"मविआची अवस्था म्हणजे घराला नाही कौल आणि..."; चित्राताईंचा खोचक टोला
15-Jun-2024
Total Views | 68
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुरघोड्यांचं राजकारण सुरु असून आगे आगे देखो होता है क्या? असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत मविआवर निशाणा साधला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, " महाविकास आघाडीची अवस्था म्हणजे 'घराला नाही कौल, नुसताच रिकामा डौल' अशी झाली आहे. महाविकास आघाडीत आघाडीत कुरघोड्यांच राजकारण सुरू आहे. एकीकडे नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार तर दुसरीकडे रोहित पवार विरुध्द जयंत पाटील असा सामना पहायला मिळत आहे. त्यामुळे आगे आगे देखिये होता है क्या?" असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसमधील नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार हा संघर्ष सर्वपरिचित आहे. मात्र, आता शरद पवार गटातही जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असा सामना सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी राज्याची मुख्य जबाबदारी रोहित पवार आणि शशिकांत शिंदेंकडे देण्याची मागणी केली. या मागणीमुळे त्यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला आव्हान दिल्याचं बोललं जात आहे.
महाविकास आघाडीची अवस्था म्हणजे *घराला नाही कौल, नुसताच रिकामा डौल*
त्यामुळे सतर्क झालेल्या जयंत पाटील यांनी अहिल्यानगरमधील पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार व्यासपीठावर उपस्थित असताना त्यांनी पक्षांतर्गत कुरघोडींवर जाहीर भाष्य केले. ते म्हणाले, “माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचे महिने याआधी अनेकांनी मोजून झाले आहेत. आता पुढील चार महिने मोजू नका, कारण आता निवडणूक आहे. जाहीरपणे बोलायचे बंद करा. काही तक्रार असेल, तर शरद पवार यांना भेटा. ते आमच्या दोन कानाखाली मारतील, नाहीतर त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेतील. फक्त ट्विटरवरवगैरे बोलणे बंद करा,” असे सांगत त्यांनी रोहित पवारांच्या कुरघोडींकडे सर्वांते लक्ष वेधले.