मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौऱ्यादरम्यान देशातील ९.२६ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसै जमा होणार आहेत. पीएम सन्मान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार असून देशातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारचे या योजनेसाठी २०००० कोटींहून अधिक निधी खर्च होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वात पहिले काम शेतकऱ्यांसाठी करत त्याच्या प्रलंबित निधी निर्णयावर स्वाक्षरी करत शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना आधार मिळणार असून आज स्वतः पंतप्रधान ३०००० शेतकऱ्यांना आपल्या हस्ते कृषी सखी सहाय्यतेची प्रमाणपत्रे वाटप करणार आहेत.
कृषी मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केलेला असून या कार्यक्रमांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी आर्थिक व कौशल्य विकासासाठी सहाय्य करणार आहे. पीएम किसान सम्मान योजना २०१९ साली शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली होती. वर्षाला ६००० रुपयांचे तीन हप्त्यांत विशेष सहाय्य करण्याची ही योजना सरकारने आखली होती. ज्यामध्ये शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (DBT) माध्यमातून आतापर्यंत निधीतून फायदा झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी दौऱ्यादरम्यान कार्यक्रमाची घोषणा कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली होती.
पंतप्रधान व कृषी मंत्र्यांसह देशातील २.५ कोटी शेतकरी या कार्यक्रमात देशभरातून उपस्थित लावणार आहेत.कृषी सखींनी आधीच विविध कृषी पद्धतींचे विस्तृत प्रशिक्षण घेतले आहे, ज्यामुळे ते सहकारी शेतकऱ्यांना प्रभावीपणे पाठिंबा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी सुसज्ज बनले आहेत. आजपर्यंत ७०००० पैकी ३४००० कृषी सखींना पॅरा-विस्तार कामगार म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे.