जनसेवेपायी काया झिजवावी...

    02-Jun-2024   
Total Views |
vijaysingh pardeshi


रा. स्व. संघाचे काम करता करता देहदान व अवयवदान याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणारे कल्याणातील विजयसिंह परदेशी यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश.

विजयसिंह यांचा जन्म मद्रासमधील चेन्नई येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी बी.एस.सी.चे शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर बी.एड. मुंबई विद्यापीठातून केले. त्यांचे वडील जगन्नाथसिंह हे सैन्यदलात होते, तर आई सरोजिनी या गृहिणी आहेत. वडील सैन्यदलात असल्याने, त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे विजयसिंह हे आईच्या सान्निध्यात जास्त काळ राहिले. १९६१ साली विजयसिंह हे कल्याणमध्ये आले. त्यानंतर ते येथेच स्थायिक झाले. ते राजस्थानमधून कल्याणमध्ये स्थिरावले. त्यामुळे लोक त्यांना सुरुवातीला, परदेशातून आलेले म्हणून परदेशी म्हणू लागले. मग हळूहळू लोक त्यांना परदेशी या नावानेच ओळखू लागले. आता परदेशी हे नावच त्यांची ओळख झाली आहे. विजयसिंह यांचे वडील जगन्नाथ, हे पुण्यातील रा. स्व. संघाच्या शाखेच्या बालविभाग प्रमुखपदी कार्यरत होते. त्यामुळे लहानपणापासूनच विजयसिंहदेखील, संघाच्या शाखेत जाऊ लागले. विजयसिंह डोंबिवलीतील स. है. जोंधळे विद्यामंदिरात ३८ वर्षे सेवा दिल्यानंतर, पर्यवेक्षक या पदावरून सेवानिवृत्ती झाले आहेत.

शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचे आणि त्यांना आकार देण्याचे काम करत असतो. शिक्षकाचे काम मार्गदर्शक, समुपदेशक आणि दिशादर्शकाचे असते. विजयसिंह यांनी शिक्षिकी पेशाकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता, एक सेवा म्हणून पाहिले आहे. शाळेच्या वेळेअगोदर त्यांनी गणित विषयात कच्चे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गणिताचे वर्ग घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला गणित विषय पक्का करण्यास मदत झाली. त्यांच्या या मेहनतीला फळ आल्याने, शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला होता. सतत सात वर्षे ते गणिताचे वर्ग घेत होते. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेसाठीमार्गदर्शन केले. त्यामुळे खानवेकर या विद्यार्थ्यांनी रौप्यपदकांवर मोहोर उमटविली आहे.

विजयसिंह यांनी आपले सहकारी पितळे आणि सूर्यवंशी, यांच्या सहकार्याने १९९६ मध्ये शाळेत ‘बालकवी मंडळ’ सुरू केले. त्यानंतर शाळेत बालकवी संमेलन भरविण्यास सुरुवात केली. विविध शाळांमधील गणित शिक्षकांच्या मदतीने, गणित संघ सुरू केले. विद्यार्थी आणि शाळेच्या गणिताचा निकाल वाढण्यासाठी असोसिएशनला मदत केली. कल्याण ग्रामीण भागासह मुरबाड, सरळगाव, डोळखांब या परिसरातील दहावीचा निकाल वाढण्यासाठी, विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयांसाठी त्यांनी मार्गदर्शनपर व्याख्याने दिली होती. बोर्ड परीक्षा, जनकल्याण समिती, शिवसेनेकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञानतज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने ठेवली जातात. त्यामध्ये विजयसिंह यांचा सहभाग होता. हुशार विद्यार्थ्यांनाही विजयसिंह यांनी प्रशिक्षण दिल्याने, १९९३-९४ मध्ये बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी आणि सामाजिकशास्त्र या विषयांत दोन विद्यार्थ्यांनी मेरिट मिळविले.

विजयसिंह यांनी शैक्षणिक कामासोबतच, अनेक सामाजिक कामांनाही हातभार लावला आहे. ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनें’तर्गत, दरवर्षी एका गरीब विद्यार्थिनीला दत्तक घेऊन तिच्या शिक्षणासाठी २५० रुपये भरण्याचे काम केले आहे. हे काम विजयसिंह यांनी सेवानिवृत्त होईपर्यंत केले आहे. अशाप्रकारचा उपक्रम राबविणारे विजयसिंह हे ठाणे जिल्ह्यातील एकमेव शिक्षक होते. १९९२-९३ पासून सलग तीन वर्षे त्यांनी, विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘कुष्ठरोग निर्मूलन मोहिमे’वर कुष्ठरोग या विषयावर एक नाटक लिहिले. आणि या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात सर्वात भीषण भूकंप झाला. त्यावेळी शाळेने निधी गोळा करून २ लाख, ५० हजार रुपयांची मदत केली. त्यांनीदेखील त्यात २ हजार, ५०० रुपयांची मदत केली. ही सर्व मदत ’मुख्यमंत्री मदतनिधी’मध्ये देऊन, भूकंपग्रस्ताना मदतीचा हात दिला. त्यांचे सामाजिक काम अजूनही सुरूच आहे. अंजूरफाट्याजवळील माणकोली येथील दत्तमंदिर येथे, भरणार्‍या जिल्हा परिषदेच्या शाळेतील लहान विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि पेन्सिल वाटप केले आहे. विजयसिंह यांच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा सार्वजनिक वाचनालयात पार पडला आहे.

देहदान आणि अवयवदान चळवळीत झोकून देऊन काम करणारे, एक समाजसेवक म्हणून ‘जॉईंट्स वेल्फेअर असोसिएशन’ने ‘विशेष कार्यप्रवण पुरुष सदस्य’ या पुरस्काराने विजयसिंह यांना गौरविले आहे. ‘युवा महाराष्ट्र फाऊंडेशन पुणे’ यांच्यातर्फे ‘महाराष्ट्ररत्न’ पुरस्काराने विजयसिंह यांना गौरविण्यात आले. शैक्षणिकसह सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करणार्‍या विजयसिंह यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!