क्या हार में, क्या जीत में, किंचित नही भयभीत मैं

    29-Jun-2024
Total Views | 177

1
 
दुर्गाबाई भागवत या एखाद्या कडाडून कोसळणार्‍या विजेसारख्या इंदिराजींवर तुटून पडल्या होत्या आणि बंदी आलेल्या एका संघटनेने अतिशय शांतपणे, धीराने, अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते तुरुंगात असूनसुद्धा, नेटाने असे काही काम चालू ठेवले, की 19 महिन्यांनंतर का होईना, आणीबाणी उठवावी लागली. ‘क्या हार में, क्या जीत में, किंचित नही भयभीत मैं,’ हे त्या संघटनेच्या नेत्यांनी जगून दाखवले. त्या पे्ररणेतून अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या घरातल्या महिलांनी अचाट कामे करून दाखवली. संविधान आणि लोकशाहीवरचा जीवघेणा हल्ला परतवून लावला. हे युद्ध रणांगणावरचे नव्हते. पण, त्याची तीव्रता तेवढीच होती.
 
लेखाचा मथळा म्हणून दिलेली ही काव्यपंक्ती हिंदी साहित्याचे सुप्रसिद्ध कवी शिवमंगलसिंह सुमन यांची आहे. अटलबिहारी वाजपेयींची ही आवडती कविता होती. स्वतः उत्तम कवी आणि अमोघ वक्ते असणारे अटलजी अनेकदा आपल्या भाषणात ही काव्यपंक्ती बोलून दाखवत असत. आज या काव्यपंक्तीची आठवण होण्याचं कारण आहे, रिक स्ट्राउड या लेखकाचे ताजे पुस्तक ‘आय अ‍ॅम नॉट अफ्रेड ऑफ लुकिंग इन टु द रायफल्स.’ लेखकाने या पुस्तकात अशा व्यक्तींच्या खर्‍याखुर्‍या कहाण्या दिल्या आहेत की, ज्यांनी अतिशय विपरित काळात, विपरित स्थितीत डोके शांत ठेवले. जराही न डगमगतास्वपक्षासाठी शत्रूच्या विरोधात जेवढे म्हणून काम करता येईल, तेवढे केले आणि जेव्हा त्यांना पकडून मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली, तेव्हा जराही न घाबरता, त्या बंदुका झाडणार्‍या पथकाच्या समोर उभ्या राहिल्या. या शिक्षेची पद्धत अशी असते की, मृत्युदंड दिला जाणार्‍या व्यक्तीला एका भिंतीसमोरउभे केले जाते. तिचे डोळे बांधले जातात. बंदूकधारी पथक त्या व्यक्तीसमोर साधारण 20 फूट अंतरावर उभे राहाते. मग कमांडिंग ऑफिसर ’फायर’ची आज्ञा देतो. सगळे बंदूकधारी एकाचवेळी गोळ्या झाडतात. शिक्षा झालेल्या व्यक्तीचा मृतदेह चाळण होऊन खाली कोसळतो. लेखकाने या ठिकाणी वर्णन केलेल्या व्यक्तींनी शिक्षा देणार्‍यांना सांगितले की, “आमच्या डोळ्यांवर पट्टी बांधू नका. आम्हाला मारणार्‍या बंदुकींना आम्हाला उघड्या डोळ्यांनी सामोरेजाऊ द्या.” विशेष म्हणजे, लेखक रिक स्ट्राउडने या पुस्तकात वर्णन केलेल्या सर्व व्यक्ती या महिला आहेत. म्हणून पुस्तकाचा उपमथळा आहे, ’वुमेन ऑफ द रेझिस्टन्स इन वर्ल्ड वॉर वन.’ 1914 ते 1918 या कालखंडात युरोपात एक अनंत भीषण असे महायुद्ध झाले. एका बाजूला फ्रान्स आणि ब्रिटन, तर दुसर्‍या बाजूला जर्मनी आणि तुर्कस्तान हे या युद्धातले प्रमुख प्रतिस्पर्धी भिडू होते. कोणाची भूमिका न्यायाची आणि कोणाची अन्यायाची, या भानगडीत आपण तूर्त न पडलेले बरे.
 
कारण, एकतर या विषयावर पुस्तकांचे डोंगर रचले गेलेले आहेत आणि दुसरे म्हणजे, आपला विषय या युद्धात, अगदी सामान्य भासणार्‍या महिलांनी भिऊन, गडबडून न जाता शांतपणे, धीराने जी कामे केली त्यांची माहिती करून घेणे, हा आहे. झाले असे की, जर्मनीने प्रथम आक्रमण केले. हे आक्रमण त्याने सरळ फ्रान्सवर न करता, प्रथम बेल्जियमवर केले. मग ’यू-टर्न’ घेऊन जर्मन सेना फ्रान्सवर उतरल्या. जर्मन सेनांचा झपाटा, त्यांचे यंत्र-तंत्र सगळेच अद्ययावत होते. बेल्जियम तर त्यांच्या तडाख्यासमोर टिकणे शक्यच नव्हते. पण, पुढे फ्रेंच सैन्याचाही हुरडा भाजून निघू लागला. सॉमच्यालढाईत एका दिवसात दहा-दहा हजार सैनिक ठार होऊ लागले. प्रत्यक्ष रणांगण असे धगधगलेले असताना समाज कसा वागतो? त्याची स्थिती काय आहे? सर्वसामान्य नोकरदार, शेतकरी, कामगार, छोटे-मोठे धंदेवाले आणि विशेषतः महिलावर्ग कसा वागतो? या अग्निमय, रक्तमय स्थितीचा कसा मुकाबला करतो? हे सगळे बघायला, नोंदवायला कोणा एकाला वेळ आहे? वृत्तपत्रे युद्ध आघाडीवरच्या हिंस्र वर्णनांच्या वार्तापत्रांनी आणि छायाचित्रांनी भरभरून वाहात होती. आता हे युद्ध संपून गेल्यावर 106 वर्षांनी एका लेखकाने या युद्धातल्या काही महिलांच्या कार्याचा लेखाजोखा जगासमोर मांडला. एडिथ कॅव्हेल ही एक ब्रिटिश परिचारिका होती. 1907 सालापासून ती बेल्जियममध्ये नर्सकाम करत होती. 1914 साली महायुद्ध सुरू झाले. जर्मन सेना बेल्जियमची भूमी जिंकत वेगाने पुढे सरसावू लागल्या. पण, युद्धात जखमी तर दोन्हीकडचे सैनिक होणार. एडिथ कॅव्हेलने परिचारिका या नात्याने अमका जर्मन सैनिक, अमकाफ्रेंच सैनिक, अमका बेल्जियन सैनिक असा भेदभाव न करता, सर्वांवर सारखेच उपचार केले. मात्र, बरे होऊन चालू शकणार्‍या फ्रेंच आणि बेल्जियन सैनिकांना गुप्तपणे हॉलंडमध्ये निसटून जाण्यात तिने सढळ मदत केली, अन्यथा जर्मनांनी त्यांना युद्धकैदी बनवले असते.
 
अगदी हेच काम बेल्जियमच्या ब्रुसेल्स शहरात राहाणार्‍या गॅब्रिएला पेटिट हिनेदेखील केले. तीसुद्धा ‘रेड क्रॉस’ पथकातली परिचारिका होती. गॅब्रिएलाने हे काम इतक्या सफाईने केले की, त्यामुळे बेल्जियममध्येभूमिगत काम करणारे ब्रिटिश गुप्तहेर खात्याचे लोक फार प्रभावित झाले. त्यांनी तिला आपल्या गुप्त अड्ड्यावर बोलावून घेतले. काही आठवडे हेरगिरीचे रीतसर प्रशिक्षण दिले आणि पुन्हा कार्यक्षेत्रात नेऊन सोडले. तीन वर्षांनी म्हणजे 1916 साली एडिथ कॅव्हेल आणि गॅब्रिएला पेटिट दोघीही पकडल्या गेल्या. दोघींनीही डोळ्यांवर पट्टी बांधून न घेता, उघड्या डोळ्यांनी मृत्यूचे स्वागत केले. लेखक रिक स्ट्राउड म्हणतो, आज एडिथ कॅव्हेलचा पुतळा लंडनच्या सुप्रसिद्ध ट्रॅफल्गार चौकात उभा आहे, तर गॅब्रिएला पेटिटचा पुतळा ब्रुसेल्स शहरात आहे. पण, अशा कित्येक अनाम, अज्ञात महिलांनी अशी काही कामगिरी बजावून ठेवली आहे की, तिला काही तोडच नाही. उदा. फ्रान्समधल लिल् हे रेल्वे स्थानक घ्या. एक म्हातारी या स्थानकापासून इतक्या जवळ राहायची की, तिला घराच्या खिडकीतून स्थानकातली प्रत्येक हालचाल दिसायची. ती म्हातारी कायम घराच्या खिडकीत स्वेटर विणत बसलेली असे. येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांमधले फ्रेंच किंवा जर्मन सैनिक कधीकधी तिची थट्टामस्करीसुद्धा करायचे. ती फक्त स्मित करत असे. पण, रात्र झाली, की तिचा अहवाल तयार व्हायचा - आज दिवसभरात अमुक गाड्या लिल्वरून अमुक दिशेला गेल्या. त्यांच्यात अंदाजे अमुक जर्मन सैनिक, अमुक रणगाडे, अमुक तोफा, अमुक ट्रक्स होते. म्हणजे स्वेटर विणण्याच्या बहाण्याने ही म्हातारी जर्मन सेनेच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवत आहे, याचा कोणाला कसलाही संशय आला नाही. आता सांगा, या हेरगिरीत मारामारी,थरारक पाठलाग, जीवघेणी पिस्तुलवाणी, सुंदर पोरी, पाण्यासारखी वाहणारी दारू असे ’ग्लॅमरस’ काय आहे? काहीच नाही. पण, काम मात्र अनमोल आहे. रिक स्ट्राउडसारख्या लेखकांचे अभिनंदन यासाठी करायला हवे की, समाजातल्या अशा अज्ञात, अनाम अशा महिलांचे धीरोदात्त काम त्यांनी मांडले.
 
आता या बाबतीत आपल्याकडे काय स्थिती आहे? अवघा आनंदी आनंद आहे. ‘वीर महिला’ असे म्हटल्यावर लोकांना राणी लक्ष्मीबाई आणि कॅप्टन लक्ष्मी यांच्यापुढे तिसरे नाव काही आठवत नाही. महिलाच कशाला, पुरुष वीरांममध्येसुद्धा लोकांना महाराणा प्रताप, छत्रपती शिवराय आणि पेशवा बाजीराव यांच्यापुढे चौथे नाव काही आठवत नाही. नामवंत पराक्रमी स्त्री-पुरुषांच्या बाबतीत जर ही स्थिती, तर जनसामान्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल घोर अज्ञान असेल, तर नवल काय? दि. 7 सप्टेंबर 1965 या दिवशी पंजाबमधल्या फिरोजपूर या शहरावर पाकिस्तानी हवाईदलाने बॉम्बहल्ला केला. भारत स्वतंत्र झाल्यापासून एखाद्या शत्रूदेशाने भारतावर हवाई बॉम्बहल्ला केल्याची ही पहिली घटना. अर्थातच पहिली प्रतिक्रिया भीती हीच होती. मिळते ते हाती घेऊन लोक पळत सुटले. एका दिवसात अर्धे शहर ओस पडले. अरेच्चा! असा कोणीच नाही, जो डोके शांत ठेवून, पाय रोवून उभा राहील आणि म्हणेल, ‘थांबा रे, पळता कुठे?’ होय, निघाला तसा एकजण. अ‍ॅड. गोकुळचंद. वय 60च्या पुढे. जनतेची ही घबराट आणि पळ बघून त्यांनी आपण वकिलीचा काळा झगा उतरवून ठेवला. खाकी हाफ पॅण्ट चढवली. हातात कानाएवढ्या लांबीची लाठी घेतली आणि गडी फिरोजपूरच्या वस्तीवस्तीतून लोकांना हाका मारत फिरू लागला. त्याच्याचसारखे खाकी हाफ पॅण्टवाले त्याच्या पाठी गोळा होऊ लागले. फिरोजपूरच्या लगतच असलेल्या देशाच्या सरहद्दीचे संरक्षण करायला भारतीय सैन्य होते. पण, खुद्द शहराचे रक्षण कोण करणार? गोकुळचंद आणि त्यांच्या मित्रांनी ते केले. ही एकट्या फिरोजपूरची कथा नव्हे. सरहद्दीलगतच्या अमृतसर, अंबाला, अबोहर, फाजिलका अशा अनेक शहरांची अशीच कथा आहे. माणसे वेगळी, नावे वेगळी, पण जिगर मात्र तीच आणि तशीच! कोण होती ही माणसे? सर्वसामान्यच तर होती. त्यांच्यात ना कोणी कोटावर गुलाब लावणारा गर्भश्रीमंत राजकारणी होता, ना कोणी बॅरिस्टर असूनही पंचा नेसून राजकीय अध्यात्म साधणारा होता. मग कोण लिहिणार त्यांच्या हिमतीच्या, धैर्याच्या कथा? एखादाच कोणी गो. नी. दांडेकर निघतो. तो अशा युद्धकालीन सामाजिक हकिकती ‘गगनात घुमविली जयगाथा’ अशा पुस्तकात नोंदवून ठेवतो. मला काँग्रेस या पक्षाच्या विचारप्रक्रियेचं राहून-राहून नवल वाटते. 1965च्या भारत-पाक युद्धात पाकला ज्यांनी चारी मुंड्या चीत केले, ते भारत सरकार काँग्रेसचे होते. ते पंतप्रधान लालबहादूर शास्त्री काँग्रेसचे नेते होते. तरी त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करायचे नाही. का? तर त्यांच्यानंतर पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधींची प्रतिमा मग थोडी फिकी होेते, म्हणून.
 
ठीक आहे. हे पण आपण समजून घेऊ. पण मग 1971च्या बांगलादेश युद्धाचे काय? त्या युद्घातला विजय हा निश्चितच इंदिरा गांधींच्या करारी आणि निर्धारी राजकीय खंबीरपणाचा विजय होता. त्या युद्धातल्या राजकीय, लष्करी, सामाजिक सगळ्याच पैलूंवर खूप लेखन व्हायला हवे होते. त्यातून इंदिरा आणि त्यांच्या पक्षाचे सरकार यांचीच प्रतिमा उजळली असती. पण, बहुधा काँग्रेसच्या घशात अहिंसा, जागतिक शांतता, प्रेम, सद्भावना या भ्रामक कल्पनांची जालीम मात्रा अशी काही अडकली असावी की, युद्धातल्या विजयाचे कौतुक त्यांच्याने करवत नसावं. असो. त्यांचं काय असेल ते असो. पण, भाजपचे काय? 1975 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारून लोकशाहीचा गळा घोटला. संविधानात दुरुस्त्या केल्या. राज्यघटनेची प्रस्तावना (प्री-अ‍ॅम्बल) ही कधीच बदलली जाऊ शकत नाही. इंदिरा गांधींनी सगळे नियम धाब्यावर बसवून त्यातही दुरुस्ती केली. विरोध करणार्‍या प्रत्येक नेत्याला आणि सामान्य माणसाला तुरुंगात डांबले. देशातले सगळे तुरुंग भरभरून वाहू लागले. लोकशाही आणि राज्यघटनेच्या या अवमानाविरुद्ध सर्वसामान्य जनतेला सचेत करण्याचे काम खरे म्हणजे लेखक, साहित्यिक, कवी, नाटककार, पत्रकार यांनी करायचे. पण, इंदिराजींनी जरा डोळे वटारताच, हे सगळे विचारवंत, बुद्धिमंत शेपूट घालून बसले. एका नेत्याने नंतर म्हटले, ‘त्यांना नुसतं झुकायला सांगितलं, तर ते गुडघ्यावर बसून रांगू लागले.’ अशा त्या अत्यंत विपरित स्थितीत एक महिला, एक मराठी साहित्यिका दुर्गाबाई भागवत या एखाद्या कडाडून कोसळणार्‍या विजेसारख्या इंदिराजींवर तुटून पडल्या होत्या आणि बंदी आलेल्या एका संघटनेने अतिशय शांतपणे, धीराने, अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते तुरुंगात असूनसुद्धा, नेटाने असे काही काम चालू ठेवले, की 19 महिन्यांनंतर का होईना, आणीबाणी उठवावी लागली. ‘क्या हार में, क्या जीत में, किंचित नही भयभीत मैं,’ हे त्या संघटनेच्या नेत्यांनी जगून दाखवले. त्या पे्ररणेतून अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या घरातल्या महिलांनी अचाट कामे करून दाखवली. संविधान आणि लोकशाहीवरचा जीवघेणा हल्ला परतवून लावला. हे युद्ध रणांगणावरचे नव्हते. पण, त्याची तीव्रता तेवढीच होती. हे सगळे आज भाजपने उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांद्वारे आपल्याच समाजाला सांगण्याची फार-फार गरज आहे. तुम्हाला काय वाटतं?
मल्हार कृष्ण गोखले
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121