"मला तिकीट मिळू नये यासाठी काँग्रेसमधील अनेक लोकांनी सुपारी दिली होती," हे वक्तव्य आहे, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचं. नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार, नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि लोकसभेच्या जागावाटपावेळी पुढे आलेला नाना पटोले विरुद्ध वर्षा गायकवाड हे काँग्रेसमधील अंतर्गत वाद सर्वपरिचित आहेतच. परंतू, आता प्रतिभा धानोरकरांच्या या वक्तव्याने धानोरकर विरुद्ध विजय वडेट्टीवार हा नवा वाद पुढे आलाय. प्रतिभा धानोरकरांनी आपल्या वक्तव्यात कुणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा विजय वडेट्टीवारांवरच आहे हे निश्चित. शिवाय लोकसभा निवडणूकीदरम्यानच्या काही घडामोडींकडे वळून बघितलं तर धानोरकरांचं हे वक्तव्य वडेट्टीवारांनाच उद्देशून असल्याचं स्पष्ट होतं. तर प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवर यांच्यातील वाद नेमका काय आहे आणि धानोकरांनी वडेट्टीवारांवर सुपारी देण्याचा आरोप करण्यामागे काय कारण आहे, हे जाणून घेऊया.
लोकसभा निवडणूकीमध्ये चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये चांगलंच नाराजीनाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. पण अखेर पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करत दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली होती. प्रतिभा धानोरकरांनी लोकसभा निवडणूकीत विजयही मिळवला. त्यानंतर आता त्या विविध मतदारसंघांमध्ये मतदारांचे आभार मानन्यासाठी दौरे करताहेत. शिवाय खासदार झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात येतोय. अशाच एका समारंभात त्या काहीतरी वेगळंच बोलून गेल्या आणि त्यांच्या याच बोलण्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगलीये. राजूरा येथे आयोजित सत्कार समारंभात त्यांनी थेट आपल्याच पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केलाय.
प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, "आमच्या पक्षातील अनेक लोकांनी मला तिकीट न मिळण्यासाठी सुपारी दिली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना मला तिकीट मिळू नये यासाठी सुपारी देण्यात आली होती. काहीही करा पण प्रतिभाताईंना तिकीट देऊ नका, असं त्यांना सांगण्यात आलं. जेणेकरून सुधीर मुनगंटीवार घरी बसून निवडणूक जिंकू शकतील. पण सुभाष भाऊ सुरुवातीपासून माझ्यासोबत राहिले. अनेकांनी त्यांना पैसे देऊन मॅनेज करण्याचाही प्रयत्न केला. पण ते कुणाच्या खोट्या आश्वासनांना विकल्या गेले नाहीत. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला," असे त्या म्हणाल्या. याशिवाय आतापर्यंत गडचिरोली विधानसभेला मंत्रिपद जात होतं. पण आता ते चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभेला कसं येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेन, असंही विधान त्यांनी केलंय. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे गडचिरोली लोकसभेत येणाऱ्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे प्रतिभा धानोरकरांचा हा रोख थेट विजय वडेट्टीवारांवरच असल्याचं स्पष्ट झालंय.
चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून सुरुवातीपासूनच काँग्रेसमध्ये वाद सुरु असल्याचं पाहायला मिळालं. विजय वेडट्टीवार, आपली मुलगी शिवानी वेडट्टीवार यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते. शिवानी वडेट्टीवारांनी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते जयराम रमेश, खासदार मुकुल वासनिक यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. तर दुसरीकडे, प्रतिभा धानोरकर यासुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होत्या. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर आपल्याला उमेदवारी मिळावी असा त्यांचा आग्रह होता. प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक बोलवून स्थानिक उमेदवार हवा, असा ठराव काँग्रेसच्या केंद्रीय समितीकडे पाठवला होता. हा ठराव पाठवण्याचा उद्देश शिवानी वेडट्टीवार यांच्या उमेदवारीला विरोध करणे हाच होता. त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मध्यस्ती करत विजय वडेट्टीवारांना एक तर तुम्ही लोकसभा लढवा अन्यथा धानोरकर यांना उमेदवारी द्या, असं सांगितलं होतं. त्यानंतर वडेट्टीवारांनी माघार घेतल्यावर प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यानंतरही धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार हा वाद कायम राहिला.
उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकरांनी महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांचे आभार मानले. पण त्यांनी वडेट्टीवारांचं नाव घेणं मात्र टाळलं. यावर वडेट्टीवारांनी सारवासारवही केली होती. परंतू, उमेदवारीसाठीचा हा वाद प्रकर्षाने पुढे आल्याचं स्पष्ट दिसत होतं. शिवाय धानोरकरांच्या प्रचारसभेतही वडेट्टीवार फारसे दिसले नाहीत आणि आता धानोरकरांनी विजय मिळवल्यानंतर त्यांच्या सत्कार सोहळ्यातही ते फारसे दिसत नाहीत. त्यानंतर आता प्रतिभा धानोरकरांनी उमेदवारी न मिळण्यासाठी सुपारी दिल्याचा आणि पैसे देऊन मॅनेज केल्याचा आरोप वडेट्टीवारांवर केलाय. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि धानोरकर, वडेट्टीवार यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत. काँग्रेस नेत्यांच्या या वादांकडे बघितल्यास निश्चितच काँग्रेसमध्ये काहीही आलबेल नसल्याचं बोललं जातंय.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....