नेरूरमध्ये ‘पर्यावरणपुरक शाळे’ची मुहूर्तमेढ

    15-Jun-2024   
Total Views |

nerur eco school


मुंबई (विशेष प्रतिनिधी): सिंधुदुर्गतील कुडाळ तालुक्यातील नेरूर येथे पर्यावरणपुरक शाळेचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आलाय. महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षामध्ये लागू केला गेला असला तरिही या शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या संकल्पना शिकत आणि अंमलात आणत शिक्षण घेता येणार आहे.

कोकणपट्टा हा मूलतःच जैवसमृद्ध असलेल्या प्रदेशातील संपत्ती आणि पर्यावरणाचे जतन व्हावे, शाश्वत मार्गांची शिकवण विद्यार्थ्यांना द्यावी या दृष्टीने ही शाळा सुरू करण्यात आली आहे. पर्यावरण शास्त्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतेलेले सौरभ पाटकर यांना या शाळेच्या मुख्याध्यापकपदी निवडण्यात आले असून त्यांनी वायंगणीच्या किनाऱ्यावर कासव संवर्धनासाठी प्रकल्प केले आहेत. या शाळेचे आर्थिक गणित सध्या नेरूर समृद्धी प्रतिष्ठान या ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे.



nerur eco school

बालवाडी ते पाचवी पर्यंतची मुले सीड बॉल तयार करणे, रोपे त्या करणे, झाडे लावणे, त्यांना जगवणे, भाज्या लावणे, रानभाज्यांची ओळख, पर्यावरणपूरक आहार, पक्षी ओळख असे त्यांच्या क्षमतेनुसार विविध प्रकल्प करू शकतील. तर अशा अनेक मार्गांनी त्यांना पर्यावरणाशी जोडून देण्याचे काम सर्व शिक्षक करतील.

तर, महाराष्ट्र शासनाकडून इयत्ता सहावी ते दहावीची परवनगी मिळण्याच्या अपेक्षेत शाळा आणि शाळेचे विश्वस्त आहेत. या वयोगटातील विद्यार्थ्यांना climate lab ची सोय करून हवामान बदलाला तोंड कसे देता येईल, हवामान बदल रोखण्याचे प्रयत्न अशा प्रयत्नांनी शाश्वत विकासाचा मार्ग दाखवला जाईल.

नेरूर गाव हे दशावतार आणि विविध लोककलांसाठी सुप्रसिद्ध आहे. या कलांची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन कलाकारांचे सक्षमीकरण व्हावे आणि कलेचा सन्मान व्हावा अशा ही योजना आणि उपक्रम संध्याकाळच्या सत्रात राबवल्या जाणार आहेत.

“नेरूरची ही शाळा ग्रीन कॅम्पस करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. यामध्ये सौर ऊर्जा निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन, पर्जन्य जल संधारण, हवेची गुणवत्ता राखणे आणि जैवविविधतेची ओळख आणि संवर्धन या गोष्टी हाती घेतल्या आहेत. शाळेला चांगला प्रतिसाद मिळत असून हाती घेतलेलं हे काम यशस्वी होईल अशी आशा वाटते.”

- डॉ. नंदिनी नेरूरकर-देशमूख
प्राध्यापिका, विश्वस्त
नेरूर समृद्धी प्रतिष्ठान

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.