नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी (NEET) नीट परिक्षेतील गैरप्रकाराबाबत मोठे विधान केले आहे. नीट परिक्षेतील दोषींना सोडणार नसून कठोर शिक्षा देऊ. तसेच, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)मध्ये सुधारणांची गरज असल्याचेही शिक्षणमंत्री प्रधान यावेळी म्हणाले. नीट परीक्षेच्या निकालांमध्ये काही अनियमितता झाल्याचे सांगतानाच यात ज्यांचा सहभाग असलेल्या बड्या अधिकारीही सोडले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, "नीट संदर्भात अनियमितता समोर आली असून काही विद्यार्थ्यांना कमी वेळेमुळे ग्रेस गुण मिळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. यासंदर्भात दोन ठिकाणी काही अनियमितता समोर आल्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत असताना धर्मेंद्र प्रधान यांनी कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
विशेष म्हणजे नीट परीक्षेच्या निकालात झालेल्या हेराफेरीबाबत देशभरातील विद्यार्थी व पालक एनटीए विरोधात निदर्शने करत आहेत. दिल्ली विद्यापीठ व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, अभाविप सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थी संघटनाही विद्यार्थ्यांसह आवाज उठवित आहेत. बिहारमध्ये पकडलेल्या अनेक आरोपींनी चौकशीदरम्यान पेपर लीक व एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.