गुगल मॅपमुळे परीक्षा देता आली नाही, वाचा नेमकं काय झालं?
16-Jun-2024
Total Views | 29
महाराष्ट्र : गुगल मॅपने दाखविलेल्या चुकीच्या पत्त्यामुळे युपीएससीच्या परिक्षेपासून अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षा सेंटरवर जाण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला. परंतु, गुगल मॅपमुळेच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, कित्येक महिने परीक्षेसाठी मेहनत करुन छत्रपती संभाजी नगरपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा शेवटच्या क्षणी परीक्षा सेंटर चुकल्याने त्यांना अश्रूदेखील अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडल्या. अशातच काही विद्यार्थ्यांचे स्वप्न गुगल मॅपमुळे भंगले आहे.
युपीएससी परीक्षेकरिता छत्रपती संभाजीनगरमधील काही केंद्रावर परीक्षा होणार असून याच केंद्रांवर पोहचण्यासाठी २० ते २५ विद्यार्थ्यांनी गुगल मॅपचा वापर केला ज्यामुळे त्यांना याचा मोठा फटका बसला आहे. परीक्षेसाठी मराठवाड्यातील विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर दाखल झाले. मात्र, विवेकानंद कॉलेज हे परीक्षा केंद्र इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना माहिती नसल्याने त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली. परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले.