‘ऑल आईज ऑन...’

    12-Jun-2024   
Total Views |
Khushbu Khan Murder

पाकिस्तानी अभिनेत्री आणि नृत्य आणि नाट्य कलाकार खुशबू खान हिचा मृतदेह नुकताच पाकिस्तानच्या एका शेतात सापडला. बंदुकीच्या गोळ्या मारून कुणी तरी तिची हत्या केली. यावर तिच्या भावाचे म्हणणे आहे की, दोन जणांनी तिचा खून केला. त्यांनी खुशबूसमोर दोन अटी ठेवल्या होत्या.

पहिली अट तिने चित्रपटसृष्टी सोडू नये आणि दुसरी अट म्हणजे, केवळ त्यांनीच आयोजित केलेल्या कार्यक्रमात नृत्य करेल. मात्र, खुशबूने या दोन्ही अटी अमान्य केल्या. त्यामुळे या दोघांनी तिचा खून केला. तसे पाहायला गेले, तर खुशबूचे जीवनही वादग्रस्तच. मागे तिला तुरूंगवास भोगावा लागला होता. तिने सहनाट्यकर्मी कलाकार महिलांचे विवस्त्र व्हिडिओ चित्रीत केले होते. नाटकाआधी महिला ज्या खोलीमध्ये कपडे बदलत असत, त्याच खोलीमध्ये तिने छुपा कॅमेरा लावला. ती त्या व्हिडिओचा वापर करून त्या सहकलाकार महिलांना ब्लॅकमेलसुद्धा करत होती. त्यामुळे खुशबूची प्रतिमा तशी उजळ नव्हतीच. मात्र, तरीही कुणी तरी त्रयस्थ व्यक्तींनी कुणासमोर कुठे नाचावे, यासंदर्भात तिच्यावर दबाव आणावा, तिला आदेश द्यावा, तिने तो मान्य केला नाही म्हणून त्यांनी तिचा खून करावा, हे तर पाकिस्तान किंवा त्याच्या समविचारी देशातच घडू शकते. आता खुशबूच्या खुन्याला सजा होईल का?
 
तर या अनुषंगाने पाकिस्तानी मॉडेल आणि सोशल मीडिया स्टार कंदिल बलोचची हत्या आठवते. २०१६ साली तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली. खूनी तिचे भाऊच होते. त्यांचे म्हणणे होते की, कंदिल सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकायची. त्यामुळे भाऊ आणि कुटुंब म्हणून त्यांची बदनामी होत होती. कंदिलने हे सगळे तत्काळ थांबवावे. पण, कंदिलने त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे त्यांनी तिचा खून केला. त्यांना अटकही झाली. मात्र, काही दिवसांतच ते इज्जतदारपणे सुटले. कारण, मुस्लीम कायद्याप्रमाणे पीडित किंवा मृतांच्या पालकांनी किंवा वारसदारांनी पीडिता किंवा मृतांच्या गुन्हेगाराला माफ केले, तर त्यांचा गुन्हा माफ होतो. कंदिलच्या बाबतीत तिच्या भावांना तिच्या आईबाबांनी माफ केले होते.आता खुशबू खान हत्याकांडाचेही असेच काहीसे होईल. तसेही अभ्यासकांच्या मते, पाकिस्तानामध्ये दरवर्षी हजारो मुली- महिलांचे खून होतात. पण, गुन्हेगाराला शासन होतेच असे नाही. असो. पाकिस्तानच्या काही अभिनेत्री भारताबद्दल अधूनमधून काश्मीर प्रकरणावरून बोलत असतात. मात्र, कंदिल किंवा आता खुशबूबद्दल या अभिनेत्री काही बोलणार नाहीत.

पाकिस्तानचे असे तर अफगाणिस्तानच्या बाबतीत तर काय बोलावे? नुकतेच संयुक्त राष्ट्राच्या ‘युएन वुमन’ या संस्थेने अफगाणिस्तानातील महिलांच्या सद्यस्थितीबद्दल अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार अफगाणिस्तानमध्ये ११ लाख मुली शाळेत जात नाहीत, तसेच एक लाखांपेक्षा जास्त महिलांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे. पण, त्या शिक्षण घेऊ शकत नाहीत. तसेच तालिबानी शासनामध्ये एकही महिला नेता नाही. राजकारणच का, समाजात आणि घरातही महिलांना कोणतेच हक्क-अधिकार नाहीत. कोणत्याही न्यायप्रक्रियेत त्यांचा सहभाग नाही. मात्र, असे असताना केवळ एक टक्का महिलांना याबाबत खेद वाटतो. बाकीच्या महिला ‘अल्लामिया की मर्जी’ समजून परिस्थितीला शरण गेल्या आहेत. माणूस हा सामाजिक प्राणी आहे, असे समाजशास्त्र सांगते. मात्र, अफगाणी महिलांचे जग त्यांच्या घराच्या चार भिंतीतच आहे.

‘युएन वुमन’च्या सर्वेक्षणानुसार, १८ टक्के महिलांनी घरातील महिलांव्यतिरिक्त घराबाहेरील नातेवाईक महिलेला भेटूनही तीन-चार महिने झाले आहेत. तीन-चार महिने झाले या महिलांना उंबरठा ओलांडता आलाच नाही. त्यांनी इतर महिलेला भेटावे की नाही, याचीही संमती घरातल्या पुरूषांकडून घ्यावी लागते. त्याची मर्जी असेल, तर तो तिला त्या नातेवाईक महिलेकडे भेटायला नेईल. तसेच ८२ टक्के महिलांनी मानसिक-शारीरिक अत्याचार सहन केला आहे, तर ६२ टक्के महिला अजूनही त्या अत्याचाराच्या प्रभावातून बाहेर नाहीत. या पार्श्वभूमीवर वाटते की, गाझा पट्टीतील महिलांप्रमाणे अफगाण, पाकिस्तानच्या महिलाही मुस्लीमच आहेत. मात्र, जगभरातले पॅलेस्टाईन समर्थकया पीडित महिलांबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. ‘आईज ऑन राफा’च का? कधी तरी डोळे उघडून पाकिस्तान, अफगाणिस्तानातील या महिलांचे दु:ख- दैन्यही पाहा की...

 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.