गोपाळ कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट : कर्करुग्णांचा आधार

    18-Jun-2024   
Total Views |
gopal krishn charitable trust
 
 
भारतात झपाट्याने कर्करोगाचा विळखा वाढताना दिसतो. कर्करोगाची तीव्रता कमी करण्यासाठी डोंबिवलीतील कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर ‘गोपाळ कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून कर्करुग्णांना आधार देतात. कर्करोगाचे योग्य निदान होणे गरजेचे आहे. तेव्हा, या ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागात कर्करोग निदान शिबिरांचे आयोजन करुन डॉ. हेरूर रुग्णांना खर्‍या अर्थाने संजीवनी देत आहेत. त्यानिमित्ताने कर्करुग्णांना जीवनदान देणार्‍या ‘गोपाळ कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’च्या आरोग्यहितैषी कार्यावर टाकणारा हा लेख...

‘गोपाळकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना २०१३ साली झाली. मुंबईतील दहा अग्रगण्य कॅन्सर सर्जनमध्ये ज्यांचे नाव गणले जाते, त्या डॉ. अनिल हेरूर यांनी २०१३ साली कर्करुग्णांसाठी या ट्रस्टची स्थापना केली. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा यांचीदेखील मोलाची साथ लाभली. हेरूर दाम्पत्याच्या जोडीला त्यांची टीमही याकामी तैनात असते. त्यात तेजेंद्र सिंग यांचा प्रमुख सहभाग आहे. ‘गोपाळकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’चा उद्देश कर्करोगाविषयी जनजागृती करणे, ज्यांना उपचार मिळत नाहीत, त्यांना उपचारांची सोय करून देणे, तसेच कर्करुग्णांना प्रेरणा देत त्यांना कर्करोगमुक्त होण्यास मदत करणे, असा आहे. ११ वर्षांपूर्वी कर्करुग्णांसाठी स्थापन केलेले डोंबिवलीतील ‘गोपाळकृष्ण ट्रस्ट’ची आरोग्यविषयक सामाजिक कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
 
‘गोपाळकृष्ण ट्रस्ट’ने २०१५ साली मॅमोग्राफी स्क्रीनिंग व्हॅन खरेदी केली. ‘वेळेत निदान देई जीवदान’ या तत्वावर ही व्हॅन काम करते. जेणेकरून तळागाळापर्यंत आणि गरजू व्यक्तींपर्यंत कर्करोग निदानासाठी पोहोचता येईल. या व्हॅनच्या माध्यमातून राज्यात आणि राज्याबाहेर शहर आणि खेडेगावात महिलांना स्तनाचा कर्करोग आहे का? याची तपासणी करणे, त्यांच्यावर उपचार करणे हे काम केले जाते. या व्हॅनद्वारे प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात काम करण्यात आले. वाडा, मोखाडा, तलासरी या परिसरातील लोकांचे हातावर पोट असल्यामुळे केवळ तपासणी करण्यासाठी ते एक दिवस मोडून डोंबिवलीत येऊन कर्करोगाची तपासणी करणार नाहीत. त्यामुळे संस्थाच लोकांपर्यंत पोहोचून त्यांची तपासणी आणि पहिल्या स्तरावरच कर्करोगाचे योग्य निदान केले जाते. या व्हॅनच्या माध्यमातून स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग यांची मोफत तपासणी केली जाते. तसेच, ज्यांना केमोथेरपी इतर रुग्णालयातून करणे शक्य नाही, त्यांना अल्पदरात ती उपलब्धल करून देण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केला जातो. एकूणच संस्थेच्या माध्यमातून रुग्णांना शक्य तेवढी मदत केली जाते. ‘डीएचओ’कडून (जिल्हा आरोग्य अधिकारी) यासंबंधी एकतरी शिबीर आयोजित केले जाते आणि तसे त्यांचे संस्थेला प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातही अशीच कर्करोग निदान शिबिरे ट्रस्टने वेळोवेळी भरविली आहेत.

यांसारख्या शिबिरांच्या माध्यमातून संशयित कर्करुग्णांची नोंद केली जाते. संशयित कर्करुग्ण आढळून आल्यास त्याला रुग्णालयात बोलावून रीतसर उपचारही केले जातात. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यानंतर ९० टक्के कर्करोग बरा होतो. रुग्णांचे पाच वर्षांपर्यंत उपचार सुरू असतात. कर्करोग एकदा बरा झाल्यानंतर पुन्हा उद्भवण्याचा धोका हा फारतर पुढील पाच वर्षांत जास्त असतो. कर्करोग हा पुन्हा कधी उद्भवेल, हे निश्चितपणे सांगता येत नसले, तरी पाच वर्षांनंतर पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

या शिबिरांच्या आयोजनात डॉ. अनिल हेरूर यांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या डॉॅक्टरी पेशातून वेळ काढून ते स्वतः शिबिरांसाठी उपस्थित राहतात आणि रुग्णांची वेळप्रसंगी तपासणी करतात. रुग्णांना मार्गदर्शन करणे, कर्करोगाविषयी जनजागृती करण्याचे कामही ते करतात. या व्हॅनच्या माध्यमातून आतापर्यंत १५ हजार महिलांची कर्करोग तपासणी ट्रस्टने केली आहे. व्हॅनमध्ये डोळे तपासणीदेखील केली जाते. ग्रामीण भागात विजेची समस्या असल्याने व्हॅनला जनरेटरचा सपोर्ट आहे. संस्थेला या कामगिरीबद्दल जिल्हाधिकार्‍यांनी गौरविले आहे. स्तनाचा कर्करोग असलेल्या महिलांचा एक समूहदेखील ट्रस्टने तयार केला आहे. त्या महिला एकमेकांना भेटून मानसिक आधार तसेच आजारावर मात करण्याची प्रेरणा देतात. युट्युबवर या महिलांचा एक टॉक शो ‘मीठी मीठी बाते’ या नावाने चालतो. या शोच्या माध्यमातून कर्करुग्ण आपले अनुभव आवर्जून कथन करतात.

चार कर्करोगग्रस्त रुग्णांचे अनुभवकथन असलेले ‘फिनिक्स’ नावाचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले आहे. ‘कर्करोग वॉरियर’ म्हणून पाच वर्षांपासून ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. जे कर्करोगातून बरे होत आहेत, त्यांचे नृत्य किंवा गाण्याचा कार्यक्रम घेतला जातो. कारण, कर्करोग म्हणजे आता त्या व्यक्तीचे निधन होऊ शकते, असा एक गैरसमज समाजात पसरला आहे. त्यामुळे कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो व कर्करुग्ण पूर्णपणे बरा होऊन धडधाकट आयुष्य जगू शकतो, हे दाखवून देण्यासाठी ‘कर्करोग वॉरियर’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. संस्थेच्या माध्यमातून बाईक रॅलीदेखील आयोजित केली जाते. त्या माध्यमातून कर्करोगाविषयी जनजागृती केली आहे.

या संस्थेच्या माध्यमातून डॉ. अनिल हेरूर, डॉ. अनघा हेरूर, डॉ. उमा हेरूर, डॉ. आर. जी. गिडा दुबाली, डॉ. तेजेंद्र सिंग, डॉ. जी. आर. पलगोमानी हे जबाबदारील लीलया सांभाळात आहेत. कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी एक ‘होसपाईस’ (वेदनाशमन केंद्र) उभे करायचे आहे. या केंद्रात कर्करोग झालेल्या व्यक्तीला त्यांचे नातेवाईक उपचारार्थ दाखल करु शकतात. कर्करोग झाल्यानंतर त्या व्यक्तींच्या - उदाहरणार्थ तोंडाचा कर्करोग झाला आहे, त्याला दुर्गंधी येत असते. मग अशावेळी त्या रुग्णाला घरी ठेवणे शक्य नसते. घर लहान असते. मग अशा रुग्णांना वेदनाशामक केंद्रात ठेवता येऊ शकते. हे ‘होसपाईस’ केंद्र उभे करण्याचा संस्थेचा मानस आहे. या ‘होसपाईस’साठी संस्थेने शहापूर येथे एक एकरची जागा घेतली आहे. त्याठिकाणी २० कर्करोगग्रस्त रुग्ण राहू शकतात, अशी व्यवस्था केली जाणार आहे. रुग्णांची संख्या पाहून या प्रकल्पाची भविष्यातील व्याप्ती वाढविली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना फायदा होणार आहे.

कोरोनाकाळातही भरीव कामगिरी
संस्था केवळ कर्करुग्णांसाठी कार्यरत नसून कोरोनाकाळात तीन हजार लोकांना जेवण पुरविण्याचे काम ट्रस्टने केले आहे. या काळात संस्था दोन किचन चालवत होती. तसेच परप्रांतीय कामगारांच्या जेवणाचीही सोय करण्यात आली होती.
(अधिक माहितीसाठी संपर्क - +९१ २५१ २४५४००५)