हे मान्य आहे का?

    25-Jun-2024   
Total Views |
owaisi statement oath parlianment


असदुद्दीन ओवेसीने काल खासदारकीची शपथ घेताना ‘जय फिलीस्तान’ असा नारा दिला. भारतात राहायचे, भारतात नेतेगिरी करायची, सात जन्माचे वैभव लुबाडायचे आणि खासदारकीची शपथ घेताना मात्र ‘जय भारत’ म्हणण्याऐवजी ‘जय फिलीस्तानचा’ नारा द्यायचा. एवढाच जर पॅलेस्टाईनबद्दल कळवळा आहे, तर त्याने येथे भारतात न राहता, पॅलेस्टाईनला जावे. ओवेसीने ‘जय फिलीस्तान’ अशा तोर्‍यात म्हटले की, जणू त्याचा जन्म तिकडचाच. जणू तीच त्याची जन्मभूमी आणि कर्मभूमीही. अर्थात कोणी काय म्हणावे, कोणावर श्रद्धा ठेवाव्या, कोणाला आपले मानावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. मात्र, ओवेसीवर आक्षेप यासाठी, की त्याने ‘जय भिम’ म्हटले, ‘जय मिम’ म्हटले, ‘जय तेलंगण’ही म्हटले, पण ‘जय भारत’ बोलायला त्याची दातखीळ बसली. देश, राष्ट्र या सगळ्याशी काही देणेघेणे नसणार्‍या या माणसांना लोक खासदार बनवतात. अर्थात त्यांना निवडून देणारेही अशाच मनोवृत्तीचे असतील का? याचे उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच दिलेले आहे. त्यांनी लिहूनच ठेवले आहे की, “मुस्लिमांना राष्ट्रापेक्षा धर्मच महत्त्वाचा. त्यांच्या निष्ठा धर्माशीच.” डॉ. बाबासाहेबांचे हे म्हणणे कालातीत आहे. याचा अनुभव आपण घेतच आहोत. अगदी स्वातंत्र्यापूर्वीचा आणि नंतरचा कालावधी घेतला, तरी हे सत्यच दिसते. ‘खिलाफत चळवळी’शी भारताचा काय संबंध होता? पण, राष्ट्रीय पातळीवर ‘खिलाफत चळवळी’चे आंदोलन झालेच होते. देशाला स्वातंत्र्य मिळवताना धर्माच्या आधारावर पाकिस्तान वेगळा झालाच. तसेच, काही वर्षांपूर्वी रोहिंग्या मुसलमानांसाठी मुंबईत हिंसाचार झाला, हे आपण विसरूच शकत नाही. जगात कोठेही काही झाले, तरी ‘बीच में मेरा चाँद भाई’ असतेच असते. त्याला ओवेसी कसा अपवाद असणार? ‘जय मिम’ - ‘जय भिम’ बोलण्यास ओवेसी विसरला नाही. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते, तर ते नक्कीच ओवेसीला म्हणाले असते, “तुझ्या ‘जय मिम’, ‘जय फिलीस्तान’मध्ये आम्हाला घेऊच नकोस. आम्ही पहिले भारतीय आहोत आणि अंतिमतःदेखील भारतीयच आहोत.” बाबासाहेबांचे हे प्रथम आणि अंतिमही भारतीय असणे, ‘जय भिम’ची गर्जना करणार्‍या समाजाला मनापासून विचाराअंती मान्य आहे. हे भारतीयत्व ओवेसी आणि त्याच्यासारख्यांना मान्य आहे का?

करा ना पक्षाध्यक्ष आता!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा आमच्या सुप्रिया सुळेला जास्त मते मिळाली, असे बाबा म्हणाले. अय्या, बाबा पण ना! म्हणजे मला मुख्यमंत्रीऐवजी पंतप्रधान बनवायचा विचार आहे की काय बाबांचा? काय म्हणता? बाबाच आजन्म भावी पंतप्रधान राहणार आहेत, तर माझा तर विषयच नाही. काय म्हणता? नरेंद्र मोदींशी माझी तुलना तरी होऊ शकते का? त्यांची राष्ट्रभक्ती समाजशीलता यांच्याशी तुलना होऊ शकत नाही? जाऊ द्या आम्हाला काय? हा पक्ष माझ्या बापाचा आहे, असे उगाच का मी म्हणते. कार्यकर्ते उचलेनात का संतरज्या आपल्याला काय? खासदार-आमदार-बिमदार आम्हीच बनणार! आमचा हक्कच आहे तो. तर काय म्हणत होते, बाबा म्हणाले, मला पंतप्रधानांपेक्षा जास्त मते मिळाली. आता परत यावर काय म्हणता की, मोदींना हरवण्यासाठी विरोधकांनी साता जन्माची ताकद लावली तरीही ते जिंकले. परदेशातल्या विघातक शक्तींचा, देशाअंतर्गत फुटीरतावाद्यांचा, खोट्या नॅरेटिव्हचा आणि मुख्यत: खोट्या गॅरेंटीचा आधार घेतला पण मोदी शेवटी जिंकलेच. मोदी हटवा, हटवा बोलले, पण लोकांनी आम्हालाच विरोधी पक्षात बसवले? असू दे, असू दे. पण, मीसुद्धा जिंकले ना , पण लोकांना त्याचं काहीच पडलेलं नाही. लोक तरीही ‘मोदी मोदी’ करत सुटतात. मला तर बाई चैनच पडत नाही काय करावं? बाबांकडे मुख्यमंत्रिपदासाठी बालहट्ट करावा का? त्या आधी आता पक्षाध्यक्ष व्हायचाच हट्ट केला पाहिजे. बाबांनी मागच्यावेळी तशी तयारी केली होती. पण, दादा होते ना! आता ते नाहीत, मग मलाचं रान मोकळं. काय म्हणता रोहित, युगेंद्र वगैरे आहेत. त्यांचं काय? त्यांचं काय मला काय माहिती? बाबांच्या मनात तर मीच अध्यक्ष व्हावे असे आहे ना! पण, बाबांच्या मनाचा काही थांगपत्ता लागत नाही. मागे ते स्वत: देवाचा बाप आहे, असे म्हणाले होते आणि आता आषाढी वारीबिरीला जायचीही तयारी करतील. कधी मराठा, ओबीसी आरक्षण म्हणतील तर कधी तेच म्हणत म्हणत मुस्लीम आरक्षणासाठी पण आवाज उठवतील. आता इथे तर क्षणात तिथे काय करतील काही माहिती नाही. बाबांचे हे असे आहे. बाबांना बोलतेच कशी की, बाबा पुढचं कुणी पाहिलंय, करा ना मला पक्षाध्यक्ष!

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.