वाचनसंस्कृतीला वाईट दिवस आले आहेत, अशी ओरड सातत्याने समाजातून होत असताना, तिशीतला तरुण एक अभ्यासपूर्ण कादंबरी लिहितो आणि त्याच्या एका वर्षात तब्बल दहा हजार प्रती लगोलग विकल्याच जात नाहीत, तर वाचल्याही जातात. आजच्या वाचकांचं लक्ष वेधून घेणारं असं काय आहे या ‘महामाया निळावंती’त? या कादंबरीच्या यशाच्या निमित्ताने आजचा वाचक आणि साहित्य क्षेत्राची कालसुसंगतता जाणून घेताना लेखक सुमेधसोबत गप्पा..
या कादंबरीसाठी मुळात ‘निळावंती’ हा विषय निवडावासा का वाटला? एकूणच ही साहित्यनिर्मितीची प्रक्रिया कशी होती?
‘निळावंती’ ही माझी पहिली कादंबरी नाही. ‘निळावंती’आधी मी ‘अजातशत्रू’ नावाची एक कादंबरी स्टोरीटेल ऑडिओ बुकसाठी लिहिली होती. तीदेखील प्रकाशित झाली आहे. ‘निळावंती’ हा विषय का निवडावासा वाटला, याचं एक ठाशीव उत्तर माझ्याकडे नाही. ही कादंबरी संपूर्ण लिहायला मला तीन वर्षे लागली. त्या तीन वर्षांपैकी पहिले सहा महिने माझे विषयावर विचार करतानाच गेले. कसं आहे, या कादंबरीचा जो ‘जॉनर’ आहे, तो काहीसा गूढ किंवा ‘साय-फाय’ प्रकारात मोडतो, तर मराठी वाचकांना हे वाचायची फारशी सवय नाहीये. मराठीत यापूर्वी धारपांनी गूढ कादंबर्या लिहिल्या आहेत, तर करंदीकरांनी ‘साय-फाय’ हा ‘जॉनर’सुद्धा हाताळला आहे. परंतु, ही कथानकं अस्सल भारतीय नाहीत. त्यांना पाश्चिमात्य संस्कृतीचा स्पर्श आहे. आपल्याकडे गोड कथांना मागणी नसली, तरी पण ती चालतात. कारण, आपल्या लोककथा त्या धाटणीच्या आहेत. एकदा विषयावर शिक्कामोर्तब झालं आणि मी पुढे काम करायला सुरुवात केली.
आता निर्मितीची प्रक्रिया हा प्रश्न तू विचारलास. खरंतर, प्रत्येक कलाकृतीची त्याच कलाकाराची निर्मितीची प्रक्रिया वेगवेगळी असते. ‘महामाया निळावंती’ ही कादंबरी प्रकाशित करायची, तर मला तिच्याबद्दल थोडीशी माहिती असणं गरजेचं होतं. उद्या एखाद्या व्यक्तीला ‘निळावंती’विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर मी त्याला दोन गोष्टी सांगू शकलो पाहिजे. एखादी निर्मिती करताना त्याच्या निर्मात्याची एक जबाबदारी असते. ‘निळावंती’ ही कादंबरी निर्माण करतानासुद्धा ती उथळ होऊ नये आणि क्वचित कोणाला इच्छा असल्यास तिचा उपयोगच व्हावा, ही माझी जबाबदारी आहे, असं मला वाटतं. खरंतर, पुस्तक हातात घेतल्यानंतर वाचकाला ती विकत घ्यावीशी वाटलं पाहिजे. विकत घेतल्यानंतरसुद्धा त्यात काही नाही, असं बघून त्याचा हिरमोड झाला, तर तो यापुढची पुस्तकं विकत घेणार नाही, मग वाचकांना काय आकर्षित करते तर, त्यात श्लोक दिसले पाहिजेत. ‘महामाया निळावंती’ तंत्राची एक आकृतीत दिलेली आहे. हे सर्व करून मला तीन वर्षे हे पुस्तक पूर्ण करायला लागली.
मी एका घरी वास्तुशांतीसाठी गेलो होतो आणि त्यावेळी त्यांनी त्यांचं घर उत्साहाने दाखवलं. त्यांच्या घरात एका खोलीला खोटं गंगावण लावलेलं होतं. पण, या गंगावणाचं विशेष इतकंच की, ते निळ्या रंगाचं होतं. ‘निळावंती’चा विषय कुठेतरी मागे चालू होताच, डोक्यामध्ये तेव्हा हा विषय चमकला की निळ्या रंगाचे केस असतील, तर काय होईल? हा विचार लिहून काढून मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली. जगाच्या पाठीवर असे केस कुठे आहेत का? अमेरिकेतील केंटूकी नामक एक प्रदेश आहे, तिथे एक वनवासी समाज राहतो. त्यांच्या डीएनएमध्येच ‘म्युटेशन’ होऊन त्यांचे केस निळसर झालेले आहेत. भारतामध्ये आज नाही, पण यापूर्वी असं केव्हा होतं का? हे शोध घ्यायचा मी जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा वेदांमध्ये नाही, पण पुराणांमध्ये मात्र मला याचे संदर्भ सापडले. राम म्हण किंवा कृष्ण म्हण, कालीमाता म्हण, या सर्व सावळ्या किंवा कृष्णवर्णीय देवता. भारतीय पुराणानुसार जी ६४ तंत्रं आहेत, त्यातलं पहिलं तंत्र म्हणजे महामायेचं तंत्र. ते लक्षात घेता, त्या महामायेचा रंग निळसर आहे. अर्थात. हे सगळं तुकड्यातुकड्यांमध्ये डोक्यात होतं. ते व्यवस्थित मांडून, एकत्र सांधून त्यातून एक कथानक तयार केलं. अशी ‘निळावंती’ साकार झाली.
या कादंबरीत वेगवेगळ्या काळातील आणि वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशातील अनेक पात्रं आहेत. ती उत्तम साकारलीयेत. तसंच, त्यांचे एकमेकांशी संवादही आहेत. या पात्रांचं व्यक्तिमत्त्व कसं आकाराला आणलं?
आपल्याकडे सर्व पात्रं साकारताना त्यावर लेखक स्वतःच काम करतो. इतरांची मदत घेतली जात नाही. मला वाटतं की, पुरुष लेखकानेसुद्धा स्त्री पात्रं साकारताना स्त्रीची मदत घ्यायला हवी. पात्रं उभी करायची म्हणजे, त्यांचे स्वभाव सुरुवातीला मांडावे लागतात आणि मग ती पात्रंच त्यांचं-त्यांचं काम करत राहतात. तिथे आपल्याला विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. ही संपूर्ण कादंबरी पुरुषी दृष्टिकोनातून प्रथम पुरुषात लिहिलेली आहे. त्यामुळे स्त्रीच्या व्यक्तिरेखासुद्धा पुरुष तिच्याकडे कसं पाहतो, यावरच बेतलेल्या आहेत. काळ कोणताही असो, प्रांत कोणताही असो, स्त्री-पुरुषांची विचार करण्याची मानसिकता साधारण सारखी असते. विक्रम हा पुरुष स्त्रीचा द्वेष करणारा आहे. तो स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहतो आणि तसंच संपूर्ण जगाकडेही तो स्वार्थी दृष्टिकोनातून पाहतो. यात अपवाद मात्र लहान मुलीची प्रतिमा. ती तयार करताना मला लहान मुलांचीच मदत झाली. म्हणजे, मी कोणत्या लहान मुलांसोबत बसून गप्पा वगैरे नाही मारल्या, पण आजपर्यंत मी लहान मुलांकडे ज्या प्रकारे पाहत होतो, त्यांच्या विचारांच्या कक्षा, त्यांचं भावनिक जग या सगळ्यांचा विचार करून विभूतेची मुलगी, या छोट्या मुलीचं पात्र उभं केलं. पण, मी मगाशी म्हटलं तसं एखादं पात्र उभं करताना कुणा एकाची मदत घ्यायला हवी, असं मला वाटतं म्हणजे त्यासाठी विचार लेखकाचाच असतो. परंतु, ते पुस्तक एकांगी व्हायला नको म्हणून भिन्नलिंगी पात्रांसाठी स्त्रीची मदत घ्यायला हवी, असं मला वाटतं.
ही कादंबरी वाचल्यानंतर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांविषयी काय सांगशील?
आता बघ, मी कोणी प्रसिद्ध लेखक नाही. त्यामुळे माझं नाव वाचून माझं पुस्तक विकत घेईल, असेे वाचक नाहीत. मग पुस्तकांची विक्री व्हावी, यासाठी आपण काय करायचं तर, पॅकेजिंग महत्त्वाचं. ‘निळावंती’विषयी आपण कुठे ना कुठेतरी ऐकलेलं असतं. त्या नावाबद्दलच आपल्याला उत्सुकता किंवा आकर्षण असतं. पुस्तकाचं नाव आणि लेखकाच्या नावाखालोखाल काय पाहिलं जातं, तर त्याचं मुखपृष्ठ. या मुखपृष्ठावर हूक असणं अत्यंत महत्त्वाचे. या मुखपृष्ठावर आपण माणसाला गुंतवू शकलो, तर तो ते पुस्तक हातात घेतो आणि चाळतो. पुस्तक हातात घेताना निव्वळ एकरेषीय मजकूर वाचून तो तसंच ठेवण्याचा संभव जास्त असतो. मग, ‘निळावंती’ तंत्राची प्रतिमा आणि संस्कृत श्लोक त्यांच्या अर्थासहित लिहिले आहेत. या कादंबरीत काहीतरी तथ्य आहे, असं वाटून लोक ते विकत घेणार. हा विचार करून पुस्तकाची रचना केलेली आहे. आता वाचकांच्या प्रतिक्रियांबद्दल तू म्हणशील तर त्या मिश्र आहेत. ‘निळावंती’विषयी प्रत्येकाने काहीतरी ऐकलेलं असतं की, तिची पोथी उपलब्ध नाहीये. ती वाचल्याने माणूस एकतर वेडा होतो किंवा आत्महत्या करतो किंवा ती पोथी जमिनीखालचा खजिना शोधून द्यायला मदत करते.
आता वाचकाने पुस्तक विकत घेतले. आपण पुस्तक विकत घेतो आणि घरी आणून ठेवतो. प्रत्येक वेळी ते पुस्तक वाचतोच असं नाही. या पुस्तकाबाबत मात्र असं झालं नाही. मला सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या. म्हणजे ‘निळावंती’विषयी अपेक्षित असलेली माहिती या पुस्तकात लिहिलेली नाही, इथंपासून ते प्रतीकात्मक प्रकारे ‘निळावंती’ कोण असू शकेल, इथंपर्यंत तुम्ही सांगितले म्हणून पुस्तक आवडलं, अशा मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. पुस्तकाच्या दहा हजार प्रतीही संपल्या. त्यामुळे ही कादंबरी फक्त विकली गेली नाही, तर ती वाचलीसुद्धा गेली! आणि हे मी माझे यश मानतो. बाकी ही तर निव्वळ सुरुवात आहे. मी इतर लेखकांशीसुद्धा बोलतो की, तुमची अमुकअमुक पुस्तकं विकली गेली, पण तुम्हाला वाचकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? किती मिळतोय? अभिप्राय मिळतोय का? तर मला असं लक्षात आलं की, वाचकांचा अभिप्राय महाग आहे. मला वाचकांनी मुबलक प्रतिसाद दिला. अभिप्रायसुद्धा दिला चांगला आणि वाईट दोन्ही. अगदी रात्री दोन-दोन वाजता मेसेज करून, माझ्या फेसबुकचा इनबॉक्स अक्षरशः मेसेजेसने भरून जायचा. म्हणूनच प्रतिक्रिया काय मिळाल्या, यापेक्षा प्रतिक्रिया खोर्याने मिळाल्या, यात मला आनंद वाटतो.
या पुस्तकाला ग्रामीण भागातूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यानंतर मराठीव्यतिरिक्त इतर भाषांतूनसुद्धा. आता त्याचं हिंदीमध्ये भाषांतर करायचा माझा प्रयत्न सुरू आहे. एका कन्नड प्रकाशकाने याचे प्रकाशन हक्क विकत घेतले आहेत. या कादंबरीचा ‘सिक्वेल’ आणि ‘प्रिक्वेल’ करायचासुद्धा विचार आहे. चित्रपट माध्यमातूनसुद्धा यावर काय करता येईल का, असाही विचार आहे. ‘अमेझॉन’वर हे पुस्तक ‘बेस्टसेलर’ म्हणून विकलं जातंय तर, त्यातून आपल्याला विविध प्रदेशांतल्या पुस्तक विक्रेत्यांची माहिती मिळते. तो सगळा डेटा मिळवून तपासलं तर, मराठवाडा आणि विदर्भ या भागात पुस्तक जास्त वाचलं जातं आहे. पुण्याकडे शहरी भागात या पुस्तकाला मागणी फार आहे, असं लक्षात येतं.
यानिमित्ताने केलेले वाचन, संशोधनाअंती तुला समजलेली ‘निळावंती’ कोण?
‘निळावंती’ या कादंबरीमध्ये जरी एक नायिका असली तरी, माझ्या मते, माझ्या दृष्टिकोनातून ‘निळावंती’ म्हणजे निसर्ग. आपण त्याला ‘ती’ किंवा ‘तो’ मध्ये बांधून ठेवायला नको. निसर्ग हा माणूस या जगात येण्याच्या आधीपासून आहे आणि माणूस संपल्यावर सुद्धा राहणार आहे. आज माणूस निसर्गाला संपवण्याच्या कितीही आघाडीवर असेल, तरीही एक दिवस मात्र अशा उजाडेल ज्यावेळी माणूस या जगात नसेल, पण निसर्ग मात्र असेल. असा माझा स्वार्थी दृष्टिकोन आहे. ‘निळावंती’ म्हणजेच निसर्ग आहे, असं मला वाटतं आणि म्हणून मला निसर्ग माझ्या प्रत्येक कथेत हवा असतो.
मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.