मुंबई: अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली फायनांशियल सर्विसेसचे सेक्रेटरी विवेक जोशी यांनी बँकिंग व वित्तीय सेवेच्या मान्यवर अधिकारी वर्ग व तज्ज्ञांची भेट मंगळवारी घेतली होती. यावेळी बँकिंग क्षेत्रातील चालू परिस्थितीचा आढावा यामध्ये घेण्यात आला.भविष्यात काय उपाययोजना करता येतील व त्यातील सद्यस्थितीतील त्रुटी यावर विवेक जोशी यांनी विस्तृत चर्चा केली आहे.
देशातील प्रत्येक व्यक्तीला बँकिंग सेवेचा लाभ घेता यावा यासाठी गाव तिथे शाखा या उपक्रमासह भविष्यातील उपायोजनेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारच्या बँकिग क्षेत्रातील योजनांची होणारी अंमलबजावणीचा आढावा व देशभरात राबवण्यात येणारी आर्थिक सर्वसमावेशकता यावर चर्चा करण्यात आल्याचे वित्त मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. पब्लिक सेक्टर बँकाबरोबरच सिडबी, नाबार्डचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.
यावेळी बँकिंग व आर्थिक क्षेत्रातील सरकारी धोरणांची आखणी, व त्याची तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी घेण्यात येणारी आगामी पाऊले यावरही चर्चा करण्यात आली आहे. केवायसी, जनसमर्थ पोर्टल, आधार सिडिंग या महत्वपूर्ण विषयांवरही यावेळी चर्चा झाली आहे.