आदित्य ठाकरेंसाठी वरळीत धोक्याची घंटा!

    12-Jun-2024   
Total Views |
 
Aditya Thackeray
 
"आदित्य ठाकरे यांनी आता नवीन मतदारसंघाचा शोध सुरु केला आहे. राहुल गांधी पराभूत झाल्यानंतर जसे वायनाडच्या शोधात निघाले होते, तसंच आता आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील आपला वायनाड शोधण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे आता वरळीतून लढणार नाहीत," असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणेंनी केलंय. लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाने बाजी मारली. पण उबाठाचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत मात्र आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा वाजली. दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांनी विजय मिळवला खरा पण आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून त्यांना अत्यंत कमी मताधिक्य प्राप्त झालंय. त्यामुळं आदित्य ठाकरे चांगलेच तोंडावर आपटल्याचे चिन्ह आहेत. लोकसभा निवडणूकीत वरळी विधानसभेत नेमकं काय घडलं? आणि आगामी विधानसभा निवडणूकीत आदित्य ठाकरे खरंच आपला मतदारसंघ बदलणार का? याबद्दल जाणून घेऊया. 
 
दि. ४ जून रोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत मुंबईत महाविकास आघाडीने चार तर महायुतीने दोन जागा जिंकल्या. मुंबईतील अनेक जागांवर शिवसेना विरुद्ध उबाठा असा थेट सामना होता. यातलीच एक जागा म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभेची. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाने अरविंद सावंत उमेदवारी दिली होती. तर त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या यामिनी जाधव मैदानात होत्या. या निवडणूकीत अरविंद सावंत यांनी ६४ हजार ८४४ मतं घेत विजयही मिळवला. दक्षिण मुंबईतील या अटीतटीच्या लढतीत यामिनी जाधव यांना कुलाबा आणि मलबार हिल या मतदारसंघात लीड मिळाली. तर अरविंद सावंत यांना वरळी, शिवडी, मुंबादेवी, भायखळा या मतदारसंघात चांगलं मताधिक्य मिळालं. पण सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्या आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघावर. या मतदारसंघात उबाठा गटाच्या पदरात निराशा आल्याचं पाहायला मिळालं.
 
आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात उबाठाला जोरदार धक्का बसलाय. वरळी विधानसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांना केवळ ६४ हजार ८४४ मते मिळाली. तर, शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी तब्बल ५८ हजार १२९ मतं आपल्याकडे खेचलीत. दोघांमधील मतांचे अंतर हे केवळ ६ हजारांच्या आसपास असल्यामुळे उबाठा गटाला त्याचा मोठा फटका बसलाय.
मुळात आदित्य ठाकरेंना विधिमंडळ राजकारणात आणण्यासाठी २०१९ मध्ये सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांचा बळी देत, त्यांना मागच्या दारानं विधानपरिषदेवर घेण्यात आलं होतं. त्यामुळं वरळीत एकूण तीन आमदारांचं बळ तयार झालं. परंतू, लोकसभा निवडणुकीत त्या बळाची प्रचिती येईल असं अपेक्षित असताना मात्र, प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नाही. या लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांना उबाठा गटाच्या बालेकिल्ल्यातच आव्हानांना तोंड द्यावं लागलं. त्यामुळे युवराजांसाठी दोन नेत्यांचा बळी घेऊन विधानपरिषदेची आमदारकी बहाल केल्यानंतरही त्यांना वरळीत मताधिक्य टिकवता आलेलं नाही. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत युवराजांचा चांगलाच कस लागणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.
 
या पार्श्वभूमीवर वरळी मतदारसंघात भाजपने 'वरळीकरांचे लाख लाख आभार' अशी बॅनरबाजी करत घटलेल्या मतांवरून ठाकरेंना डिवचलंय. वरळीकरांनी दिलेला जनादेश स्विकारून येणाऱ्या विधानसभेत वरळीकरांचा जास्तीत जास्त आशीर्वाद घेऊन लोकसभेची कसर भरून काढू, असा संदेशही देण्यात आलाय. त्यामुळे विधानसभेत भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार हे स्पष्ट आहे. परंतू, वरळीतील या पिछेहाटीमुळे आता आदित्य ठाकरे आपला मतदारसंघ बलण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये.
 
सध्या भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघाच्या जोरावर अरविंद सावंत विजयी झाले असले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत वरळीत दगाफटका होण्याची भीती आहे. परिणामी, आदित्यसाठी 'सेफ' केलेला मतदारसंघ एकाएकी 'अनसेफ' झाल्यानं ठाकरेंच्या गोटात चलबिचलता वाढलीये. त्यामुळे आदित्य ठाकरे आपला मतदारसंघ बदलणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पण सध्या प्रश्न हा आहे की, एरवी खरा शिवसैनिक हा आमच्यासोबत आहे, अशा बाता करणाऱ्या आदित्य ठाकरेंना आपल्याच मतदारसंघात जम बसवता आला नाही का? वरळीतील मतदारांचा विश्वास जिंकण्यात ते कमी पडलेत का? आणि मुख्य म्हणजे आता यातून सुटका मिळवण्यासाठी ते चक्क आपला मतदारसंघच बदलणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
 
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....