"ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर...;" नितेश राणेंचा सवाल
25-Jun-2024
Total Views | 54
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर किती दिवस राहायचा? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना केला आहे. नवनिर्वाचित खासदार कंगणा राणावत यांच्या महाराष्ट्र सदनातील मुक्कामावर राऊतांनी टीका केली होती. यावर आता राणेंनी त्यांचा जोरदार समाचार घेतला.
नितेश राणे म्हणाले की, "खासदार कंगणा राणावत महाराष्ट्र सदनमध्ये गेल्या आणि तिथे राहण्यासाठी विचारपूस केली. त्यांनी तिथे मुख्यमंत्र्यांच्या रुमची विचारपूस केली. त्यांना तिथे नाही सांगण्यात आल्याने त्या तिथून निघून गेल्या. पण या गोष्टीच्या संजय राऊतांना मिरच्या लागल्या आणि त्यांनी वायफळ बडबड सुरु केली. कंगणा राणावत या निवडून गेलेल्या खासदार आहेत. तुमच्यासारख्या मागच्या दाराने एन्ट्री घेणाऱ्या खासदार नाहीत," असा खोचक टोला त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर सचिन वाझे किती दिवस राहायचा? त्याला तिथे कुठली खोली देण्यात येत होती? मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी सचिन वाझे बॅग भरून यायचे आणि आठवडाभर राहायचे. याचं उत्तर कोण देणार?" असा सवाल नितेश राणेंनी संजय राऊतांना केला आहे.