भाजपच्या विजयाचा संकल्प

    14-Jun-2024
Total Views | 195
editorial on bjp devendra fadnavis vijayi sankalp


केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी झाला, तरी भाजपचा कसा पराभव झाला आहे, हे विरोधी पक्षनेते अजूनही ठासून सांगत आहेत. स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत. भाजपचा देशभरात जनाधार वाढलेला असतानाही, हा त्याचा पराभव असल्याची अफवा आत्ममग्न विरोधक पसरवत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे काम आणि कार्यकर्त्यांच्यावरील अदम्य विश्वास यांच्या जोरावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला विजयी संकल्प निश्चितच ऊर्जादायी! 

लोकसभेचे निकाल जाहीर झाले, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारचा शपथविधीही झाला. संपूर्ण देशात भाजपने मतांची टक्केवारी वाढवत चांगली कामगिरी केली, म्हणूनच काही राज्यांमध्ये पैकीच्या पैकी, तर काही राज्यांमध्ये अनपेक्षितपणे भर पडलेली दिसून आली. केवळ चार राज्यांमध्ये ध्रुवीकरण झाल्यामुळे भाजपला फटका बसला, आणि त्याचे संख्याबळ कमी झाले. देशातील २८ विरोधी पक्षांच्या ’इंडी’ आघाडीच्या एकत्रित जागांपेक्षाही, भाजपला मिळालेल्या जागा या जास्त आहेत. असे असतानाही, भाजपला जनतेने नाकारले, अशी प्रौढी मिरवत देशातील प्रमुख विरोधी पक्षनेते, आणि महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचे टोलेजंग नेते स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. शहामृगासारखे त्यांनी स्वतःचे डोके वाळूत खुपसले असल्याने, ते वस्तुस्थिती जाणून घेण्यास तयारच नाहीत. ’ध्रुवीकरण’ आणि ’फेक न्यूज’ या बळावर इंडी आघाडीची मते वाढली. त्यात कोणत्याही विरोधी नेत्याचे कर्तृत्व नाही.

एक खोटी गोष्ट १०० वेळा सांगितली की, ती खरी वाटू लागते. राज्यात आणि देशभरात असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. म्हणूनच, सोरोस पुरस्कृत फेक नरेटिव्ह, निवडणूक प्रचारात चालवला गेला, आणि काँग्रेसी माध्यमांनी तो उचलून धरली. भाजपला ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर तो संविधान बदलणार हा प्रमुख अपप्रचार विरोधकांनी केला. काँग्रेसी माध्यमांनीही भाजपला ४०० जागा का हव्या आहेत, हा प्रश्न उपस्थित करत हा खोटा प्रचार पक्का केला. ७६ जागांवर भाजपला निसटता पराभव पत्करावा लागला. भाजपच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पडणारा हा निकाल, असे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात पक्षाचा जनाधार वाढला असल्याचेच ते द्योतक आहे. संख्याबळात ते प्रतिबिबिंत होत नसले, तरी वस्तुस्थिती त्यामुळे बदलत नाही. मुंबईतील निकाल हे त्याचे प्रत्ययकारी उदाहरण. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला मुंबईत दोन लाख मते जास्त मिळाली, तरी जागा कमी झाल्या. हा विरोधाभास सारे काही स्पष्ट करतो.

उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभांमधून संबोधित करताना, माझ्या हिंदू बंधू-भगिनींनो असे संबोधणे बंद केले. विशिष्ट धर्माच्या एकगठ्ठा मतांसाठी त्यांनी त्यांचे लांगूलचालन करण्याचे जे धोरण अवलंबले होते, त्याचेच फळ म्हणून उद्धव ठाकरे गटाच्या जागा वाढल्या, हे निकालच सांगतात. मुंबईतील पारंपरिक मराठी माणसाने, तसेच ज्यांच्या चार पिढ्या राज्यात राहत आहेत, त्या उत्तर भारतीयांनीही भाजपलाच मतदान केले, हे दिसून येते. म्हणजेच, उद्धव ठाकरे यांना मुंबईकर जनतेने नाकारले असल्याचे स्पष्ट दिसून येते. उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान, हे ध्रुवीकरण आणि एकगठ्ठा मते यांचेच. वरळी हा तर ठाकरे यांचा बालेकिल्ला असल्याचे त्यांनी यापूर्वी वारंवार म्हटलेले आहे. त्याच वरळीतून त्यांचे मताधिक्य कमी झाले, ही एकच गोष्ट सारे काही ठळकपणे सांगते.

म्हणजेच, सामान्य जनतेने देशातील विरोधकांच्या ’इंडी’ आघाडीला स्पष्टपणे नाकारले, हे दिसून येते. फेक नरेटिव्ह फॅक्टरी जोरात चालवली, म्हणूनही असे घडले असे म्हणता येते. भाजप संविधान बदलणार, भाजपला आरक्षण संपवायचे आहे, या खोट्या प्रचाराने भाजपचे नुकसान केले. मात्र, असे खोटे वारंवार बोलता येत नाही, याचा विसर विरोधी पक्षांना पडलेला दिसतो. मुंबईकर या अपप्रचाराला बळी पडलेले नाहीत, हेही निकालांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळेच, येत्या काळात होत असलेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका असोत वा मुंबई पालिकेच्या निवडणुका असोत, भाजप आणि मित्रपक्ष या निवडणुकीत विजयी होणार, असे निश्चितपणे म्हणता येते. भाजपचा जनाधार वाढलेला असून, मतांच्या टक्केवारीतून ते दिसून येते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाषण हे फेक नरेटिव्ह खोडून काढणारे तर ठरले आहेच, त्याशिवाय, पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत विजय मिळवणे हे का आवश्यक आहे, हे ठळकपणे सांगणारे आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मनावर जे मळभ दाटून आले होते, ते दूर करत त्यांच्यात ऊर्जा फुंकणारे ठरले आहे. काँग्रेसी माध्यमे आजही भाजप पराभूत झाला, असे जे खोटे चित्र जाणूनबुजून मांडत आहेत. त्याचा होणारा परिणाम कमी करण्यासाठी ही ऊर्जा आवश्यक अशीच होती. दोन खासदारांचा पक्ष अशी ज्या पक्षाची संभावना केली जात होती, तोच पक्ष आज सलग तिसर्‍यांदा केंद्रात सत्तेवर आला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच बिगर काँग्रेसी पक्ष आहे. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा भीमपराक्रम करणारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच नेते ठरले आहेत.

आगामी काळात, राज्यात पुन्हा एकदा निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभेच्या निवडणुकाही होतील. मुंबई पालिकेवर भाजपचा भगवा कोणत्याही परिस्थितीत फडकवण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. विधानसभेतही भाजप आणि मित्रपक्षच विजयी होतील, हा त्यांचा विश्वास यथार्थ असाच आहे. भाजप येणार्‍या निवडणुकांमध्ये देदीप्यमान यश मिळवेल, हा त्यांचा दावा, पक्षाचे काम आणि कार्यकर्ते यांच्या बळावरच त्यांनी केला आहे, असे म्हटले तर काहीही चुकीचे ठरणार नाही. भाजपच्या विजयाचा त्यांनी सोडलेला संकल्प हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा, त्याला ऊर्जा देणारा ठरला आहे, हे निश्चित.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121