"महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ आहे. लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं," हे वक्तव्य आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं. लोकसभा निवडणूकीत राज्यात सर्वात जास्त जागा मिळाल्यानंतर नाना पटोलेंनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना डिवचणं सुरु केलंय. नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले विरुद्ध वर्षा गायकवाड हे पक्षांतर्गत वाद सर्वपरिचित आहेतच. लोकसभा निवडणूकीदरम्यान या वादांची जोरदार चर्चाही झाली. त्यानंतर आता लोकसभेचा निकाल पुढे आल्यावर नानांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणि त्यावर उबाठा गटाच्या संजय राऊतांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे नाना पटोले विरुद्ध संजय राऊत हा वादाचा नवा अंक सुरु झाल्याचं चित्र आहे. हा वाद आता कुठवर जातो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणारे. तर पटोले विरुद्ध राऊत हा वाद नेमका काय आहे? आणि यावरुन राजकारण कसं रंगलंय हे जाणून घेऊया.
दि. ४ जून रोजी संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूकांचा निकाल जाहीर झाला. या निकालात राज्यात महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या तर महायूतीने १७ जागांवर विजय मिळवला. यावर्षीच्या निवडणूकीत राज्यात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे १३ जागांवर विजय मिळाला. मात्र, निकाल जाहीर होताच काँग्रेसने आता महाविकास आघाडीमध्ये दबावतंत्राचा वापर सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर हुरळून गेलेल्या नाना पटोलेंनी मित्रपक्षांना, विशेषतः उबाठा गटाला डिवचण्याची मालिका सुरू केलीये. निकालानंतर सर्वात पटोलेनी विधानसभेला १५० जागा जिंकण्याची घोषणा केली. त्यानंतर आता त्यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ असल्याचा दावा करत, लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं, असा खोचक टोला लगावलाय. त्यामुळे काँग्रेस मित्रपक्षांवर दबावतंत्र वापरत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, “आम्ही लोकसभा निवडणुकीतदेखील मोठ्या भावाची भूमिका निभावली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्याबरोबर असलेले आधी गट होते, आता पक्ष झाले आहेत. महाराष्ट्रात आमचा जेव्हा एक खासदार होता, तेव्हाही आम्ही मोठ्या भावाची भूमिका निभावली आहे. आजही निभावत आहोत. मात्र, लहान भावांनी लहान भावांसारखे वागावे,” असा टोला त्यांनी मित्रपक्षांना विशेषत: उबाठाला लगावलाय. एवढंच नाही तर काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत झालेल्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलंय. वर्षा गायकवाड आणि अमोल किर्तीकरांची जागा आम्ही मागितली होती. त्या जागा आम्हाला मिळल्या असत्या तर महाविकास आघाडीला फायदा झाला असता, असे ते म्हणाले.
दरम्यान, पटोलेंचं मोठ्या भावांचं हे वक्तव्य उबाठा गटाच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी पलटवार केलाय. ते म्हणाले की, "कोणीही लहान किंवा मोठा भाऊ नाही. महाराष्ट्रात शिवसेना (उबाठा) एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि यापुढेही राहील. आम्ही अत्यंत संघर्षातून आणि संकटातून पक्ष उभा केला आहे. काँग्रेससमोर तसे संकट नव्हते. त्यांचे चिन्ह आणि पक्ष हा त्यांच्याकडे होता. आम्ही महाराष्ट्रात प्रत्येकाला मदत केली आहे. आता पुढे महाराष्ट्रात जो जिंकेल त्याची जागा, असे ठरले आहे," असे म्हणत त्यांनी पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
पटोले आणि राऊत यांच्यासारख्या दोन मोठ्या नेत्यांची अशी वक्तव्ये बघता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याचे चिन्ह दिसताहेत. शिवाय, नाना पटोलेंच्या नेतृत्वावर कायमच त्यांच्या पक्षातील नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. यावरून अनेकदा काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वादही पाहायला मिळाला. या वादांची नाना पटोले विरुद्ध अशोक चव्हाण, नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात, नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले विरुद्ध वर्षा गायकवाड अशी अनेक रुपं आहेत. दरम्यान, आता लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील नाना पटोले विरुद्ध संजय राऊत असं वादाचं नवं रुप पुढे आलंय.
मात्र, पटोलेंसारख्या मोठ्या नेत्याचं हे वक्तव्य बघता लोकसभेत जास्त जागा मिळाल्याने काँग्रेस अतिउत्साहीत झालीये का? आणि अशा प्रकारची वक्तव्ये करुन काँग्रेस मित्रपक्षांवर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न करतीये का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होताहेत.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....