आज जागतिक तापमान वाढीमुळे जगभरात पर्यावरणपूरक प्रकल्प उभारणीकडे ओढा असतानाच, वाहतूककोंडी टाळून देशांतर्गत प्रवासासाठी हायस्पीड रेल्वे प्रकल्पांकडे अनेक देश वळलेले दिसतात. नुकताच कॅलिफोर्नियाचा संपूर्ण हायस्पीड रेल्वे मार्ग लॉस एंजेलिस ते सॅन फ्रान्सिस्को हा बांधकामासाठी पर्यावरणीयदृष्ट्या अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे.
जगातील पहिला हायस्पीड रेल्वे प्रकल्प 1964 मध्ये जपानमध्ये सुरू झाला, जो ‘शिंकानसेन’ किंवा ‘बुलेट ट्रेन’ म्हणून ओळखला जातो. आज जपानमध्ये सर्वाधिक लांबीचे हायस्पीड रेल्वेचे जाळे आहे. जपानी बुलेट ट्रेन ही जगातील सर्वात व्यस्त हायस्पीड रेल्वे सेवा. या रेल्वे जाळ्याच्या गाड्या ताशी 320 किमी (200 मैल प्रतितास) वेगाने प्रवास करतात. एकूण 50 वर्षांहून अधिक काळात बुलेट ट्रेन अपघातांमुळे एकही प्रवासी मृत किंवा दुखापत झालेली नाही. हेच पाहता, आता जगभरात पर्यावरणपूरक गतिमान वाहतुकीसाठी बुलेट ट्रेन हा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. आज युरोप आणि आशियातील भारतासारख्या अनेक देशांनी प्रवाशांच्या गतिमान प्रवासासाठी हायस्पीड रेल्वे विकसित करण्यास सुरुवात केली आहे. भारतातही आता 500 किमी लांबीचे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याच धर्तीवर अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये बुलेट ट्रेनची कामे प्रगतीपथावर आहेत. न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डीसी दरम्यान ‘असेला एक्सप्रेस’ धावते. काही मर्यादित भागात ही रेल्वे ताशी 150 किमीच्या सर्वोच्च वेगात धावते. परंतु, तिचा सरासरी वेग फक्त 66 किमी प्रतितास इतका आहे. त्यामुळे कॅलिफोर्निया हाय-स्पीड रेल्वे प्रणाली स्वीकारण्याच्या तयारीत आहे. ‘कॅलिफोर्निया हायस्पीड रेल ऑथोरिटी’ (प्राधिकरण) हे अमेरिकेतील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे सिस्टीमचे प्लानिंग, डिझाईन, बिल्डिंग आणि ऑपरेट करण्यासाठी स्थापन करण्यात आले. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्देश सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, सॅक्रामेंटो आणि सॅन दिएगोसह प्रमुख शहरी केंद्रांना 200 मैल प्रतितासपेक्षा जास्त वेगाने सक्षम असलेल्या हायस्पीड रेल्वे प्रणालीद्वारे जोडणे आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, हाय-स्पीड रेल्वे प्रणालीचा टप्पा-1 सॅन फ्रान्सिस्को ते लॉस एंजेलिस बेसिनपर्यंत तीन तासांत 200 मैल प्रतितासपेक्षा जास्त वेगाने धावेल. ही प्रणाली अखेरीस सॅक्रामेंटो आणि सॅन दिएगोपर्यंत विस्तारित होईल. हा प्रकल्प 24 स्टेशन्ससह एकूण 800 मैल इतका अंतरावर विस्तारलेला आहे. आर्थिक विकास, पर्यावरणीय स्थिरता आणि रोजगार निर्मितीसाठी प्रेरणादायी म्हणून हायस्पीडरेल्वे प्रकल्पांकडे पहिले जाते. 2015 मध्ये सेंट्रल व्हॅलीमध्ये या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले. सध्या, 171 मैल (275 किमी) मार्ग प्रगतीपथावर आहे. हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या बांधकाम आणि सर्वात महागड्या बांधकाम प्रकल्पांमध्ये गणला जातो. मात्र, या प्रकल्पाचा उद्देश हे प्रमुख शहरांना एकत्र आणण्यासोबतच दोन प्रदेशातील आर्थिक संबंध वाढवणे आणि पर्यावरणपूरक प्रवासाच्या पर्यायांना चालना देणे आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजेलिस दरम्यानच्या सध्याच्या सहा तासांच्या प्रवासाला अंदाजे अडीच तासांवर आणेल.
‘मिनेटा ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूट’ (एमटीआय)ने ऑक्टोबर 2023 मध्ये हाय-स्पीड रेल्वेचे आर्थिक आणि पर्यावरणीय संभाव्यता जारी केले. त्यानुसार, ज्याने अमेरिकेतील हायस्पीड रेल्वेच्या संभाव्य आर्थिक आणि पर्यावरणीय फायद्यांची रूपरेषा दर्शविली. ‘एमटीआय’च्या मते, हा प्रकल्प 90 हजार रोजगाराची निर्मिती करेल. किमान 39 राज्यांमधील 750 हून अधिक कंपन्यांनी प्रवासी रेल्वे आणि परिवहनासाठी घटक तयार केले. अमेरिकेतील हायस्पीड रेल्वे देशाच्या दाट लोकवस्तीच्या भागात गृहनिर्माण, रोजगार आणि मनोरंजनास चालना देईल. यासोबतच हा प्रकल्प 40 वर्षांच्या कालावधीत 800 दशलक्ष टन ऊर्जा उत्सर्जन वाचवू शकते. सॅन फ्रान्सिस्को ते लॉस एंजेलिस हायस्पीड रेल्वे नेटवर्कला सामान महामार्ग आणि विमानतळ क्षमता उभारण्यासाठी अंदाजे 122-199 अब्ज इतका खर्च येईल. त्या तुलनेत हा प्रकल्प देशासाठी आर्थिक, सामाजिक उन्नतीच्या दृष्टीने सर्वाधिक फायदेशीर आहे.
गायत्री श्रीगोंदेकर