'जी-७' नावाने प्रसिद्ध असणारी जगातील सात प्रमुख देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे संमेलन इटलीमध्ये सुरू आहे. यासाठी या सात देशांव्यतिरिक्त इतरही अनेक देशांचे प्रमुख या संमेलनास हजर राहणार आहेत. या संमेलनात चर्चेला येणार्या विषयांकडे जगाचे लक्ष लागले असल्याने, हे संमेलन कायमच चर्चेचा विषय असते. मात्र, हे संमेलन एका वेगळ्याच कारणाने चर्चेत राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेले जो बायडन यांचं वागणं हे या संमेलनात चर्चेच्या अग्रस्थानी राहिले आहे. जी-७ बैठकीत अनेक ठिकाणी बायडन काही विक्षिप्त कृती करताना दिसून आले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असणारे बायडन हे सध्या ८१ वर्षांचे आहेत. इतक्या वृद्धापकाळात अमेरिकेसारख्या देशाची जबाबदारी स्वीकारणारे ते एकमेव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. इटलीमधील जी-७ संमेलनात त्यांचे विक्षिप्त वागणे अधोरेखित झाले आहे. व्हायरल झालेल्या चित्रफितीमध्ये असे दिसते की, बायडन यांनी ’चक शुमर’ या अमेरिकन सिनेटरने उपस्थित प्रत्येकाशी हस्तांदोलन केले. त्यावेळी सर्वप्रथम हस्तांदोलन हे राष्ट्राध्यक्ष असलेल्या जो बायडन यांना केले. मात्र, आपण हस्तांदोलन केले असल्याचा बायडन यांना विसर पडल्याचे त्या चित्रफितीमध्ये स्पष्ट दिसते.
तसेच 'जी-७' संमेलनापूर्वी पॅराग्लायडर्सच्या साहसी कसरतींचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सर्व जागतिक नेते एकीकडे लक्ष देत असताना, बायडन मात्र सगळ्यांच्या विरुद्ध दिशेला जात असल्याचे समोर आले. यावेळी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी बायडन यांना योग्य मार्ग दाखवत परिस्थिती सांभाळून घेतली. बायडन यांच्या प्रकृतीविषयीच्या चर्चा या अचानक सुरू झालेल्या नाहीत. याआधीसुद्धा बायडन यांचे मानसिक स्वास्थ्य हे उत्तम नसल्याची चर्चा झाली आहे. मध्यंतरी, त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास असल्याच्या चर्चादेखील सुरू झाल्या. मात्र, त्यांच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी या सगळ्या गोष्टींच्या शक्यता नाकारत, बायडन हे राष्ट्राध्यक्षपदासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या पूर्णपणे सक्षम असल्याचे सांगितले.
अमेरिकन न्यायालयात एका खटल्यादरम्यान बायडन यांच्या अभियोक्तानेसुद्धा बायडन यांच्या वयानुसार होणार्या स्मृतीवरील परिणामांचा विचार करून सहानुभूती दाखवण्याची विनंती न्यायालयास केली होती. अर्थात, ट्रम्प यांच्या वकिलाने ’जर बायडन हे एक साक्ष देण्यासाठी स्वत:ला सक्षम समजत नसतील, तर ते देश कसा चालवणार?’ असा रोकडा सवाल उपस्थित केला होता. खरे पाहता, ८१ वर्षांच्या बायडन यांचे वय हे पुन्हा निवडणूक लढवण्याचे नाही, पण हा निर्णय घेण्याची ताकद आजमितीला डेमोक्रेटिक पक्षाकडे नाही. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी देखील देशहिताला प्राधान्य देत, प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला होता. शिंजो आबे यांचा हा निर्णय जितका स्तुत्य होता, तितकाच तो अनुकरणीयदेखील होता. पण, डेमोक्रेटिक हे काही शिकण्याच्या तयारीत दिसत नाहीत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख असतात. इतर देशांशी असलेले संबंध कसे असावे, याचे निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष घेतात, कोणत्याही देशातील राजदूत नेमण्याचे पूर्णाधिकार हे सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे असतात. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे जर बायडन यांच्या प्रकृतीबाबतच्या चर्चा खर्या असतील तर, डेमोक्रेटिक पक्षाला याबाबत गंभीर विचार करणे आवश्यक आहे. बायडन यांच्या या कमकुवत बाजूचा गैरफायदा अमेरिकेच्या अंतर्गत आणि बाह्य शत्रूंनी घेतल्यास,अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेलादेखील धोका निर्माण होण्याची भीती नाकारता येत नाही.
आज जगात अमेरिकेचे जे स्थान आहे, त्यानुसार बायडन यांच्या निर्णयाचे परिणाम संपूर्ण जगावर होणार आहेत. बायडन यांच्या आरोग्याचा प्रश्न जेवढा अमेरिकेसाठी महत्त्वाचा आहे, तितकाच जगासाठीसुद्धा आहे. एवढे सत्य समोर दिसूनसुद्धा, बायडन हेच योग्य उमेदवार कसे हे पटवण्यात डेमोक्रेटिक पक्ष मेहनत घेत आहे. ते पाहून या परिस्थितीला संगीत शारदा नाटकातील म्हातारा इतुका... अवघे पाऊणशे वयमान हेच गाणे समर्पक वाटते.
कौस्तुभ वीरकर