाला सरकारी दाखले किंवा शिधावाटपकार्ड बनवण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या पायर्या अनेकदा झिजवाव्या लागतात. दाखले बनवण्यासाठी महिना-महिना फेर्या माराव्या लागतात. मात्र, बांगलादेशातून घुसखोरी करून आलेल्यांना एवढ्या सहज शासकीय कागदपत्रे मिळतातच कशी?
बांगलादेशचे खासदार अन्वर यांची पश्चिम बंगालमध्ये हत्या
बांगलादेशी खासदार अन्वर यांची पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. प. बंगालच्या सीआयडी अधिकार्यांनी या हत्येमागे सोन्याच्या तस्करीचा संशय व्यक्त केला होता. अन्वर आणि त्यांचा अमेरिकेतील मित्र व व्यावसायिक भागीदार यांच्यात सोन्याच्या तस्करीवरून झालेला वाद, हे या गुन्ह्याचे कारण असावे. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी अन्वरच्या हत्येतील प्रमुख संशयित म्हणून एका व्यावसायिकाचे नावही घेतले होते. प. बंगालच्या सीमावर्ती भागांत बांगलादेशी घुसखोरांनी तस्करीचे मोठे जाळे विणले आहे. तस्करी व मानवी व्यापारात गुंतलेले हे माफिया धनाढ्य झालेले आहेत आणि सीमाभागात त्यांनी आपापले बस्तान बसवले आहे. भ्रष्ट सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या राजकीय आश्रयदात्यांची तस्करांसोबत हातमिळवणी झालेली आहे. त्यामुळे अनधिकृत बांगलादेशी घुसखोर सीमा सहज पार करून भारतात प्रवेश करू शकतात. तसेच भारताचे नागरिक म्हणून वास्तव्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेही ते सहज विकत घेऊ शकतात. त्याशिवाय, वैध प्रवेशपत्रांवर प्रवेश करणारे अनेक बांगलादेशी हे भारतात अधिकृत मुदतीपेक्षा अधिकचा काळ वास्तव्य करत आहेत किंवा परतणे टाळतही आहेत.
बांगलादेशी घुसखोरी आणि तस्करी रोखण्याचे सीमा सुरक्षा दलासमोर आव्हान
भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल सीमेच्या रक्षणासाठी तैनात आहे. पण, याच सीमेवर भारतीय जवानाला बांगलादेशी तस्करांकडून मारहाणीची घटना दि. 2 जून रोजी दुपारी 1 च्या सुमारास घडली . तस्करांनी शिपाई भोले यांना बांबूने, लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यांना अक्षरश: ओढत बांगलादेशच्या सीमेपार नेले. भोले यांच्याकडील रेडिओ सेट आणि रायफलही हिसकावली. त्यामुळे असाच प्रश्न उपस्थित होतो की, सीमा सुरक्षा दल जर स्वतःच्याच जवानांचे संरक्षण करू शकत नसेल, तर बांगलादेशी घुसखोरी थांबविण्यात ते कितपत यशस्वी ठरतील?
मग उपाय काय?
दुर्दैवाने बांगलादेशातून होणारी तस्करी रोखण्यात ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ म्हणजे सीमा सुरक्षा दलाला पूर्णपणे अपयश आले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पश्चिम बंगालचे सरकार आणि त्यांचे पोलीस सीमा सुरक्षा दलाला घुसखोरी थांबवण्याकरिता मदत करण्याच्या ऐवजी घुसखोरांना देशात घुसण्यासाठीच मदत करतात. प. बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरी, जमिनी सीमा, समुद्री सीमांमधूनही अविरतपणे सुरु आहे. वेळोवेळी काही बांगलादेशींना अटकही केली जाते. परंतु, बहुतेक भारतात कायमचे घुसतात. बांगलादेशी व्यक्तींना यापुढे येताक्षणीच प्रवेश-अनुमतीची, (Visa On arrival) मुक्त प्रवेशाची परवानगी देऊ नये. वैद्यकीय पर्यटनाची प्रथा (Medical Tourism) बांगलादेशीयांकरिता बंद करावी. अनधिकृत घुसखोरांवर, त्यांच्या बिगरसरकारी संघटनांवर आणि त्यांना पाठिंबा देणार्या सर्व राजकीय पक्षांवर बहिष्कार टाकावा.
तब्बल चार ते पाच कोटी बांगलादेशी घुसखोर आज भारतामध्ये स्थायिक झालेले आहेत. बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर आहे. ही घुसखोरी आणि सीमेवर होणारी तस्करी थांबलीच पाहिजे. बांगलादेशींना Detect करणे, त्यांची नावे मतदारयादीतून Delete करणे व त्यांना बांगलादेशात Deport करणे, हाच यावरचा रामबाण उपाय आहे.
(नि.) ब्रि. हेमंत महाजन