सामाजिक-शैक्षणिक भान जपणारा कलाधर्मी

Total Views |
saurabh sohoni


‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण खर्‍या अर्थाने ज्यांना लागू पडते, त्या सौरभ सोहोनी यांनी केवळ कला क्षेत्रच नव्हे, तर सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रांतही आपली छाप उमटवली. त्यांच्याविषयी...

सौरभ सोहोनी हे डोंबिवलीकर. ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’च्या चंद्रकांत पाटकर विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. अभिनय, दिग्दर्शन, निवेदक अशी बहुढंगी ओळख असणार्‍या सौरभ यांना वयाच्या अवघ्या अडीच-तीन वर्षांपासूनच अभिनयाची गोडी लागली. अगदी लहान असताना त्यांना गोष्ट सांगायची फार आवड होती. शिशुवर्गात असताना सौरभ यांनी शाळेच्या बसमध्ये एक गोष्ट सांगितली आणि त्या एका गोष्टीमुळे त्यांच्यातील कलागुणांना वाव देणारी एक व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आली आणि शाळेतील मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना गोष्ट सांगण्याची संधी मिळाली. खरेतर, तेव्हापासूनच निर्भीडपणे स्वतःमधील कलागुण सादर करण्याचे कसब त्यांच्यात विकसित होत गेले. ‘कलाविकास’ हा त्यांच्या शाळेमार्फत आयोजित पाच दिवसांचा कार्यक्रम असायचा. त्या कार्यक्रमात इतक्या वर्षांत जे कधीच घडले नव्हते, ते सौरभ यांनी करून दाखवले आणि ‘एकल कार्यक्रम’ सादर केला.

तिसरीत असताना त्यांनी पहिल्यांदा नाटकात काम केले. पण, हाताला दुखापत झाली असल्याकारणाने कदाचित ही पहिली संधी त्यांच्या हातून निसटण्याची दाट शक्यता होती. परंतु, अभिनयावरील प्रेम आणि जिद्द या दोहोंच्या जोरावर त्यांनी मात करत, ते पहिले नाटक सादर केले आणि कलेवर प्रेम करणारा निस्सीम कलाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. म्हणूनच ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण खर्‍या अर्थाने सौरभ यांच्यासाठी योग्य ठरते. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे, वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच निवेदन केले होते. मुख्य म्हणजे, त्या पहिल्या निवेदनासाठी त्यांना पारितोषिकदेखील मिळाले होते.

शालेय जीवनातच सौरभ यांना अनेक बक्षीसेही मिळाली. पाचवीत असताना सौरभ यांना 13 पारितोषिके प्राप्त झाली होती. छत्तीसगढला राष्ट्रीय पथनाट्याच्या कार्यक्रमातही सौरभ सहभागी झाले होते. याशिवाय, ओडिशाला दरवर्षी नाटक, नृत्य अशा कलांच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यात सौरभ यांनी सादर केलेल्या नाटकाला पहिले पारितोषिक मिळाले होते. तसेच, ‘गणित संबोध’ या परीक्षेत रौप्य पदकदेखील मिळाले होते आणि ही सर्व पारितोषके त्यांनी केवळ शालेय जीवनातच मिळाली होती. संपूर्ण शालेय जीवनात सौरभ यांनी नाटक, अभिनयासोबतच अभ्यासातही उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांना चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती मिळाली होती आणि त्यानंतर दहावीत असताना त्यांना ‘राष्ट्रीय प्रज्ञाशोध’ परीक्षेत ‘एनसीआरटी’ची पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. या शिष्यवृत्तीत त्यांचे अकारावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.

सौरभ यांनी त्यांचे महाविद्यालयीन अकरावी आणि बारावीचे शिक्षण ठाणे महाविद्यालयातून केले. त्यानंतर ‘एमबीएटेक’ हा कोर्स त्यांनी विलेपार्लेतील ‘मुकेश पटेल’ या संस्थेतून पूर्ण केला. एकीकडे शिक्षण सुरू असताना अभिनय, नाटक, कला यांचा प्रवास सौरभ यांनी सुरूच ठेवला होता. या प्रवासात त्यांना डोंबिवलीतील ‘वेद अ‍ॅक्टिंग’ संस्थेशी जोडले जात, तेथे सौरभ कविता वाचन, अभिवाचन, निवेदन, वाचिक अभिनय शिकवतात. त्याचसोबत, ‘वेद अ‍ॅक्टिंग फॅकल्टी टीम’ एकांकिकादेखील सादर करत असतात. अभिनेता म्हणून सात एकांकिका, दोन महानाट्ये, प्रायोगिक नाटक दिग्दर्शन-अभिनय आणि कला क्षेत्रात अनेक उपक्रमदेखील सादर केले आहेत.

‘ऊर्जा फाऊंडेशन’ ही संस्था प्लास्टिक गोळा करून, त्याच्या पुनर्वापरातून इंधननिर्मिती करते. त्या संस्थेसोबतही सौरभ काम करतात. ‘भारत विकास परिषद’ ही राष्ट्रीय पातळीवरील संस्था शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करते. त्याचे प्रांत संयोजक म्हणून सौरभ काम पाहतात. एकीकडे सामाजिक, कला क्षेत्रात कार्यरत असणारे सौरभ गेली अनेक वर्षे ‘फॉरेन एक्सचेंज’ या क्षेत्रात कार्यरत आहेत. ’एलळुलरीह ुेीश्रव ोपशू’ या कंपनीत ते ‘असिस्टिंग वाईस प्रेसिडंट’ असून नोकरी सांभाळून काम करत आहेत. ‘आकाशवाणी’सोबत दहा वर्षे जोडलेल्या सौरभ यांनी आत्तापर्यंत 110 विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखतीदेखील घेतल्या आहेत. शालेय जीवनात शाहीर विवेक ताम्हणकर हे शिक्षक भेटल्यामुळेच, कला क्षेत्रात काहीतरी काम करू शकलो, असे सांगून ते ताम्हणकर सरांना आपल्या यशाचे श्रेय देतात.

सौरभ सध्या ‘आकाशवाणी’च्या ‘एफ. एम. गोल्ड’ आणि ‘रेन्बो’ या दोन वाहिन्यांवर ‘रेडिओजॉकी’ म्हणूनही काम करतात. तसेच, गेली अनेक वर्षे ते विविध कार्यक्रमांमध्ये निवेदक म्हणून मुलाखतीदेखील घेत आहेत. अभिनेता म्हणून एकांकिका, महानाट्ये, प्रायोगिक नाटकांमध्येही त्यांचा सहभाग असून, नाट्य दिग्दर्शकाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. सौरभ यांनी महाबालनाट्य, राज्य नाट्यस्पर्धेतीलनाटकदेखील त्यांनी दिग्दर्शित केले होते. त्या बालनाट्यामध्ये त्यांनी अभिनयदेखील केला होता. त्या बालनाट्याचा समावेश डिसेंबर 2023 मध्ये ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाला आहे.

तसेच, सौरभ यांना ‘आदर्श डोंबिवलीकर’ पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय, कोरोना काळात सौरभ यांनी बर्‍याच शैक्षणिक संस्थांसाठी ‘डबिंग आर्टिस्ट’ म्हणून काम केले आहे. शिवाय, 2014 सालापासून सौरभ ‘मुक्तछंद क्रिएशन’ या संस्थेमार्फत सांगितिक कार्यक्रमांचे आयोजन आणि सादरीकरण करत असून त्यातून गायन, अभिनय, नाटक या क्षेत्रातील नवी पिढी घडवण्याचे काम ते करत आहेत. सौरभ यांना पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.