'आप'ला 'तो' व्हिडीओ भोवला; कोर्टाचा पुन्हा केजरीवालांना दणका!
15-Jun-2024
Total Views | 54
नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी तुरुंगवासात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सुनीता केजरीवाल यांनी पती अरविंद केजरीवाल यांचे भाषण दाखविण्यासाठी न्यायालयीन कामकाज रेकॉर्ड करून व्हायरल करण्यात आले होते. या प्रकरणात सुनीता केजरीवाल यांना संबंधित व्हिडीओ हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, न्यायालयीन कामकाजाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना व्हिडीओ हटविण्याचे आदेश दिले. अधिवक्ता वैभव सिंह यांनी सुनीता केजरीवाल, आप नेते व समर्थकांविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर सुनावणी करताना आप पक्षाला सोशल मीडियावरून व्हिडिओ हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या मद्य घोटाळ्यात तुरुंगात आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना जामीन मिळाला होता, पण नंतर जामीनास मुदतवाढ न मिळाल्याने पुन्हा तुरुंगात जावे लागले. आता त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने सोशल मीडियावरून एक व्हिडिओ हटवण्यास सांगितले आहे. सुनावणीदरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल स्वतः कोर्टाला संबोधित करत आपली बाजू मांडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते.