पेंच व्याघ्र प्रकल्पात पाणमांजरांसाठी होणार 'संवर्धन प्रजनन प्रकल्प'
27-Jun-2024
Total Views | 123
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात लवकरच विविध दुर्लक्षित वन्यजीव प्रजातींसाठी 'संवर्धन प्रजनन प्रकल्प' म्हणजेच 'काॅन्झर्वेशन ब्रिडिंग प्रोग्राम' (otter conservation breeding program) सुरू करण्यात येणार आहेत . याअंतर्गत विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्पात पाणमांजरांचे प्रजनन केले जाणार आहे. या संवर्धन प्रजनन प्रकल्पांसाठी वन विभाग आणि 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'मध्ये (बीएनएचएस) सामंजस्य करार होणार आहे (otter conservation breeding program). गुरुवार दि.२७ जून रोजी पार पडलेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची बैठकीत यांसदर्भात चर्चा करण्यात आली. (otter conservation breeding program)
राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची दुसरी बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने जल जीवन मिशन प्रकल्पासाठी संरक्षित वन क्षेत्रांमधील निवडलेल्या गावांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या गावांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीत राज्यातील विविध संकटग्रस्त प्रजातींसाठी राबविण्यात येणाऱ्या 'संवर्धन प्रजनन प्रकल्पा'संदर्भात चर्चा झाली होती. यासंदर्भातील चर्चा दुसऱ्या बैठकीत करण्यात आली. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संवर्धन प्रजनन प्रकल्पांसाठी 'बीएनएचएस'सोबत लवकरात लवकर सामंजस्य करार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. 'बीएनएचएस' आणि वन विभागाच्या माध्यमातून येत्या काळात राज्यात तणमोर, माळढोक, गिधाड, पाणमांजर, रानम्हशी, सारस आणि लाजवंती (स्लेंडर लाॅरिस) या दुर्लक्षित वन्यजीव प्रजाचींचे संवर्धन प्रजनन प्रकल्प अंमलात आणले जाणार आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये पिंजराबंद अधिवासात शास्त्रीय पद्धतीने संकटग्रस्त प्रजातींचे प्रजनन केले जाते. जेणेकरुन संकटग्रस्त प्रजातींची संख्या स्थिर राहण्यास मदत मिळेल.
'बीएनएचएस'कडून पेंच व्याघ्र प्रकल्पात पाणमांजरांसाठी संवर्धन प्रजनन प्रकल्प राबिवण्यात येणार आहे. यासाठीचा पत्रव्यवहार सध्या सुरू असून या प्रकल्पाला लवकरच अंतिम स्वरुप प्राप्त होईल. पेंच व्याघ्र प्रकल्पात स्मूथ कोटेड आणि युरेशियन प्रजातीचे पाणमांजर आढळतात. या प्रजातींचे संवर्धन प्रजनन प्रकल्प राबविण्यासाठी वन विभागाकडून 'बीएनएचएस'सोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. यासोबतच गोरेवाड्यामध्ये रानम्हशीचा संवर्धन प्रजनन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी गडचिरोली आणि आसाम येथून रानम्हशींना स्थानांतरित करण्यासंदर्भातील विचार सुरू आहे. सारस पक्ष्यांचे चंद्रपूर येथे स्थानांतरण करण्यासंदर्भातही 'बीएनएचएस'ची वन विभागासोबत चर्चा सुरू आहे. यामध्ये सर्वप्रथम सारस पक्ष्यांचे प्रजनन करुन त्यानंतर त्यांचे चंद्रपूरात स्थानांतरण केले जाईल.
तणमोर, माळढोक, गिधाड, पाणमांजर, रानम्हशी, सारस आणि लाजवंती या संकटग्रस्त प्रजातींच्या 'संवर्धन प्रजनन प्रकल्पा'साठी येत्या काळात वन विभाग आणि 'बीएनएचएस'मध्ये सामंजस्य करार होणार आहे. गिधाडांसाठी नाशिक वन विभागासोबतचे पत्रव्यवहार अंतिम टप्यात असून लवकरच आम्ही सामंजस्य करारावर स्वाक्षरी करू. याशिवाय चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाने सारस संवर्धन प्रजनन प्रकल्प राबवण्यासाठी देखील आम्ही तयारी करत आहोत. - किशोर रिठे, संचालक, बीएनएचएस