मुंबई, दि.२६ : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात नवीन नवीन विक्रम होत असतानाच आता १३० मीटर लांबीचा 'मेक इन इंडिया' स्टील पूल लॉन्च करून पुन्हा एकदा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पात नवी उपलब्धी प्राप्त केली आहे. एनएचएसआरसीएलने २३ जून २०२४ रोजी हा स्टील पूल यशस्वीपणे लॉन्च केला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वडोदराजवळ दिल्ली-मुंबई राष्ट्रीय द्रुतगती मार्गावर हा पूल उभारण्यात आला आहे.
२४ तासांत गर्डर लॉन्च
१८ मीटर उंचीचा आणि १४.९ मीटर रुंदीचा हा ३००० मेट्रिक टन पोलादी पूल महाराष्ट्रातील वर्धा येथील कार्यशाळेत तयार करण्यात आला आणि स्थापनेसाठी ट्रेलरवर नेण्यात आला आहे. देशातील कोणत्याही राष्ट्रीय महामार्गापेक्षा जास्त लांबीचा असा जड गर्डर मार्गस्थ करणे सर्वाधिक आव्हानात्मक होते. ब्रिज फॅब्रिकेशनमध्ये C5 सिस्टीम पेंटिंग आणि मेटॅलिक स्फेरिकल बेअरिंगसह अंदाजे १२४,२४६ नग टोर-शिअर टाइप हाय स्ट्रेंथ (TTHS) बोल्टचा वापर करण्यात आला. या पुलाची निर्मिती १०० वर्षे टिकेल अशी डिझाइन केलेली आहे. हा पोलादी पूल जमिनीपासून १५ मीटर उंचीवर तात्पुरत्या ट्रेसल्सवर एकत्र केला गेला. मॅक-ॲलॉय बार वापरून २५० टन क्षमतेच्या २ नंबरच्या सेमी-ऑटोमॅटिक जॅकच्या स्वयंचलित यंत्रणेसह खेचण्यात आला. सुरक्षितता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेची मानके राखून हा प्रकल्प अत्यंत काळजीपूर्वक राबविला जात आहे. जपानी कौशल्याचा फायदा घेऊन भारत 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतःच्या तांत्रिक आणि भौतिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचा पोलादी पूल हे या प्रयत्नाचे प्रमुख उदाहरण आहे.
महामार्ग, द्रुतगती मार्ग आणि रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी स्टीलचे पूल सर्वात योग्य
कॉरिडॉरसाठी पूर्ण झालेल्या २८ स्टील पुलांपैकी हा तिसरा पूल आहे. पहिला आणि दुसरा पोलादी पूल राष्ट्रीय महामार्ग ५३ ओलांडून सुरतमध्ये आणि भारतीय रेल्वेच्या वडोदरा-अहमदाबाद मुख्य मार्गावर, गुजरातमधील नडियादजवळ अनुक्रमे सुरू करण्यात आला. महामार्ग, द्रुतगती मार्ग आणि रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी स्टीलचे पूल सर्वात योग्य आहेत. भारताकडे १०० ते १६० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या अवजड आणि अर्ध-हाय-स्पीड ट्रेनसाठी स्टीलचे पूल बनवण्याचे कौशल्य आहे. आता, बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर देखील स्टील गर्डर्सच्या फॅब्रिकेशनमध्ये हेच कौशल्य लागू केले गेले आहे. ज्याचा वेग ३२० किमी प्रतितास इतका आश्चर्यकारक असेल.