मविआत वादाची ठिणगी! ठाकरेंनी पटोलेंचा फोन घेणं टाळलं

    13-Jun-2024   
Total Views |
 
Patole vs Thackeray
 
लहान भाऊ आणि मोठा भाऊ या वादानंतर आता महाविकास आघाडीत पुन्हा एकदा एका नव्या वादाची ठिणगी पडलीये. विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि उबाठा गटात नाराजीनाट्य रंगलंय. यावेळी उद्धव ठाकरेंनी चक्क नाना पटोलेंचाच फोन उचलला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवाय महाविकास आघाडी तोडण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका नाही तर आमची भूमिका जोडण्याची आहे, असं म्हणत पटोलेंनी उबाठाला खोचक टोलाही लगावलाय. त्यामुळे या वादाचं नेमकं कारण काय? विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून आता पुन्हा एकदा सांगलीच्या जागेच्या वादाची पुनरावृत्ती होणार का? आणि उद्धव ठाकरेंनी पटोलेंचा फोन टाळल्याने आघाडीत बिघाडी होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
 
येत्या २६ जून रोजी विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका पार पडणार आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी यावेळी मतदान होणारे. मात्र, लोकसभेप्रमाणेच आता या निवडणूकीतही महाविकास आघाडीत जागावाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. मित्रपक्षांच्या नेत्यांचे फोन न घेणे, त्यांना ताटकळत ठेवणे असे प्रकार उद्धव ठाकरेंनी अद्यापही बंद केलेले दिसत नाहीत. आता त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनाही अशीच वागणूक देण्यास सुरुवात केलीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केलीये. खरंतर, विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीकरिता उद्धव ठाकरेंनी सर्व जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालीये. ठाकरेंनी आघाडीधर्म पाळून नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार मागे घ्यावेत, अशी मागणी काँग्रेसने केलीये. मात्र, उद्धव ठाकरेंनी याविषयी कोणताही प्रतिसाद दिला नसल्यानं काँग्रेमने तीव्र नाराजी व्यक्त केलीये.
 
याविषयी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, "निवडणूका जाहीर झाल्या त्यावेळीच महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी बसून जागा निश्चित कराव्या, असं आम्ही म्हणालो होतो. परंतू, उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या दोन जागा परस्पर जाहीर केल्या. त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ते विदेशात होते. मी त्यांना सांगितलं की, कोकण आणि नाशिक विभागात आमचे दोन उमेदवार देण्याची आमची तयारी आहे. त्यांनी मला तुमचे उमेदवार कोण? असे विचारले. त्यावर मी उमेदवारांची नावं सांगितली. त्यानंतर नाशिकमधल्या काँग्रेस उमेदवाराला ठाकरेंनी बोलावून घेतले आणि त्यांचं कंगण बांधून स्वपक्षातून उमेदवारी जाहीर केली. परंतू. महाविकास आघाडीत चर्चा करून निर्णय घेतला असता, तर या चारही जागा जिंकता आल्या असत्या. पण अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात, अशी काँग्रेस पक्षाची अपेक्षा आहे. ठाकरेंनी चारही जागा घोषित केल्यानंतर मी वारंवार त्यांना फोन लावला. पण त्यांचे ऑपरेटर 'साहेब तयार होत आहेत', असा निरोप देत होते. शेवटी त्यांच्याशी फोनवर संपर्क झालाच नाही. त्यांच्या मनात नेमकं काय आहे, हे प्रत्यक्ष भेटल्यावर कळेल, असं म्हणत पटोलेंनी आपली नाराजी बोलून दाखवली. याशिवाय महाविकास आघाडी तोडण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका नाही. आमची भूमिका जोडायची आहे. महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच काम करु," अशी सारवासारवही पटोलेंनी केलीये.
 
यावर उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिलीये. ते म्हणाले की, "शिवसेनेने या चारही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेली आहे. शिवसेनेची एक संघटनात्मक ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेने या चारही ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. उद्धव साहेबांनी फोन उचलला नसला तरी त्यांच्यासोबत संजय राऊत, देसाई साहेब, आदित्य साहेब आहेत. त्यांच्याशी जरी संपर्क साधला तरी या सगळ्या गोष्टींवर मार्ग निघेल. नाशिकची जागा परंपरागतरित्या शिवसेना लढते. नाशिकमध्ये शिवसेनेचा उमेदवार पुरस्कृतच होता. तिथे काय चर्चा करायची? राहिला प्रश्न कोकणचा, तर मागच्या वेळी कोकणात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यापैकी कुणी किती मतं घेतली होती, हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे शिवसेनाच तिथे लढते आहे," असं म्हणून उबाठाने याप्रकरणात एक पाऊल मागे घेण्याऐवजी पुन्हा काँग्रेसलाच डिवचल्याचं पाहायला मिळालं. शिवाय आदित्य ठाकरेंना याबाबत विचारल्यावर त्यांनी नाना पटोलेंना आमचे प्रवक्ते उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे मविआत काहीही आलबेल नाहीये का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झालाय.
 
त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, "कोकण आणि नाशिकच्या जागेबाबत दिल्लीतल्या काँग्रेसश्रेष्ठींनी मला आणि संजय राऊतांना फोन करुन सांगितलंय. त्यानुसार आता आम्ही या जागांवर समझौता करत आहोत. कधीही अर्ज न भरल्यापेक्षा तो भरून ठेवलेला चांगला म्हणून आम्ही अर्ज भरून ठेवला होता," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
मुख्य म्हणजे, तीन ते चार दिवसांपूर्वीच "महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ आहे. लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं," असं वक्तव्य करत नाना पटोलेंनी उबाठाला डिवचलं होतं. यावर "कोणीही लहान किंवा मोठा भाऊ नाही. आम्ही महाराष्ट्रात प्रत्येकाला मदत केली आहे. आता पुढे महाराष्ट्रात जो जिंकेल त्याची जागा, असे ठरले आहे, असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं होतं. त्यामुळे जो जिंकेल त्याची जागा असं म्हणून उबाठाने काँग्रेसला आधीच इशारा दिला होता की, काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.
 
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी असल्यानं महाविकास आघाडीत प्रयत्न सुरु आहेत. नाना पटोलेंनी नाशिक आणि कोकणच्या जागेवरुन उमेदवारी मागे घेण्याची मागणी केलीये. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी केलेल्या समझौत्यात आता ते आपला अर्ज मागे घेणार का हे पाहण उत्सुकतेचं ठरणार आहे.
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....