सक्षम, सुदृढ आरोग्य व्यवस्था ही कुठल्याही देशाची ‘विकासाची दिशा’ ठरविण्यात मोलाची भूमिका बजावते. त्यासाठी वैद्यकीय सोयीसुविधांबरोबर आवश्यकता असते ते कुशल वैद्यकीय मनुष्यबळाची. ‘नीट’सारख्या परीक्षांमधून अशीच भावी डॉक्टरांची पिढी निर्माण होत असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ‘नीट’ परीक्षेचे निकाल वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. तेव्हा, ‘नीट’च्या निकालांवरील आक्षेप आणि न्यायालयाचे यासंबंधीचे आदेश यांचा आढावा घेणारा हा लेख...
‘नीट’ परीक्षेला दि. ५ मे रोजी देशभरातून ५७१ शहरातील आणि देशाबाहेरील १४ शहरांमधील एकूण सुमारे २४ लाख विद्यार्थी बसले होते. मात्र, वैद्यकशास्त्रातील एमएमबीएस, बीडीएस व आयुष अभ्यासक्रमाकरिता असलेल्या सरकारी व खासगी ७०० पेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फक्त १ लाख, ९ हजार जागा आहेत. त्यामुळे या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासठी फार मोठी स्पर्धा होणार हे गृहितच धरलेले. पण, वैद्यक अभ्यासक्रमाकरिता प्रवेशपरीक्षा घेतलेल्या ‘नीट’ परीक्षेचा निकाल दि. ४ जून रोजी जाहीर झाला. पण, अनेक विद्यार्थ्यांचे निकाल वादाच्या भोवर्यात सापडले आहेत.
त्यातच आपल्या देशात आरोग्यकारी वातावरण निर्माण करण्याकरिता डॉक्टर झालेल्यांची संख्या तशी फारच कमी. साधारणपणे एक हजार माणसांमागे एक या गुणोत्तरापेक्षाही ही संख्या कमी आहे. ती पुष्कळपटींनी जास्त हवी. विकसित देश असलेल्या ऑस्ट्रियामध्ये ५.५ डॉक्टर्स प्रति एक हजार माणसे लोकसंख्या, युकेमध्ये ही संख्या ३.३ व ़अमेरिकेत २.६ डॉक्टर्स प्रति एक हजार माणसे इतकी आहे. आहे. आपल्या देशात सध्या अनेक रोगप्रसारक शक्ती वावरत आहेत व त्यांचे निवारण करण्यासाठी डॉक्टरांची संख्या वाढायलाच हवी. ती दुप्पट होण्यासाठी अधिकाधिक डॉक्टर्स तयार होणे जरूरी. त्यासाठीच वैद्यकीय शास्त्राच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंबंधी असले वाद निर्माण होता कामा नये. म्हणूनच यासंबंधीची प्रवेशपरीक्षा घेतली तर ती पारदर्शक असायला हवी.
‘नीट’ परीक्षेच्या निकालात ७२० पैकी ७२० गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे ६७. या परीक्षेत उत्तर चुकले, की गुण कमी होण्याचा नियम. त्या नियमाप्रमाणे कोणालाही ७१८ वा ७१९ गुण मिळणे अशक्य होते. त्यामुळे ७२० पेक्षा कमी मिळविणार्या विद्यार्थ्याला ७१६ गुण मिळू शकतील.
ही वैद्यकीय प्रवेशपरीक्षा देशातील व देशाबाहेरील ५८५ शहरांतील १३ भाषांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेसाठी सुमारे २४ लाख, ६ हजार, ७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी २३ लाख, ३३ हजार, २९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सुमारे १३ लाख, १६ हजार, २६८ विद्यार्थी ‘नीट-युजी’साठी पात्र ठरले आहेत.
‘नीट’च्या यंदाच्या निकालाविरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका ‘नीट’ची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, म्हणून दाखल केली गेली. कारण, गेल्या महिन्यात या परीक्षेचा पेपर फुटला होता. तसेच गेल्या महिन्यात याच कारणाकरिता आणखी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मात्र ‘नीट’चे निकाल सरसकट रद्द करण्यास मनाई केली आहे.
‘ते’ ६७ गुणवंत
निकालाप्रमाणे या परीक्षेत ६७ जणांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत. सहा गुणवत्ताधारकांना वेळ कमी दिला गेला म्हणून ‘कॉम्पेन्सेटरी’ अधिकचे गुणही दिले गेले. दिल्ली, बहादुरगड (हरियाणा), छत्तीसगढच्या विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली होती की, त्यांना पेपर सोडवायला वेळ कमी दिला गेला. या सर्व ६७ जणांना ‘रँक १’ दिला गेला. गेल्यावर्षी ‘नीट’च्या परीक्षेत फक्त दोन गुणवत्ताधारक होते आणि एक, तीन, एक, एक असे अनुक्रमे २०२२, २०२१, २०२० व २०१९ या परीक्षेमध्ये गुणवत्ताधारक होते. वर निर्देशित केलेले असे ‘कॉम्पेन्सेटेड मार्क्स’ मिळविलेले एकूण १ हजार, ५६३ विद्यार्थी होते.
‘नीट’ परीक्षेत पेपर फुटला म्हणूनही तक्रार दाखल केलेली होती. शिवाय, सवाई माधोपूरला हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चुकून इंग्रजी माध्यमाचे पेपर दिले होते. त्यामुळे त्यांनाही ‘ग्रेस मार्क’ दिले गेले.
२०२४ सालच्या परीक्षेत ६७ गुणवत्ताधारक होते. त्यांपैकी ४४ जणांना त्यांनी उत्तर चुकलेले दाखविले तरीसुद्धा पेपरातील ‘बेसिक फिजिक्स’च्या प्रश्नाला पूर्ण मार्क दिले गेले. कारण, ‘एनसीईआरटी’च्या बारावीच्या पाठ्यपुस्तकात एक त्रुटी केलेली होती. त्यानुसार ते मार्क ‘ग्रेस’ म्हणून दिले गेले.
‘नीट’ आणि तक्रारींचा पाऊस
गेल्या पाच वर्षांत या गुणवत्ताधारकांची संख्या दोन वा तीन अशीच होती. ६७ गुणवत्ताधारक म्हणजे ‘नीट’ने सर्व जगात हसे करून घेतले आहे. याची कारणे काहींनी अशी दिली - यावेळच्या पेपरमधील प्रश्न कदाचित सोपे असतील. सोपे असले, तर ते का सोपे ठेवले? देशातील आरोग्य अजून सुधारले नाही. दुसरे कारण, ‘नीट’ने यावेळी ‘ग्रेस मार्क’ दिले. हे असे ‘नीट’ने नियमबाह्य वर्तन का केले?
‘नीट’ची धाकधूक वाढणार
‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने घेतलेल्या ‘नीट’च्या परीक्षेत हजारो विद्यार्थ्यांनी ६५० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. एवढे ६०० ते ६३० गुण मिळूनही शासकीय वा खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, याची शाश्वती नाही. गेल्या वर्षी हाच ‘कट ऑफ’ ५८४ होता.
६५० पेक्षा अधिक गुण मिळविणारे हजारो विद्यार्थी आहेत. केवळ लातूर जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक गुण मिळविणार्यांची संख्या १ हजार, २०० ते १ हजार, ३००च्या आसपास आहे. राज्यात शासकीय ३१ व खासगी २२ महाविद्यालयांत जागा मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशाची शाश्वती नाही, अशी चिंता त्यांना वाटत आहे.
महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयातील जागांची स्थिती
राज्यात एकूण ३१ शासकीय वैद्यक महाविद्यालये आहेत. (४ हजार, ९५० विद्यार्थीप्रवेश) अधिक २२ खासगी महाविद्यालये आहेत. (३ हजार, १७० विद्यार्थीप्रवेश) तसेच ‘नीट’च्या परीक्षेत देशभरात गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची संख्या ६७ (७२० पैकी ७२०) इतकी आहे. त्यापैकी महाराष्ट्रात आठ विद्यार्थी गुणवत्ताधारक आहेत. तसेच ६५० पेक्षा अधिक गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांची संख्याही ३० हजारांच्या घरात आहे. तसेच ‘नीट’ परीक्षा तत्काळ रद्द करा, अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. तसेच ‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही विद्यार्थी, पालकांसह राजकीय पक्षांनी केली आहे.
डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून देशातील लाखो विद्यार्थी ‘नीट’ परीक्षा देतात. मात्र, या परीक्षेत गैरप्रकार होत असल्यास त्याची कसून चौकशी झाली पाहिजे. ‘नीट’ची पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी ‘इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक्स्ने (आयएपी) सरकारकडे केली आहे.
‘आयएपी’ संस्थेने पत्राद्वारे मांडलेले मुद्दे
- यावर्षी ‘नीट’ परीक्षेच्या निकालामधून मेडिकल प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. ६७ जणांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत व हे संशयास्पद आहे.
- प्रत्येक प्रश्नामध्ये चार गुण उणे असतात. त्यामुळे त्यात चुकीच्या उत्तराने गुण गमावले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळालेले गुण बघता, मूल्यमापन संशयास्पद दिसते
‘नीट-युजी’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका
पात्रतापरीक्षेचा निकाल रद्द करावा आणि पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मनमानीपद्धतीने गुण दिले आहेत, असे आरोप याचिकाकर्त्याने केले आहेत.
लातूरमध्ये ‘नीट’ शिकविण्याची हजार कोटींची बाजारपेठ
गैरप्रकार, पेपरफुटीच्या कथित प्रकरणांमुळे गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या तयारीसाठी देशभरातून हजारो विद्यार्थी दरवर्षी लातूरमध्ये दाखल होतात. शिकवणी वर्गाबरोबच वसतिगृहे, खानावळी, लॉन्ड्री आदी व्यवसायांची बाजारपेठ फुलली आहे. ही उलाढाल एक हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. शिक्षकांचे वेतनही वर्षाला ३० लाख ते एक कोटींच्या आसपास झाले आहे.
दरवर्षी लातूरमध्ये सुमारे २५ हजार विद्यार्थी ‘नीट’च्या तयारीसाठी येतात. राज्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या ३० टक्के विद्यार्थी केवळ लातूरमधून परीक्षा दिलेले असतात. परिणामी, येथील बाजारपेठ फुलली आहे. पुस्तकांची व लेखनसाहित्याची बाजारपेठेची उलाढाल ७०० कोटींच्या घरात पोहोचल्याचे माहितगाराकडून कळते.
‘नीट’ची विश्वासार्हता बाधित
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी ताशेरे ओढत केंद्र सरकार व ‘एनटीए’ला नोेटीस बजावली आहे. नव्याने परीक्षा घेण्याच्या मागणीवर न्यायालयाने उत्तर उत्तर मागितले आहे. आता या याचिकांवरील पुढील सुनावणी दि. ८ जुलै रोजी होणार आङे. एकूणच काय तर केंद्र सरकारने ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या मागणीचा विचार करावा व पुढील निर्णय लवकर घ्यावे, हीच अपेक्षा.
अच्युत राईलकर