सामाजिक न्यायाचे आधारस्तंभ छत्रपती शाहू महाराज

    22-Jun-2024   
Total Views |
social justice pioneer shahu maharaj


सामाजिक न्यायासाठी अमूल्य कार्य करणार्‍यांमध्ये छत्रपती शाहू महाराजांचे नाव अग्रणी आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या जाणीवकर्तृत्वाला वंदन. ‘विवेक विचार मंच’तर्फे छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘सामाजिक न्याय परिषदे’च्या निमित्ताने छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाचे केलेले हे चिंतन...

प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, ऑगस्टीन, कांट, मिल इतर अनेक पाश्चात्य विचारवंतांनी सामाजिक न्यायाची व्याख्या केली. भारतीय तत्वज्ञान तर सामाजिक न्यायाचा उद्घोषच करते. सर्वांना समान संधी देणे म्हणजे सामाजिक न्याय आहे का? विविध धर्मसंस्कृतीचा अभिनिवेश बाळगत जन्मलेल्या व्यक्तींसाठी समानतेच्या संधी एकसमानच असाव्यात का?आर्थिक सामाजिकदृष्ट्या संपन्न आणि आर्थिक सामाजिकदृष्ट्या विपन्न असलेल्या समाजसमूहाला किंवा व्यक्तीला समान संधी उपलब्ध करून द्यायची, तर साधनांची किंवा संधींची वाटणी समान असावी का? यातून खरेच संपन्न आणि विपन्न एकाच स्तरावर समान होतील का? या सगळ्यांचा परामर्श घेताना छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाची भूमिका समजून घेणे आजही आवश्यक आहे.

जगभरात ‘आहे रे’ आणि ’नाही रे’मध्ये विषमतेची दरी आहे. मार्क्ससारख्यांनी ही दरी मिटवण्यासाठी ‘आहे रे’नाच ‘नाही रे’ बनवण्याची विचारधारा मांडली, तर पाश्चात्यांनी भांडवलशाहीचे, भौतिकवादाचे समर्थन केले. या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज यांनी ‘नाही रे’ म्हणजे दुर्बल, शोषित, वंचित घटकांच्या परिस्थितीला कारणीभूत असलेल्या घटकांचा, समस्यांचा विचार केला. ’विद्येविना मती गेली मती विना गती गेली’ हे महात्मा जोतिबा फुल्यांनी सांगितले आहेच. शाहूंनी सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्यांना शालेय शिक्षण मोफत दिले. गरिबांच्या मुलांनी शिकावे म्हणून शाळा, महाविद्यालये, वसतिगृहांची स्थापना केली. 500 ते 1000 लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात त्यांनी शाळा सुरू केली. यात अठरापगड जातींसोबतच मुस्लीम आणि जैन विद्यार्थ्यांसाठीही वसतिगृह उभारले. ’सब समाज को साथ लिए’ म्हणतच शाहूंचे समाजकारण इथेच थांबले नाही. 1919 साली शाहूंनी आदेश पारित केला की, कुणालाही प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या जातीनुसार भेदभाव करता येणार नाही. तो काळ असा होता की, मागासवर्र्गीय समाजाला इस्पितळात उपचार करत नसत. मात्र, शाहूंनी 1919 साली आदेश जाहीर केला की, मागासवर्गीय समाजाला रूग्णालयात उपचार करावाच लागेल.

दि. 26 जून 1902 रोजी त्यांनी त्यांच्या प्रशासनात नोकरीसाठी मागासवर्गीय समाजाला 50 टक्के आरक्षण जाहीर केले. ब्राह्मण, शेनवी, प्रभू आणि पारशी समाजाव्यतिरिक्त इतर समाजासाठी हे आरक्षण होते. या इतर समाजामध्ये मराठा आणि इतर मागासवर्गीय,भटके-विमुक्त आदिवासी आणि मागासवर्गीय समाज होता. शरद पवार असोत की प्रकाश आंबेडकर असोत की राहुल गांधी असोत, हे शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतात. मात्र, छत्रपती शाहू महाराजांनी ज्या तत्वानुसार 50 टक्के आरक्षण जाहीर केले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जी 50 टक्के आरक्षणाची तरतूद केली, त्याबद्दल हे लोक काय म्हणतात, तर 50 टक्के आरक्षण बदलून त्याचे प्रमाण आणखीन वाढवा. अर्थात आरक्षणाचे अभ्यासक याबाबत वेगळे मत मांडतील. मात्र, शाहूंचे नाव घेऊन जातीनिहाय आरक्षण वाढावे यासाठी जातीभेद करणार्‍यांनी शाहूंचे नाव घेऊ नये. कारण, शाहूंच्या ‘सामाजिक न्याया’च्या संकल्पना द्वेषावर नाहीत, तर सत्य-तर्कनिष्ठ न्यायावर आहेत. स्वार्थासाठी त्यांनी सामाजिक न्यायाचा वापर केला नाही.
सामाजिक न्यायाची आजची स्थिती पाहिली तर शाहू-फुले- आंबेडकरांचे नाव घेऊन काही समाजाविघातक लोक ब्राह्मण, मराठा, इतर मागासवर्गीय आणि मागासवर्गीय अशी भांडणं लावताना दिसतात. शाहू महाराजांनी ब्राह्मणांना नेस्तनाबूत करण्यासाठी काम केले असे सांगणारे यातले अनेकजण आहेत.

मात्र, छत्रपती हे कधीही कोणत्याही माणसाच्या किंवा समाजाच्या विरोधात नव्हते, तर समाजाची पीछेहाट करणार्‍या प्रवृत्तींच्या विरोधात होते. त्यामुळेच ते सरसकट सगळ्या ब्राह्मणांच्या विरोधात होते हे म्हणणे साफ चूक आहे. छत्रपती शाहू महाराजांना नामदार गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे व समाजसुधारक आगरकर यांच्याविषयी खूप आदर होता. मागासलेल्या लोकांमध्ये शिक्षणप्रसार करण्याचे कार्य मी गोखले व रानडे यांच्याकडून शिकलो, असे ते म्हणत. दुसरे असे की, त्यांनी ‘मुकनायका’साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्थसाहाय्य केले तसेच गोपाळ गणेश आगरकर यांचे ‘सुधारक’ पत्रक आर्थिक अडचणीत सापडले. त्यावेळी शाहूंनी पत्रकाचे संपादक व्ही.आर. जोशी यांना आर्थिक मदत करून ते वृत्तपत्र वाचवले. ‘आगरकर’ किंवा ‘जोशी’ ही आडनावे ब्राह्मणांची म्हणून ‘सुधारक’ वृत्तपत्र बंद व्हावे असे त्यांना वाटले नव्हते. शाहूंच्या संस्थानाचे सरन्यायाधीश बी. एन. जोशी होते. राजघराण्यातील वेदोक्त पद्धतीचे संशोधन करण्याचे कार्य के. एन. पंडीत व व्ही. बी. गोखले या न्यायाधीशांनी करून महाराज क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचा अधिकार असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.नारायण भट्ट सेवेकरी या भटजीकडून महाराजांनी 1901 साली वेदोक्त पद्धतीने श्रावणी केली. महाराजांचे अत्यंत विश्वासू सल्लागार वा.द. उर्फ बन्याबापू तोफखाने होते. एक ना अनेक महाराजांच्या प्रशासनात जातीवरून नाही तर गुणावरून नियुक्त होती. जातीगत आरक्षण होते तरी त्यामध्येही गुणवत्तेला प्राधान्य होते. तसेच आरक्षण दिले झाले असे शाहूंनी केले नाही, तर दर तीन महिन्यांनी ते या आरक्षणानुसार समाजामध्ये किती बदल झाला याबाबत माहिती घ्यायचे.

छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय संकल्पनेमध्ये शिक्षणासोबतच धार्मिकतेलाही अधिष्ठान होते. धर्मसंस्कार हे समाजातील प्रत्येक घटकाचा अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच त्यांनी 1920 साली पुजारी आणि पौरोहित्याचे शिक्षण देणारे विद्यालय सुरू केले. इतकेच नाही तर मागासवगीर्र्य समाजाच्या व्यक्तींना पुजारी म्हणून नेमण्याचे आदेशही दिले. हे काळाच्या कितीतरी पुढचे होते. 22 जानेवारी रोजी आपण पाहिले की अयोध्येत राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा पुजनामध्ये देशातील विविध समाजाचे प्रतिनिधित्व करणारे कुटुंब सहभागी झाले होते. पंतप्रधानांसोबतच मुंबईतल्या शाळेत मुख्याध्यापक असलेले विठ्ठल कांबळे हे सुद्धा होते. या घटनेचे बीज मला वाटते शाहूंच्या या विचारप्रेरणेतच आहे. कालौघात भारतीय समाजात जातीय विषमतेची कीड लागली. जातीयतेच्या उतरंडीत अत्यंत निम्न स्तरावर असलेल्या समाजाला जमिनीचा तुकडा किंवा अन्य स्वरूपात मदत करून त्यांच्याकडून वर्षभर काम करून घेण्याची एक पद्धत समाजात रूढ झाली. पुढे या पद्धतीमुळे समाजात सरळ सरळ विषम विभागणी झाली. छत्रपती शाहूंनी 1917 साली ही बलुतेदारी प्रथाच मोडून काढली. मागासवगीर्र्य समाजाला स्वत:ची जमीन दिली. शिक्षणाची आणि त्यायोगे अर्थार्जनाची उत्तम संधी दिली. शाहूंच्या राज्यात महिलांची स्थितीही चांगलीच होती. घटस्फोट आणि संपत्ती वितरणामध्ये वाटा हे हक्क महिलांना होते. महिलांनी शिक्षण घेऊन कर्तृत्व स्थापित करावे असे शाहू महाराजांना वाटे. त्यामुळेच तर कृष्णाबाई केलावकर यांना परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांनी सहकार्य केले.

आजही शोषित, वंचित समाजाचे भले व्हावे असे वाटणारे लोक काही कमी नाहीत. पण, ज्या समाजासाठी ते काम करतात त्याच समाजातल्या नेतृत्वांना उभारी देणे हे महत्त्वाचे काम होताना दिसत नाही. सामाजिक न्यायाच्या हितासाठी वंचित समाजातूनच नेतृत्व उभे राहावे यासाठी शाहूंची भूमिका लक्षणीय आहे. शाहूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी किंवा मुकनायकसाठी सहकार्य केले कारण त्यांच्यासाठी समाजाची खरी तळमळ असणार्‍या निर्भिड बुद्धिमान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व महत्वाचे होते. इंग्रजांच्या काळात उद्योग व्यवसायात पाय रोवणार्‍या किर्लोस्कारांना उद्योगासाठी मदत करणे आणि गावात मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीला हॉटेल थाटून देणे या दोन्ही गोष्टी शाहूंनी तितक्याच प्राथमिकतेने आणि यथाशक्ती केल्या. स्वयंरोजगार प्राप्त व्हावा म्हणून ते मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीस हॉटेल काढून देतात. पण त्याकाळी मागासवर्गीय व्यक्तीच्या हॉटेलमध्ये कोण जाणार? छत्रपती शाहू त्यावेळी दरबार्‍यांसोबत त्या हॉटेलात गेले. स्वतःसोबत सगळ्यांसाठी चहा, नाश्ता मागवला. राजाच या हॉटेलात चहापाणी करतो म्हंटल्यावर या हॉटेलवर कोण बंदी घालणार? दुर्बल समाजाला स्वयंरोजगार देणार्‍या शाहूंचे विचार आजही लक्षात घेण्यासारखे आहे.

 शाहूंच्या आयुष्यातली एक घटना बरेच काही सांगून जाते. एकदा गाडीवानाच्या न टाळता येणार्‍या चुकीमुळे शाहू महाराज चिखलात पडतात. शाहू रागाने त्या गाडीवानाच्या पाठीवर चिखलाने माखलेली चप्पल मारतात. अर्थात त्या गाडीवानाचे आणि शाहूंचे संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण होते. दुसर्‍या दिवशी शाहूना तो भेटतो. रडत रडत तो म्हणतो ”मला आमच्या समाजाने वाळीत टाकले. आमच्या समाजात प्रथा आहे की चपलेचा प्रहार मिळणार्‍या व्यक्तिला जातीतून बाहेर काढतात.” त्याचे म्हणणे एकून शाहू गाडीवानाच्या समाज पंचायतीला बोलावतात. शाहूंनी बोलावले म्हणून ते लगबगीने येतात. येतात तर काय प्रत्येकाला चपलेचा एक एक तडाखा देण्यात येतो. आम्ही काय केले असे ते शाहूंना विचारतात. तेव्हा शाहू म्हणतात ”तुम्हालाही चपलेचा मार एकेकदाच का होईना पण मिळाला. मग आता तुम्ही पण तुमच्या समाजातून बहिष्कृत झालात”. यावर सगळे गप्प बसतात. गाडीवानाला बहिष्कृत केले ही चूक केली हे ते मान्य करतात. चुकीला चूक. खोटयाला खोटे आणि गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणत सत्य न्यायाची बाजू राखण्याची हिंमत शाहूंमध्ये होती. या समाजाची लोकसंख्या मोठी म्हणून या समाजापुढे मान तुकवायची, हे असले उद्योग शाहूंनी कधीच केले नाहीत. ज्यांची लोकसंख्या कमी आणि ज्यांचा सत्ताकारणात काही उपयोगही नव्हता, अशा सगळ्यांच्या उत्थानासाठीही शाहू महाराजांनी कल्याणकारी कार्य केले. त्यांना नेतृत्व दिले. राजसत्ता सामाजिक न्यायासाठी असते, या जाणिवेतून आयुष्य वेचणार्‍या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वंदन!

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.