एकूणच, भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांबाबत चीनमध्ये खोलवर असुरक्षितता आहे. युद्धग्रस्त रशियावर दबाव आणणे आणि त्याला भारतापासून दूर राहण्यास भाग पाडणे, अशाही हालचाली चीनने कराव्या, असा एक मतप्रवाह चीनमध्ये आहे. तथापि, हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील भू-राजनीतीमध्ये रशियाबरोबर सामायिक आघाडी निर्माण करण्याच्या महत्त्वाबद्दल चीनदेखील जागरूक आहे.
संपूर्ण जगात भारत आणि रशिया संबंधांविषयी कुतूहल दिसून येते. गेल्या अनेक दशकांपासून विविध प्रसंगी भारत आणि रशियाच्या संबंधांनी जगाला आश्चर्याचे धक्केदेखील दिले. सध्याच्या तणावाच्या कालखंडातही भारत आणि रशियाच्या भूमिका जगाच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. अर्थात, दोन्ही देश आपापले हितसंबंध सांभाळून परराष्ट्र धोरण आखत असल्याने अनेकदा संघर्षाचे प्रसंग निर्माण होत असल्याचे चित्र तयार झाल्यानंतरही, दोन्ही देशांचे संबंध अबाधित राहिले आहेत.
युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच ही चर्चा जोर धरू लागली आहे की, चीन आणि रशिया यांच्यातील वाढत्या मैत्रीमुळे रशिया आणि भारत यांच्यातील पारंपरिक मैत्रीस धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय हितांना धक्का बसेल आणि भारत अधिकच असुरक्षित होईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या अलीकडच्या चीन दौर्याने तर अनेकांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. भारताने रशियापासून स्वतःला दूर ठेवावे, असाही एक सूर वेळोवेळी उमटतो. त्याचवेळी चीनमध्ये मात्र वेगळाच सूर असल्याचे दिसते. चीन, रशिया आणि भारत या समीकरणामध्ये चीनकडे भारत आणि रशिया यांच्यातील सखोल संबंध स्वीकारण्याशिवाय विशेष पर्याय नाही. तसे न केल्यास, हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात चीनला रशियाचे सहकार्य गमवावे लागेल आणि त्याचवेळी भारतदेखील अमेरिकेच्या अधिक जवळ येईल आणि हे दोन्हीही चीनला परवडण्यासारखे नसल्याचे मत तेथे मांडण्यात येत आहे.
गतवर्षी जून महिन्यात भारताने काश्मीरमध्ये ‘जी २०’ पर्यटन शिखर परिषद आयोजित केली होती. तेव्हा चीन आणि इतर काही ‘जी २०’ सदस्यांनी त्यावर बहिष्कार टाकला होता. मात्र, या बहिष्काराकडे दुर्लक्ष करून काश्मीरमध्ये झालेल्या परिषदेत रशियाचा अत्यंत उच्चस्तरीय सहभाग होता. चीनमध्ये याविषयी बरीच चर्चा झाली आणि रशियाच्या या पाऊलाने चीनमधील रशियन समर्थकवर्गाला अडचणीत आणले. पुन्हा जेव्हा ऑगस्ट २०२३ साली भारत आणि चीनमध्ये कमांडर-स्तरीय चर्चेची नवीन फेरी झाली, त्याचवेळी रशिया निर्धारित वेळेत भारताला ‘एस ४००’ क्षेपणास्त्र संरक्षणप्रणाली प्रदान करेल, अशा बातम्या आल्या. या वृत्तामुळे चीनमध्ये संतापाची लाट उसळली असून चीन-रशिया यांच्यातील संबंधांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.
चिनी माध्यमांच्या सर्वेक्षणात रशिया आणि भारत यांच्यातील मजबूत संबंधांबाबत निराशाजनक स्थिती दिसून येते. यावर ऑनलाईन प्रतिक्रियांमध्ये रशियाने भारताला दिलेल्या लष्करी मदतीला अनेकदा ‘चीनच्या पाठीत खंजीर खुपसणे’ असे म्हटले जाते. कारण, चीन आणि भारतामध्ये सीमाविवाद सुरू आहे. रशिया भारताला सर्व प्रकारचे फायदे देत असताना, चीनच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले जातात. भारताला रशियाकडून चौथ्या पिढीचे टँक तंत्रज्ञान मिळणे असो किंवा चीन आणि रशियाच्या प्रत्येक उपक्रमात भारताचा सहभाग असो. मग ते ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एससीओ) असो किंवा सुदूर पूर्वेकडील उपक्रम असो. चीनचे काही निरीक्षक असाही प्रश्न उपस्थित करतात की, भविष्यात भारत आणि चीनमध्ये मोठे युद्ध झाले, तर रशिया कोणाच्या पाठीशी उभा राहणार? कारण, त्यावेळी रशियाची भूमिका चीनसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
चीन, रशिया आणि भारत या सामरिक त्रिकोणाचा समतोल भारत आणि रशिया यांच्यातील सामरिक संबंधांकडे झुकलेला असू शकतो, असे चीनच्या सामरिक समुदायातील एक वर्ग तक्रारीच्या स्वरात कबूल करतो. रशिया आणि चीनसाठी हा सक्तीचा करार आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडून उद्भवणार्या समान आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तात्पुरती व्यवस्था आहे. दुसरीकडे, भारत आणि रशिया यांच्यात ’कोणत्याही सीमा, द्वेष, तक्रारी नाहीत, वाद नाहीत. दोन्ही देश एकमेकांचे नैसर्गिक मित्र आहेत. तथापि, चीनचे इतर काही निरीक्षक मानतात की, भारत आणि रशिया जवळ आहेत. एकमेकांशी घनिष्ठ संबंध चीनवर काही भू-राजकीय बंधने लादतात आणि चिनी लोकांच्या भावना दुखावतात. परंतु, चीनने अनेक कारणांमुळे या मतभेदांना फारसे महत्त्व देऊ नये.
एकूणच, भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांबाबत चीनमध्ये खोलवर असुरक्षितता आहे. युद्धग्रस्त रशियावर दबाव आणणे आणि त्याला भारतापासून दूर राहण्यास भाग पाडणे, अशाही हालचाली चीनने कराव्या, असा एक मतप्रवाह चीनमध्ये आहे. तथापि, हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील भू-राजनीतीमध्ये रशियाबरोबर सामायिक आघाडी निर्माण करण्याच्या महत्त्वाबद्दल चीनदेखील जागरूक आहे. म्हणूनच तो भारतासोबतच्या ऐतिहासिक संबंधांविषयी रशियाला नाराज करू इच्छित नाही. याशिवाय रशियाचा बुद्धिबळात वापर करून भारताला अमेरिकेच्या जवळ जाण्यापासून रोखणे हेही चीनच्या स्वार्थात आहे. त्यामुळे भारत आणि रशियाचे संबंध आहेत तसेच राहणार, हे मान्य करण्यावाचून चीनला पर्याय नाही; हेच खरे!