अहोरात्र, ऊन-वारा, थंडी, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता भारतवासीयांच्या रक्षणासाठी सीमेवर लढणार्या भारतीय सैन्याची दिवाळी गोड करणार्या मुंबईतील दहिसर येथील सुनीता केणी यांच्याविषयी...
माझा मुलगा सैन्यात भरती झाला. भरती झाल्यावर आठ ते दहा महिने मला मुलाचा चेहरा बघणे तर लांब, पण बोलणेही कठीण झाले. काही महिन्यांनी तो घरी आला. औक्षण करण्यासाठी त्याला उंबर्याबाहेर थांबवले. ओवाळायला ताट घेऊन येईपर्यंत मुलगा घरात आला. कारण घरात येण्याआधीच त्याला सीमेवर परत बोलावणे आले होते.
त्यानंतर वर्षभरात त्यांचे सुट्टीवर येण झालेच नाही. म्हणून मग दिवाळी सणानिमित्त मुलाला भेटायला जायचे ठरविले. तर मोकळ्या हाताने कसे जाणार? मग त्याच्यासाठी फराळ घेऊन जायचे ठरले. आपल्या मुलासारखे इतरही मुले असणार. मग त्यांची दिवाळीही गोड करावी या हेतुने पहिल्या वर्षी आम्ही युनिटमधील सर्व सैनिकांना 12 हजार, 500 दिवाळी फराळाचे खोके घेऊन सीमेवर गेलो. त्यानंतर बर्याच सैनिकांनी सैन्यदलात 15 ते 20 वर्षे आहोत,पण प्रथमच दिवाळीच्या दिवशी फराळ करायला मिळाला अशा प्रतिक्रिया दिल्या. तेव्हापासून आजतागायत गेली दहा वर्षे आम्ही सीमेवरील सैनिक बंधूंना दिवाळी फराळ पाठवत आहे. आपला फराळ लेह लडाख, जम्मू काश्मीर, आसाम, मणिपूर, अरुणाचल, भुज, जेसलमेर अशा विविध सीमेवर पाठवितो.
एका सैनिकाची ‘आई’ म्हणून ,फराळाच्या डब्यासोबत शुभाशीर्वादाची भावनाही प्रत्येक सैनिकांपर्यंत पोहोचते यांचा खूप आनंद आहे, अशा भावपूर्ण शब्दांत सुनीता केणी आपले मनोगत व्यक्त केले. सुनीता केणी यांना सामाजिक कार्याचे बाळकडू आपल्या वडिलांकडूनच मिळाले. सुनीता केणी यांचे वडील रत्नाकर म्हात्रे यांनी, सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले होते. दारात मदत मागण्यासाठी आलेली एकही व्यक्ती आमच्या दारातून रिकाम्या हाताने जात नसे, अशी आमच्या वडिलांची ख्याती सर्वदूर होती, हे सुनीताताई आवर्जून सांगतात. त्याच प्रेरणेतून सुजाताताईंनी वडिलांचा हा वारसा पुढे सुरू ठेवला. शक्य तेवढी आणि शक्य तेथे निस्वार्थ भावनेने मदत करावी, या हेतूने त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले.
सुनीताताईंना ट्रेकिंगची आवड असल्याने, खेडोपाडी त्यांचे जाणे होत असे. या गावांमध्ये जाऊन त्यांनी अनेकसंस्थांसोबत आपले सामाजिक कार्य सुरू केले. अशाच पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील, वनवासी कल्याण आश्रम आयोजित एका कार्यक्रमात त्यांची आणि नरेंद्र केणी यांची भेट झाली. या भेटीचे पुढे नात्यात रुपांतर झाले. नरेंद्र केणी यांच्याशी विवाह झाल्यावर सुनीता केणी आणि नरेंद्र केणी या दाम्पत्यांनी आपले सामाजिक कार्य अधिक जोमाने पुढे नेले. सुजाता केणी या सरकारी नोकर असल्याने, सामाजिक कार्य करताना अनेक बंधने असत. मात्र, या काळातही सुनीताताईंनी आपले समाजभान जपले. जव्हार, कर्जत, मणिपूर अशा भागातील अनेक गरजू मुलांना दत्तक घेऊन, त्यांचे शिक्षण पूर्ण केले. लोणावळा येथील ’मनशक्ती’ या संस्थेसोबत सक्रियपणे त्यांनी आपले सामाजिक कार्य, नोकरी आणि कौटुंबिक जबाबदार्या संभाळत सुरू ठेवले.
सुनीता केणी यांनी दार्जिलिंग येथील हिमालयन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मनशक्ती, युथ हॉस्टेल, तसेच विविध अॅडव्हेंचर कॅम्पमध्ये तरुणांना 20-22 वर्षे अॅडव्हेंचर प्रशिक्षण दिले. राजमाची येथील गावात तयार होणार्या मधाची विक्री करण्यासाठी गावकर्यांना बाजारपेठ मिळवून देणे, अशा विविध घटकांसाठी सुनीताताईंनी काम केले आहे. सुनीता केणी यांना कधीही स्वतःची संस्था असावी असे वाटले नाही. याबाबत बोलताना त्या सांगतात, आम्ही कधीही स्वतःची संस्था सुरू करण्याचा विचार केला नाही. दोघेही सरकारी नोकर असल्याने ते शक्य नव्हते. मात्र जेथे जेथे आमची गरज भासत होती, त्या संस्थेत आम्ही रूजू झालो. त्या संस्थेसोबत आम्ही आमचे काम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुरू ठेवले.
आत्तापर्यंत महाराष्ट्र आणि देशभरातील 30 ते 35 सामाजिक संस्थांसोबत सुनीता केणी यांनी काम केले आहे. इतकेच नाही, तर 2013 मध्ये उत्तराखंड येथील अतिवृष्टीत जनजीवन विस्कळीत झालेल्या, 300 पेक्षा अधिक कुटुंबांना सलग तीन ते चार महिने जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केणी दाम्पत्याने सार्वजनिक सहकार्यातून प्रत्यक्ष जाऊन केला. सध्या सुनीता केणी मार्फत भारतीय सैन्यासाठी फराळ पाठवण्याची तयारी दोन महिने आधी सुरू केली जाते,आणि 20 दिवस अगोदर फराळ पाठविण्यात येतोे. यासाठी अनेकजण जसे शक्य होईल तसे, फराळाची पाकिटे भरायला आनंदाने मदत करतात. दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारका’त फराळाच्या बॉक्सचे पॅकिंग होते. यासाठी स्मारकातून विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली जाते. विविध वयोगटातले अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन यात मदत करतात हे सुनीता केणी आवर्जून सांगतात.
2022 साली सरकारी नोकरीतून निवृत्तीनंतर, सुनीता केणी यांच्याकडे रा. स्व. संघाच्या ’वस्ती परिवर्तन योजने’च्या दहिसर आणि बोरिवली येथील संवादिका म्हणून जबाबदारी आहे. याअंतर्गत येथे वस्त्यांमधील लहान मुले, महिला, तरुणी यांचे आहार, आरोग्य, शिक्षण आणि विकास याविषयी काम केले जाते. तसेच, मणिपूर येथे रीमोट भागांमध्ये शाळा चालविणार्या पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान, रा. स्व. संघ जनकल्याण समितीमध्ये त्या दहिसर-बोरीवली भागात बाल संस्कार आयाम प्रमुख आहेत. या अंतर्गत सध्या 16 वस्त्यांमध्ये बाल संस्कार वर्ग चालविले जातात. अशा रितीने कुटुंब, नोकरी सांभाळून अविरतपणे सुनीता केणी यांनी आपले सामाजिक भान जपले आहे. त्यांच्या या समाजकार्याला दै. ’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!