मुंबई : आपल्या पोलिसांवर अविश्वास दाखवून संजय राऊत ड्रग्ज माफियांना प्रोत्साहन देत आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केली आहे. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली होती. यावर आता संजय शिरसाटांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
संजय शिरसाट म्हणाले की, "सरकार येऊन दोन वर्ष झालीत. अडीच वर्ष तुम्ही गोट्या खेळत होतात का? हे लोकांना कळायला हवं. आरोप करण्याशिवाय त्यांना दुसरे उद्योग नाहीत. महाराष्ट्रात येऊ पाहणाऱ्या ड्रग्ज माफियांचा पोलिस बंदोबस्त करत आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या पोलिसांवर अविश्वास दाखवून ड्रग्ज माफियांना प्रोत्साहन देत आहात."
"तुमच्या वायफळ बोलण्यामुळे तुमच्याबद्दल सहानुभूती आहे, असं जे समजतात ते मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. झोपेतून उठल्यानंतर त्यांना बडबड करण्याची सवय लागली आहे," असे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत, हे ठरवणारे तुम्ही कोण? सुप्रीम कोर्टाचे जज आहात का? प्रत्येकवेळी असे वक्तव्य करुन यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असा टोलाही शिरसाटांनी राऊतांवर लगावला आहे.