इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा एका हिंदू मुलीचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतर केल्याची बातमी समोर आली आहे. हे प्रकरण कराचीतील शाहदाबकोट गावातील आहे. तिथे समीर अली नावाच्या एका कट्टरपंथी तरुणाने एका १५ वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण केले, त्यानंतर तिला इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले आणि त्यानंतर तिच्याशी लग्न केले.
आता पाकिस्तानातील ख्रिश्चन कार्यकर्ते फराज परवेझ यांनी या प्रकरणी आवाज उठवला आहे. ही बाब जगासमोर ठेवत त्यांनी सांगितले की, मुलीचे नाव संगीता असून तिला एका कट्टरपंथी मुलाने जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले. आता मुलीचे नाव हमीदा ठेवण्यात आले आहे. ती केवळ १५ वर्षांची आहे पण समीर अली तिच्या कागदपत्रांमध्ये छेडछाड करून तिला १९ वर्षांची असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
लग्नापूर्वी त्याने एक प्रतिज्ञापत्र दिले ज्यामध्ये मुलगी प्रौढ असल्याचे लिहिले होते, तर परवेजने दाखवलेल्या कागदपत्रांवरून स्पष्टपणे लक्षात येत आहे की, मुलगी १९ वर्षांची नाही. तसेच परवेजने सांगितले की, मुलीची संमतीही प्रतिज्ञापत्रात लिहिली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार – “माझं कोणाकडूनही अपहरण करण्यात आलेलं नाही आणि मी हे प्रतिज्ञापत्र कोणत्याही दबाव, शक्ती किंवा प्रभावाशिवाय पूर्ण जाणीवपूर्वक देत आहे. मी समीर अलीशी लग्न करणार आहे आणि हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. माझ्यावर कोणीही दबाव आणला नाही.”
याशिवाय समीर अलीविरोधात कोणी तक्रार दिली तर ती पूर्णपणे खोटी असेल, असेही प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे. पाकिस्तानमध्ये कट्टरपंथीयांकडून हिंदू मुलींचे अपहरण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. दि. २ जून रोजीच एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले होते. नंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका तरुणाशी लग्न केले. सोहाना शर्मा असे या मुलीचे नाव आहे. तो बेनझीराबाद जिल्ह्यातील रहिवासी होती.
मुलीचे तिच्या आईसमोरच तिच्या शिक्षकाने अपहरण केले होते. याबाबत वडिलांनी तक्रार केल्यावर एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये मुलीने इस्लामचा स्वीकार केल्याचे आणि मुस्लिम पुरुषाशी लग्न केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतरही कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतर तिला तब्बल ५ दिवसांनी न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे मुलीने सांगितले की, सर्व काही तिच्यासोबत जबरदस्तीने घडले असून तिला वडिलांसोबत राहायचे आहे. असे असतानाही न्यायालयाने तिला त्याच्या वडिलांसोबत पाठवले नाही.